बिहारमधील जागावाटपाने भाजपाला दिलासा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018   
Total Views |


 

 

 
बिहारमध्ये भाजपा व मित्रपक्षांमध्ये जागावाटप झाल्याने भाजपाला काहीसा दिलासा मिळाला आहे. 2014 मध्ये राज्यातील 40 पैकी 22 जागा भाजपाने जिंकल्या होत्या, तर रामविलास पास्वान यांचा लोकजनशक्ती पार्टी 6 व उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षाने 3 अशा एकूण 9 जागा जिंकल्या होत्या. जदयुला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर राज्यातील समीकरण बदलीत, जनता दल युने भाजपासोबत सरकार स्थापन केले आणि आता नितिशकुमार यांनी भाजपाच्या बरोबरीने जागा मागितल्या. त्यातून एक पेचप्रसंग तयार झाला होता. त्यावर आता भाजपाने तोडगा शोधला असून, भाजपा व जनता दल यु प्रत्येकी 17-17 जागा लढतील, तर रामविलास पास्वान यांच्या पक्षाला 5 व उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षाला एक जागा देण्यात आली आहे.
 

बिहारमधील या जागावाटपावर मुख्यमंत्री नितीशकुमार समाधानी असल्याचे दिसले. रामविलास पास्वानही फारशी खळखळ करण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीत. मात्र, उपेंद्र कुशवाहा हे नाराज असल्याचे समजते. ते सध्या भाजपा व राष्ट्रीय जनता दल दोन्ही पक्षांच्या संपर्कात असल्याने म्हटले जाते. कुशवाहा यांचा पक्ष लहान असला, तरी बिहारच्या जातीय राजकारणात ते लहान का होईना भूमिका बजावू शकतात.

बिहारमध्ये भाजपा आघाडीचे जागावाटप झाल्यानंतर, राज्यातील लढत भाजपा आघाडी व कॉंग्रेस आघाडीत होईल, हे स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेस आघाडीत राष्ट्रीय जनता दल, जीतनराम मांझी यांचा पक्ष राहणार आहे. बिहारमध्ये कॉंग्रेस पक्षाची स्थिती फारशी चांगली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तारिक अन्वर कॉंग्रेसमध्ये परतल्याने पक्षाला थोडा दिलासा मिळाला आहे. या आघाडीत उपेंद्र कुशवाहा यांना ओढण्याचे प्रयत्न तेजस्वी यादव यांच्याकडून सुरू असल्याचे समजते.

 

बिहारमधील या जागावाटपानंतर, भाजपा महाराष्ट्रातील जागावाटप पूर्ण करील असे समजते. शिवसेना सध्या भाजपाच्या विरोधात भूमिका घेत असली, तरी शेवटी भाजपासोबत युती होईल, यावर पक्षनेते आश्वस्त असल्याचे समजते. महाराष्ट्रात युती होणे फार गरजेचे असून, त्यात जराही अडचण नसल्याचे भाजपा नेत्यांना वाटत आहे. शिवसेनेला तयार करणे फार अवघड काम नाही, असेही भाजपाला वाटते.

 

आंध्र-तेलंगणा

आंध्रप्रदेशात चंद्राबाबू नायडू यांनी कॉंग्रेसचा हात पकडण्याचा निर्णय घेतला आहे, तर जगनमोहन रेड्डींसोबत भाजपाची युती होण्याचे संकेत भाजपातून दिले जात आहेत. तसे झाल्यास भाजपासाठी ही एक चांगली बाब असेल. तेलंगणातील तेलंगणा राष्ट्रीय समिती विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवीत असली, तरी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सरकार बनविताना, हा पक्ष भाजपासोबत असेल, असे संकेत पक्षाचे नेते व राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिले आहेत. कर्नाटकातील स्थिती मात्र भाजपाला काहीशी प्रतिकूल राहील, असे संकेत राज्यात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांनी दिले आहेत. भाजपाने शिमोग्याची आपली जागा कायम राखण्यात यश मिळविले असले, तरी बेल्लारीतील पराभव भाजपासाठी चिंता निर्माण करणारा आहे.

 

हत्या एका पत्रकाराची

एक लहानशी घटना सार्या देशाला किती अडचणीची ठरू शकते, जगात त्या देशाची किती नाचक्की होत असते, याचा अनुभव सौदी अरेबिया सध्या घेत आहे. इस्लामिक जगाची अघोषित राजधानी मानला जाणारा हा देश, जमाल खशोगी या पत्रकाराच्या हत्येने अडचणीत आला आहे. खशोगीने सौदी अरेबियाच्या शाही परिवाराविरुद्ध युद्ध छेडले होते. अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकासाठी काम करणार्या खशोगीच्या लिखाणाने शाही परिवार संतापला होता. त्यामुळे शाही परिवाराचा युवराज प्रिन्स सलमानने आपल्या 15 मारेकर्यांची चमू पाठवून खशोगीची हत्या करविली. या प्रकरणात आता नवीनवी माहिती समोर येत आहे.

खशोगीला आपल्या प्रेयसीसोबत विवाहबद्ध व्हावयाचे होते. त्यासाठी त्याला काही दस्तावेज हवे होते. ते मिळविण्यासाठी तो तुर्कीमधील सौदी अरेबियाच्या दूतावासत गेला, कधीही न परतण्यासाठी! खशोगी दूतावासात शिरताच, त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोर सौदी अरेबियाच्या शाही परिवाराने पाठविलेले होते. खशोगीच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले. त्याच्या मृतदेहाचा पुरावा कुणाच्याही हाती लागू नये म्हूणन काही रसायनांचा वापर करून ते वितळविण्यात आले.

 

नवी चमू

खशोगीच्या हत्येची बातमी जगभर पसरली. अमेरिकेसह काही देशांनी चौकशीची मागणी सुरू केली. या चौकशीत आपण अडचणीत येऊ, याची कल्पना आल्यानंतर प्रिन्स सलमानने पुन्हा दोघा तज्ज्ञांना टर्कीत पाठविले. खशोगीच्या हत्येचे कोणतेही पुरावे सौदी अरेबियाच्या वकिलातीत राहणार नाहीत, याची खात्री करून घेण्याची जबाबदारी या दोघा अधिकार्यांवर सोपविण्यात आली होती. त्यांनी सौदी दूतावासाला भेट दिली. खशोगीच्या हत्येचे कोणतेही पुरावे नाहीत, याची खात्री करून घेतली आणि त्यानंतर दूतावासाची दारे चौकशीसाठी तुर्की पोलिसांसाठी उघडण्यात आलीत. मात्र, तरीही खशोगीच्या हत्येचे काही पुरावे तुर्की पोलिसंाना सापडले आहेत. खशोगीच्या देहाचे तुकडे करण्यात आल्यानंतर त्यांची विल्हेवाट अन्यत्र लावली गेल्यास ती बाब उघडकीस येऊ शकते, याचा विचार करून, हायड्रोफ्लुरिक अॅसिडमध्ये ते विरघळविण्यात आले. या अॅसिडचे अंश वकिलातीतील विहिरीत व सांडपाण्याच्या नाल्यांमध्ये सापडले आहेत. म्हणजे सांडपाण्याचे विश्लेषण करून खशोगीच्या हत्येचा तपास केला जात आहे. आणि हा सारा तपास वकिलातीच्या आत केला जात आहे, हे विशेष! भारतीय चौकशी संस्थांनी बोध घ्यावा, असे हे प्रकरण आहे. तुर्की पोलिस या प्रकरणात किती परिश्रम करीत आहेत, याचा हा पुरावा आहे. या घटनेने सौदी अरेबियाची जगभर नाचक्की झाली आहे.

 

विरोध मावळला

खशोगीच्या हत्येनंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाविरुद्ध कडक कारवाई करण्याचा संकेत दिला होता. मात्र, सौदी अरेबिया हा अमेरिकेचा एक विश्वासू मित्र राहिला असल्याने, नंतर त्यांनी कारवाईचा विचार सोडून दिला, असे सांगितले जाते. पण, आता खशोगीच्या हत्येचे पुरावे बाहेर आल्यानंतर ट्रम्प यांचे विरोधक या प्रकरणी त्यांनी कठोर भूमिका घ्यावी यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@