भुसावळात अवैध वाहतुकीला पोलिसांचे अभय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018
Total Views |

वाहनधारकाकडून जोपासले जाताय पोलीस अधिकार्‍याचे आर्थिक हितसंबंध : बसस्थानक परिसरात बेशिस्तीने गाठला कळस


भुसावळ, 11 नोव्हेंबर
शहरातील बसस्थानक, पांडुरंग टॉकीज, नाहाटा कॉलेज परिसरात कालीपिली ओमनी, ऍपेरिक्षा, मिनीडोअर, मॅक्स, जीप या गाड्यांच्या बेशिस्त थांब्यांमुळे पादचारी तसेच दुचाकी वाहनांना या भागातील रस्त्यांवरुन मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र नेहमीचेच झाले आहे.
 
या बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्याचे तर सोडा समोर उभे असलेले वाहतूक पोलिस शिटी मारण्याचेही कष्ट घेत नाही. कारण भुसावळ ते जळगाव दररोज धावणार्‍या जवळपास दोनशे ते तीनशे वाहनधारकाकडून थेट भुसावळ, नशिराबाद आणि जळगावच्या पोलिस स्थानकांमधील अधिकार्‍यांचे आर्थिक हितसंबंध जोपासले जात असल्याची चर्चा आहे.
 
 
त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनधारकांना पोलिसांकडून अभय दिले जात असल्याने कारवाई होणार कशी? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
 
शहरातून भुसावळ - जळगाव, भुसावळ - यावल, भुसावळ- सावदा-फैजपूर, रावेर, भुसावळ - वरणगाव, बोदवड येथे प्रवासी जाण्यासाठी अवैध कालीपिली ओमनी, रिक्षा, मॅक्स या वाहनांंमध्ये बसून प्रवास करतात. भुसावळ ते जळगाव दरम्यान जवळपास 300 पेक्षा जास्त चारचाकी वाहने दररोज धावतात.
 
बसस्थानकाबाहेरील जागेत कुठेही वाहन उभे करुन प्रवासी भरण्याचा आटापिटा चालक करीत असतात. बेशिस्तरित्या वाहन उभे केल्याने रस्त्याने पादचारी, दुचाकी धारकांना या वाहनांमुळे जीव मुठीत धरुन तारेवरची कसरत करावी लागते.
 
बर्‍याच वेळा बसस्थानकातून बस बाहेर निघताना आणि बाहेरुन बसस्थानकात प्रवेश करणार्‍या बसला या अवैध प्रवासी वाहनांमुळे बराचवेळ जागीच थांबून राहावे लागते. वाहतूकीची कोंडी सुटता सुटता किमान 30 ते 35 मिनीटे सहज लागत असल्याची सध्याची परिस्थिती आहे.
 
शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा आहे, परंतु या शाखेचे कर्मचारी, अधिकारी एकदाही अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई करीत नाही.
 
या अवैध प्रवासी वाहतूकीमुळे बहुतांश वेळा प्रवासी बसवण्यावरुन चालकांमध्ये वाद देखील होतात. वाहतूकीला शिस्त लावल्यास वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरुपी सुटणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देऊन बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची गरज आहे. परिणामी शहरातील वाहतूक कोंडीची समस्या
सुटेल.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची बिनधास्त वाहतूक
 
दररोज भुसावळ ते जळगाव महामार्गावर दीडशे ते दोनशे अवैध प्रवासी वाहने धावतात. यामध्ये ओमनी, अ‍ॅपेरिक्षा, मॅक्स यांचा समावेश आहे.
 
या अवैध प्रवासी वाहनांचे मालक- चालक हे बाजारपेठ, तालुका आणि शहर तसेच नशिराबाद, जळगाव येथील पोलिस स्टेशनच्या अधिकार्‍यांचे ‘आर्थिक हित’ जोपासत असल्याची चर्चा आहे.
 
त्यामुळे या अवैध वाहतूक करणार्‍या वाहधारकांवर ‘कारवाई’ होणार कशी? असा ‘लाखमोलाचा प्रश्न’ त्यानिमित्ताने पुढे आला आहे. वाहनधारक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवतात. या जीवघेण्या कृत्याबाबत वाहतूक पोलिसांकडून या वाहनधारकांची साधी विचारपूसही होत नाही.
अवैध वाहनांवर कारवाई करणार
 
अवैध प्रवासी वाहतूकीला लवकरच लगाम बसेल. वाहतूक शाखेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना सूचना देत येत्या दोन दिवसात बेशिस्तरित्या बसस्थानक परिसरात लावण्यात येत असलेल्या अवैध वाहने व त्यांच्या मालक,चालकांवर कारवाई करु.
- गजानन राठोड, डीवायएसपी, भुसावळ
@@AUTHORINFO_V1@@