बड्या गाळेधारकांवर कारवाईची तयारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018
Total Views |
जळगाव, 11 नोव्हेंबर
महापालिका मालकीच्या मार्केटमधील भाडेकरार संपलेले गाळे ताब्यात घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक वर्षांपूर्वी दिले असले तरी प्रशासनाने त्यावर अंमलबजावणी केलेली नाही. यामुळे न्यायालयाची बेअदबी टाळण्याच्या हेतूने येत्या काही दिवसांत मोठ्या मार्केटमधील गाळे सील केले जाण्याची शक्यता आहे.
 
दिवाळीपूर्वी मनपा आयुक्तांनी सायंकाळी अनपेक्षितपणे महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटमध्ये पाहणी केली होती. दिवाळीनंतर होणार्‍या गाळेजप्तीच्या कारवाईची ही पूर्वतयारी असल्याचे त्यावेळी सांगण्यात येत होते.
 
भाडे कराराची मुदत संपलेल्या 20 मार्केटपैकी महात्मा फुले, सेंट्रल फुले, महात्मा गांधी व जुने बी. जे. मार्केट प्रमुख आहेत. येथील गाळेधारकांकडे 350 कोटींपैकी निम्मे रक्कम थकित आहे.
 
प्रशासनाने यापूर्वी रक्कम भरण्याबाबत सूचित करूनही त्यास बहुतेक गाळेधारकांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. मनपा प्रशासन मोठ्या थकबाकीदारांची गाळेधाराकांची यादी तयार करीत आहे. त्यांचे गाळे प्राधान्यक्रमाने जप्त केले जातील, अशी माहिती मिळत आहे.
 
14 जुलै 2017 ला जप्तीचा निकाल
 
मनपा मालकीच्या 28 व्यापारी संकुलांपैकी 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळ्यांच्या भाडे कराराची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली आहे. कराराचे नूतनीकरण आणि भाडेदर यावरून गाळेधारक आणि महापालिकेत मतभेद झाले.
 
त्यानंतर गाळेधारकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर खंडपीठाने 14 जुलै 2017 रोजी, निकाल देत महापालिका प्रशासनाने दोन महिन्यात गाळे ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करावा, असे निर्देश दिले होते.
@@AUTHORINFO_V1@@