सुरक्षित ‘डिजिटल इंडिया’ !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018
Total Views |


कोट्यवधींची संपत्ती काही सेकंदात हडप करणार्‍या सायबर हल्लेखोरांची ताकद गेल्या काही दिवसांत वाढत चालल्याचे चित्र आहे. सायबर हल्ले होण्याच्या प्रमाणावर देशाचा जगात २१ वा क्रमांक आहे.

 

नुकत्याच जाहीर झालेल्या एका अहवालानुसार, जानेवारी ते जून २०१८ या कालावधीत ६ लाख, ९५ हजार सायबर हल्ले झाल्याची आकडेवारी उघड झाली आहे. या हल्ल्यांतून काढून घेण्यात आलेली रक्कम कोटींच्या घरात आहे. याचा पाठपुरावाही कासवगतीने होत असल्याने देशासमोर मोठे आव्हान आहे. हे हल्लेखोर केवळ परदेशात नसून भारतातून इतर ठिकाणी हल्ले होण्याच्या प्रमाणात देशाचा १३ वा क्रमांक लावतो. ‘एफ सिक्युअर’ या सायबर सुरक्षा संस्थेने जाहीर केलेल्या अहवालातून ही आकडेवारी स्पष्ट झाली आहे. मालवेअरचा हल्ला असो किंवा सायबर हल्ला, या हल्लेखोरांनी सामान्यांची कोट्यवधींची कमाई काही मिनिटांत हातसफाईद्वारे गायब केल्याच्या कित्येक गुन्ह्यांचा तपास सुरूच आहे. सुरुवातीला एटीएम क्लोनिंग, ग्राहकांना पिन, ओटीपीद्वारे फसवणूक करून ग्राहकांना लुबाडणार्‍यांच्या टोळक्यांनी पोलिसांच्या नाकी नऊ आणले होते. तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून बँकांचे सर्व्हर हॅक करून कोट्यवधींचा गंडा घालणार्‍यांचेही प्रमाण वाढले आहे. त्यातच जगात भारताचा २१ वा क्रमांक ही काहीशी चिंतेची बाब आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाची सहज उपलब्धता ही सायबर हल्लेखोरांसाठी सोयीची बनत गेली. देशाची वृद्धिंगत होत असलेली अर्थव्यवस्था, नागरिकांची क्रयशक्ती यामुळे हल्लेखोरांनी मोर्चा भारताकडे वळवला. भारतात एकूण ६.९५ लाख सायबर हल्ले झाले. त्यातल्या केवळ रशिया, चीन, अमेरिका, नेदरलँड्स आणि जर्मनी या देशांतून ४.३ लाख हल्ले झाले आहेत. भारतातल्या ७३ हजार सायबर हल्लेखोरांनीही हल्ले केले आहेत.

 

एफ सिक्युअर’ कंपनीच्या मते, केवळ रशियात २ लाख, ५५ हजार, ५८९ इतके हल्ले झाले आहेत. त्यामध्ये अमेरिकेतून १ लाख, ३ हजार, ४५८, चीनमधून ४२ हजार, ५४४ नेदरलँडमधून १९ हजार, १६९ आणि जर्मनीतून १५ हजार, ३३० हल्ले झाले आहेत. असे हल्ले रोखण्यासाठी बँकांचीही यंत्रणा अद्ययावत करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत देशभरातील बँकिंग यंत्रणा अधिक मजबूत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ‘एफ सिक्युअर’ या कंपनीचे जगभरात ४१ हनीस्पॉट आहेत. एखाद्या चोराला अडकविण्यासाठी जसे पोलीस त्याच्यासाठी सापळा रचतात, तसेच काम ही कंपनी करते. कंपनीतील कर्मचारी जगभरात कमकुवत सर्व्हर तयार करतात. सायबर हल्लेखोर असे सर्व्हर हॅक करण्याचा प्रयत्न करतात. त्यातून आलेल्या आकडेवारीद्वारे हा अहवाल सादर केला जातो. सायबर हल्लेखोरांच्या पद्धती आणि तंत्रज्ञान याचाही अभ्यास केला जातो. कंपनीच्या मते, भारतातील सायबर गुन्हेगारी रोखण्याचे आव्हानही आहेच. गेल्या सहा महिन्यांत भारतीय सायबर हल्लेखोरांनी सुमारे ३६ हजार, ५६३ हल्ले केले आहेत. देशाचा २१ वा क्रमांक असला तरीही आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेरिकेचा सायबर हल्ल्यांमध्ये पहिला क्रमांक आहे. अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणाही हे हल्ले थोपविण्यासाठी कमजोर आहे.

 

देशात सुरू असलेले डिजिटलायझेशन हे सायबर हल्लेखोरांसाठी लाभदायक ठरत आहे. मात्र, यावर दिलासादायक बाब म्हणजे, देशातील सायबर सुरक्षा. आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षित देशांमध्ये भारताचा क्रमांक पहिल्या १० देशांमध्ये लागतो. जाणकारांच्या मते, सुरक्षित आणि अद्ययावत सर्व्हर प्रणाली, नागरिकांमध्ये सायबर जागरुकता आदींमुळे सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीने आणखी मजबूत बनेल आणि सुरक्षित डिजिटल इंडिया, अशी ओळख बनेल. ‘कॅप्चर द फ्लॅग’ नावाच्या स्पर्धेत एकूण २२०० गटांनी सहभाग घेतला होता. त्यात भारताच्या आयआयटी रुडकीच्या विद्यार्थ्यांनी सायबर हल्ल्यांपासून रोखणारे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. जगभरातून भारताला या स्पर्धेत सायबर सुरक्षेत आठवा क्रमांक मिळाला. शेवटी वाईटावर होणारा चांगल्याचा विजय असा विचार केला असता सायबर हल्ले रोखण्यासाठी भारताचे आठवे स्थान ही आशादायी गोष्ट आहे.

 
 

तेजस परब

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@