‘पीसीव्ही 13’ लसीमुळे न्यूमोनिया टाळण्यास होणार मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018
Total Views |

सरकारच्या निर्णयाचे बालरोगतज्ज्ञांकडून स्वागत, पाच वर्षे आतील बालकांमध्ये चांगल्या परिणामांची अपेक्षा


 
जळगाव, 11 नोव्हेंबर
देशात न्यूमोनिया आजारामुळे प्रत्येक दोन मिनिटाला एका लहान मुलाचा मृत्यू होतो. या आजारावरील उपलब्ध प्रभावी लसीकरण (पीसीव्ही 13) हे प्रतिबंधात्मक उपचार ठरू शकते, अशी माहिती बालरोगतज्ज्ञांनी दिली आहे.
 
इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्सच्यावतीने यावर्षी जागतिक न्यूमोनिया दिनी ‘नो मोअर न्युमोनिया’ची हाक देण्यात आली आहे. हा आजार कुटुंबासाठी त्रासदायक प्रकार ठरतो. रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात भरती करावे लागते.
 
प्रभावी लसीकरण देशात उपलब्ध
 
जळगाव येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेश पाटील म्हणाले की, न्यूमोनियामुळे होणार्‍या बालमृत्यूवर मात करण्यासाठी प्रभावी लसीकरण आज देशात उपलब्ध आहे.
 
वेगवेगळ्या जीवाणूंमुळे होणार्‍या न्यूमोनियापैकी ‘स्ट्रेप्टोकेकस’ची भीषणता भारतात सर्वात जास्त आहे. 2015 मधील एका अभ्यासानुसार, या न्यूमोनियाची पाच वर्षे आतील 5 लाख 60 हजार मुलांना लागण झाली आणि 1 लाख 5 हजार बालमृत्यू झाले आहेत. पीसीव्हीचा समावेश लसीकरणात केल्याने या आजारावर मात करता येणे शक्य होणार आहे.
 
पीसीव्ही 13 मुळे बालमृत्यू रोखता येतील
 
डॉ. संजय बाविस्कर म्हणाले की, देशात 2011 पासून पाच वर्षाखालील मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे तरीही जगातील इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत 2016 मध्ये भारतामधील बालमृत्यूची संख्या जास्त आहे. पीसीव्ही 13 मुळे हा मृत्यूदर कमी करण्यात सरकारला यश येईल.
आरोग्य यंत्रणेवर येतो ताण
 
औषधोपचार व होणारी दगदग यामुळे ‘त्या’ कुटुंबावर तसेच देशाच्या आरोग्य व्यवस्थेवरही ताण येतो. या पार्श्वभूमीवर युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये (युआयपी) 13 व्हॅलेंट न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस (पीसीव्ही 13) समाविष्ट करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे बालरोगतज्ज्ञ संघटनेतर्फे स्वागत करण्यात आले आहे. कारण, या लसीमुळे पाच वर्षे आतील मृत्यू कमी होण्यास मदत होणार आहे.
न्यूमोनिया रोखण्यासाठी उपाय
 
न्यूमोनिया रोखण्यासाठी लसीकरण, पहिल्या सहा महिन्यांच्या दरम्यान नियमित सदृढ स्तनपान व पोषण, प्रत्येक घरात प्रदूषण व धुम्रपान प्रतिबंध, विस्तवासाठी शेण व लाकूड यांचा वापर करणे टाळावे, सर्वत्र स्वच्छता राखणे आणि नियमितपणे हात धुणे आदी उपाय महत्त्वाचे ठरतात.
@@AUTHORINFO_V1@@