भुसावळात 28 अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |

विनापरवाना वाहनांवर पोलीस प्रशासनाकडून होणार दररोज कारवाई


भुसावळ, 12 नोव्हेंबर
शहरातील बसस्थानक, पांडुरंग टॉकीज, नाहाटा कॉलेज परिसरात काली-पिली ओमनी, अ‍ॅपेरिक्षा, मिनीडोअर, मॅक्स, जीप या गाड्यांच्या बेशिस्त थांब्यांमुळे पादचारी तसेच दुचाकी वाहनांना रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र नित्याचेच झाले आहे.
 
या बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्याचे तर सोडा समोर उभे असलेले वाहतूक पोलीस शिटी मारण्याचेही कष्ट घेत नाही. याअनुषंगाने ‘भुसावळात अवैध वाहनांना पोलिसांचे अभय’ अशा आशयाचे वृत्त ‘तरुण भारत’ने 12 रोजी सोमवारी प्रकाशित केल्यानंतर खळबडून जागे झालेले पोलीस प्रशासनाने पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्‍यांसमवेत सोमवारी शहरातील 28 अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई केल्याची माहिती पो.नि.गंधाले यांनी ‘तरुण भारत’ला दिली.
 
शहरातून भुसावळ ते जळगाव, भुसावळ ते यावल, भुसावळ ते सावदा-फैजपूर, रावेर, भुसावळ ते वरणगाव, बोदवड येथे प्रवासी जाण्यासाठी अवैध प्रवासी काली-पिली ओमनी, अ‍ॅपेरिक्षा, मॅक्स या वाहनांंमध्ये बसून प्रवासी प्रवास करतात.
 
बेशिस्तरीत्या बसस्थानक परिसरात वाहने उभी केल्याने रस्त्याने पादचारी, दुचाकीचाकांना या बेशिस्त लावलेल्या वाहनांमधून तारेवरची कसरत करून आपले वाहन काढावे लागते.
 
या सर्व अवैध प्रवासी वाहनांच्या चालक-मालकांचे पोलिसांशी अर्थपूर्ण हितसंबंध असल्याने या वाहनांवर कारवाई करतील कशी? हा मोठा यक्ष प्रश्न असतो.
 
मात्र, ‘तरुण भारत’ने सोमवारी अवैध वाहतूक करणार्‍या वाहनांचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर सोमवारी दिवसभरात भुसावळ-जळगाव धावणार्‍या अवैध काली-पिली, अ‍ॅपे, मॅक्स अशा सर्व 28 वाहनांवर दंडात्मक करण्यात आली. पुढेही दररोज या अवैध प्रवासी करणार्‍या वाहनांवर कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
 
दंडात्मक कारवाई करणार
 
भुसावळ-जळगाव, यावल, फैजपूर, वरणगाव, मुक्ताईनगर, बोदवड दरम्यान धावणार्‍या काली-पिली ओमनी, मॅक्स, अ‍ॅपेरिक्षा, जीप अशा सर्व 28 अवैध प्रवासी वाहनांवर सोमवारी वाहतूक शाखेतर्फे कारवाई करण्यात आली. भविष्यात दररोज अवैधपणे धावणार्‍या वाहनांवर दंड आकारून कारवाई केली जाईल.
- दीपक गंधाले, पोलीस निरीक्षक,
वाहतूक शाखा, भुसावळ
@@AUTHORINFO_V1@@