'स्पायडरमॅन'चा जनक हरपला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |

 


 
 
 

अमेरिकन लेखक स्टॅन ली यांचे निधन

 

लॉस एंजल्स : स्पायडरमॅन, हल्क, ब्लॅक पँथर, एक्स-मेन आदी सुपरहिरोंचे जनक अर्थात सुप्रसिद्ध अमेरिकन कॉमिक बुक लेखक, दिग्दर्शक, संपादक व प्रकाशक स्टॅन ली यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी अमेरिकेतील लॉस एंजल्स येथे निधन झाले. ली यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना लॉस एंजल्समधील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथेच उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले.

 

१९२२ मध्ये अमेरिकेतीलच न्यूयॉर्क येथे जन्मलेल्या स्टॅन ली यांची कॉमिक्स जगतातील कारकीर्द १९३९ मध्येच वयाच्या सतराव्या वर्षी सुरू झाली. त्यानंतर तीन-चार दशकांत कॉमिक्सजगताचा सम्राट अशी स्टॅन ली यांची ओळख बनली. अमेरिकेतील सुप्रसिद्ध मार्व्हल कॉमिक्स हे ली यांच्यामुळेच घराघरात पोहोचले. ली हे या नियतकालिकाचे संपादक होते. लेखक, संपादक, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता असे ली यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. १९६१ साली द फॅन्टॅस्टिक फोरया चार सुपरहिरोंच्या कुटुंबाची कथा त्यांनी वाचकांच्या हाती सोपवली व ती भलतीच गाजली. त्यानंतर स्पायडरमॅन, हल्क, ब्लॅक पँथर, एक्स-मेन, आयर्नमॅन, कॅप्टन अमेरिका असे अनेक सुपरहिरो ली व त्यांच्या सहलेखकांच्या कल्पनांतून वास्तवात उतरले आणि त्यांनी वाचकांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजवले. त्यांच्या या सुपरहिरोंची क्रेझही अमेरिकेतच नाही तर जगभरात पोहोचली होती.

 

कालांतराने चित्रपट जगतातही ली यांनी पाऊल ठेवले. कॉमिक्समधून वाचकांना भेटलेले सुपरहिरो मोठ्या पडद्यावर जिवंत झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात धुमाकूळ घातला. स्पायडरमॅन आणि आयर्नमॅनच्या चित्रपटांचे अनेक सिक्वेल्सदेखील निर्माण झाले. हे सारे चित्रपट जगभरात आजही आवडीने पाहिले जातात. केवळ लहान मुलांमध्येच नाही तर युववर्गातही हे सुपरहिरो प्रसिद्ध आहेत. स्टॅन ली यांनी भारतीय चित्रपट क्षेत्रातही काम केले. चक्र या अॅनिमेशनपटाची निर्मिती ली यांनी केली होती. या चित्रपटाचे पुढे दोन सिक्वेल्सदेखील आले होते. ली यांना अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. मनोरंजन क्षेत्रात तब्बल सत्तर वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या स्टॅन ली यांच्या निधनामुळे कॉमिक्स जगताचा आधारस्तंभ हरपल्याची भावना जगभरातील मनोरंजन विश्वातून व्यक्त होत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@