महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर नवीपेठेत पेटला ‘गल्लीभर’ कचरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018
Total Views |
धुरामुळे रहिवासी त्रस्त, स्वच्छतेचे दावे हवेत विरले
जळगाव, 11 नोव्हेंबर
भूलथापा मारण्यात महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांचा हात कुणीही धरणार नाही. 17 मजलीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नवीपेठेत रविवारी दिवसभर ‘गल्लीभर’ कचरा पेटवून दिल्याने तो धुमसत होता.
 
त्या धुरामुळे स्थानिक रहिवाशांना अत्यंत त्रास सहन करावा लागला. त्यामुळे महापालिकेचे स्वच्छतेचे दावे मात्र, या धुरात कुठल्या कुठे उडून गेल्याचे दिसत होते. यामुळे की काय? सत्तेचा मधुचंद्र संपलेल्या नगरसेवकांना ‘क्या हुआ तेरा वादा, वो कसम, वो इरादा’ असे विचारायची वेळ जळगावकरांवर आली आहे.
 
दिवाळीचा आनंद घेऊन दोनच दिवस होत नाही तोच नवीपेठेतील रहिवासी वेगळ्याच समस्येने त्रस्त झाले आहेत. फेडरल बँकेच्या मागील बाजूस असलेल्या गल्लीत जमा झालेला कचरा अज्ञात व्यक्तीने पेटवून दिला आहे.
 
त्यामुळे रविवारी दिवसभर धुमसत असलेल्या या कचर्‍यातून धुराचे लोट उठत होते. त्याचा वास घराघरात पोहोचत असल्याने या भागात राहणे अनेकांना नकोसे झाले आहे. धुरामुळे डोळ्यातून पाणी येणे, श्वसनास त्रास होत असल्याची तक्रार रहिवासी करीत आहेत. महावीर ज्वेलर्स, नवजीवन सुपर शॉपपर्यंत धुराचा ताप जाणवत होता.
 
गेल्याच महिन्यात आव्हाणे शिवारातील कचर्‍याचा प्रश्न गाजला होता. तेथील बंद असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पातील कचरा पेटून धुरामुळे आव्हाणे, निमखेडी भागातील रहिवासी त्रस्त झाले होते.
 
संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिकेने धावपळ करीत अग्निशमन विभागाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले होते.
 
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपाचा उमेदवार निवडून आल्याचा मुहूर्त साधत दिवाळीपूर्वी शहरात महास्वच्छता अभियान राबविण्याचे आश्वासन सत्ताधारी गटातर्फे देण्यात आले होते
 
. तसेच संपूर्ण शहराच्या सफाईसाठी एकच मक्ता देण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर अद्यापही तो प्रत्यक्षात आलेला नाही.
 
दिवाळी शुक्रवारीच संपली. शहराच्या अनेक भागात सफाईची कामे सुरू झाली आहेत. परंतु नवीपेठेत स्वच्छतेची कामे का होत नाहीत, शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या भागातच एवढी गहन समस्या असेल तर त्याचा दोष कुणाला द्यायचा? असा प्रश्न जनता विचारीत आहे.
मार्केट एरियाकडे लक्ष दिले जाण्याची अपेक्षा
 
नवी पेठ, दाणा बाजार, पोलन पेठ, सराफ बाजार आदी भाग मार्केट एरिया म्हणून ओळखला जातो. जळगावसह अन्य जिल्ह्यातील आणि परराज्यातील ग्राहक खरेदी-विक्रीच्या व्यवहारांसाठी या भागात येत असतात.
 
परंतु येथे असलेल्या अस्वच्छतेमुळे जळगावचे काय चित्र त्यांच्या मनात तयार होत असेल? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. महापालिकेतील सर्वच लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने मार्केट एरियाच्या स्वच्छतेवर अधिक लक्ष केंद्रित करावे, असा सूर उमटत आहे.
 
सुटीत पथक हवे सज्ज
 
बांधकाम, आरोग्य, पाणीपुरवठा, विद्युत आदी अत्यावश्यक सेवांचे पथक सुटीच्या दिवशीही कार्यरत राहील याची व्यवस्था नगरसेवकांनी करणे आवश्यक आहे.
 
अत्यावश्यक प्रसंगी हे पथक सेवा देऊ शकते. महापालिकेेने सकारात्मकपणे इच्छाशक्ती दाखवून प्रश्न निकाली काढणे आवश्यक झाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@