विविध आजारांची किरकोळ पैशात तपासणी अन् औषधीही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018
Total Views |

पाचोर्‍यातील विश्व हिंदू परिषद शाखा संचालित कै.परशुराम कोंडिबा शिंदे आरोग्य सेवा केंद्राची अनमोल सेवा

पाचोरा, 11 नोव्हेंबर
अतिशय कमी उत्पन्न गटातील श्रमजीवी, कष्टकर्‍यांसह सर्वांना किरकोळ पैशात सत्वर, ठणठणीत करण्याचे मानवी सेवेचे व्रत जोपासत आहे येथील विश्व हिंदू परिषद शाखा संचलित कै.परशुराम कोंडिबा शिंदे आरोग्य सेवा केंद्र.
 
प्रेरणा प्रतिष्ठानचे प्रमुख आणि संघ परिवारात बालपणापासून अनेक जबाबदार्‍या पार पाडणारे सुनील सराफ आणि सहकारी कार्यकर्ते तनमन, प्रसंगी या सेवात्मक प्रकल्पाचे धनपूर्वक व्यवस्थापन व काळजी वाहत आहेत.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून घडलेल्या कार्यकर्त्यांनी एकूणच समाज आणि राष्ट्राच्या सर्वांगिण उत्कर्षासाठी देशभर हजारो विविधांगी सेवाप्रकल्प तन, मन, धनपूर्वक उभारत त्यांना प्रसंगी शासन, प्रशासन आणि लोकसहभागाद्वारे प्रगतीपथावर नेलेले आहे, त्या विश्वातील लौकिक अर्थाने लहानशा पाचोर्‍यातील हे काम जगभरात आदर्शवत, कुणालाही प्रेरणादायी ठरु शकते.
 
हनुमाननगर, बसस्थानक मार्गावरील याच परिसरात एका टपरीपासून या सेवाकार्याला प्रारंभ झाला. विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन जिल्हामंत्री आणि पाचोरा स्टेशनजवळील सुपडू भादू पाटील विद्या मंदिराचे मुख्याध्यापक दत्तात्रय त्र्यंबक कमळे (कमळे गुरुजी या नावाने सुपरिचित, मृत्यू दि.13.4.2005) आणि सहकारी सेवाभावी कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी या लहानशा टपरीत श्रीगणेशा केला.
 
त्यांना तेवढीच समर्पित साथ तब्बल 32 वर्ष रुग्णसेवा करीत दिली ती सोनारगल्लीतील रहिवासी डॉ.नंदकिशोर शिवनारायण शर्मा या देवदूताने. ‘नसनसात सेवावृत्ती भिनल्याने अचूक निदान आणि प्रेमपूर्ण आश्वासक शब्द’ यामुळे त्यांच्या उपचारांचा गुण हमखास येई, असा अनुभव ऐकायला मिळतो.
 
त्यांच्या पत्नी राजबाई आणि मुलं गोपाळ व पुरुषोत्तम यांना या पुण्याईमुळे सार्‍या समाजबांधवांकडून आदर मिळत असतो. सर्वसामान्य परिवाराने दिलेल्या पवित्र भावनेच्या ‘भिक्षेतून’ आणि काही दानशूर मंडळीच्या सहयोगातून पश्चिमाभिमुख सुमारे 500 चौरस फूट जागेत या सेवाकेंद्रांची वास्तू (मोठ्ठा हॉल) उभी राहिली आहे.
 
मध्यंतरी डॉ.शर्मा या पुण्यपुरुषावर नियतीने कठोर आघात केला. पोटाच्या गंभीर विकाराचे निदान उशिरा झाल्याने दुर्दैवाने त्यांचे अकाली व शोचनीय निधन झाले. (जीवनकाल 19.8.1955 ते 18 मार्च 2018) आणि 2 ते 2॥ महिने या सेवेत खंड पडला...
 
पण योगायोगाने गेल्या गोकुळअष्टमीपासून डॉ.अनिल बाफना (मूळ रा. संघवी कॉलनी, भडगावरोड पाचोरा) यांच्या रुपाने समाधानी, आनंदी आणि या सेवेत समाधान मानणारा जणू नवा कार्यकर्ता मिळाला. (त्यांनी सुमारे 27 वर्ष चिंचोली निंबाजी या गावी खाजगी रुग्णसेवा दिलेली आहे.) ते रोज सायंकाळी 6 ते 8 या वेळात रुग्णसेवा देतात. विशेष असे की अवघ्या 5 रुपयात निदान आणि औषधी मिळत असल्याने साहजिकच कष्टकरी, सर्वसामान्यांना हा मोठा दिलासा आहे. रोज 25 ते 30 रुग्ण असतात. सर्वसाधारण आजार अंग, पोट, गुडघे-सांधेदुखी, ताप, खोकला, सर्दी, अपचन, मळमळ, उलट्या, खाज, अजीर्ण, अशक्तपणा, अ‍ॅलर्जी इ. अशा अनेक विकारांवर रामबाण उपाय होत असतो. विशेष म्हणजे खोकला दूर करणारे 3-4 वेळा घ्यावयाचे पातळ, सुटे औषध औषधही बाटलीत मिळत असल्याने जनतेची मोठी सोय झाली
 
 
आहे. विशेष म्हणजे या सेवा केंद्राच्या परिसरात श्रमजिवींचा रहिवास आहे. त्यात मजूर, हमाल इ. असंघटीत कामगार, किरकोळ उद्योग, व्यवसाय करुन जगणार्‍यांचा, हिंदू-मुस्लिम बांधवांचा समावेश आहे.
 
औषधीचा व अन्य खर्च वर्षभरात दीड लाख रु.पर्यंत जातो. शैक्षणिक व आरोग्यसेवांच्या मोठ्या खर्चाने त्रस्त समाजबांधवांना अधिकाधिक सेवा भविष्यात येथे मिळावी, यासाठी जेनेरिक औषधी, 2 रुग्णसेवक नियुक्ती तसेच आता वर्षभरात होणारी 4-5 आरोग्य शिबीरे मोठ्या प्रमाणात व व्यापक स्वरुपात घेण्याचे नियोजन आहे.
 
एकाग्र चित्ताने अभ्यास करता यावा, यासाठी या जागी मुलामुलींसाठी अभ्यासिका सुरु करावी, अभ्यास आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी एखादे लहानसे का होईना वाचनालय, ग्रंथालय असावे, असाही कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना सर्व समाजघटकांचे वाढते सहकार्य व सहभाग मिळण्याची आवश्यकता आहे.
 
विचित्र योगायोग! सध्याची जागा मोठ्या विचित्र व गमतीदार परिस्थितीत सुमारे 30 वर्षापूर्वी प्राप्त झाली. कनवाळू, दानशूर (स्व.) परशुराम कोंडिबा शिंदे यांच्या मालकीची ही जागा... या जागेच्या शेजारचा गृहस्थ आणि त्यांचा वाद होता...ते होते कमळे गुरुजींचे भक्त...वाद मिटण्यासाठी रामबाण उपाय म्हणून ही जागा शिंदे यांनी कमळे गुरुजी यांच्या या उपक्रमाच्या वाढीसाठी दान दिली.
’भिक्षा’ मागून बांधला गरिबांचा दवाखाना !
 
समाजासाठी एखादा शिक्षक काय करु शकतो आणि परिस्थितीने गांजलेला गोरगरीब माणूसही किती मोलाचे सहकार्य करु शकतो, याचे कदाचित जगात असे उदाहरण नसेल. द.त्र्यं.कमळे गुरुजी हे साधे शिक्षक. त्यांनी आपला विद्यादानाचा पवित्र पेशा सांभाळत समाज आणि राष्ट्रप्रेमाच्या रा.स्व.संघाच्या घट्ट संस्कारामुळे अक्षरश: भिक्षा मागून टपरी ते दवाखाना असा हा सेवाप्रकल्प उभा केला आहे.
 
ते आणि 1-2 कार्यकर्ते रोज सकाळी घरोघर जात अंगणात उभे राहून संत रामदासांचे श्लोक खड्या आवाजात म्हणत, यथाशक्ती 4 आणे, 8 आणे, रुपया अशी भिक्षा ते झोळीत पडली की, पुढच्या दारी दुसरा श्लोक म्हणत.... असा नित्यक्रम अनेक वर्ष चालला, त्या पैशातून अन्य नागरिकांच्या मदतीने 1980-81 मध्ये ही वास्तू उभी राहिली आहे.
@@AUTHORINFO_V1@@