विरोधकांना पुढील 50 वर्षे आरामाचीच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |

भाजपाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे-पाटील


 
जळगाव, 10 नोव्हेंबर
लोकसभेच्या येत्या निवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी झपाटून काम करावे. या विजयामुळे देशात पुढील 50 वर्षे तरी भाजपाच्या विरोधात काँग्रेस आणि इतर राजकीय पक्ष उभे राहू शकणार नाहीत, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे-पाटील यांनी केले.
 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथे शनिवारी पक्षाची आढावा बैठक ब्राह्मण सभेत झाली. यावेळी खा. दानवे-पाटील बोलत होते. ते म्हणाले की, देशातील वातावरण आणि मतदार अजूनही भाजपाच्या बाजूने आहेत.
 
एकेकाळी क्रमांक चारवर असलेला भाजपा आज पहिल्या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे. हे स्थान यापुढेही आपल्याला टिकवून ठेवायचे आहे. त्या दृष्टीने लोकसभेची होणारी निवडणूक महत्त्वाची आहे.
 
भाजपाच्या विजयात नवीन मतदारांचा वाटा मोलाचा असतो हे गेल्या काही निवडणूक निकालांतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जुना मतदार टिकवून ठेवणे आणि नवीन मतदारांची नोंदणी करून घेणे यावरही भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
जळगाव जिल्ह्यातील पक्ष बांधणी आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे खा. दानवे-पाटील यांनी कौतुक केले. निवडणुकीतील विजयाची सूत्रे बदलली असल्याची जाणीव त्यांनी बैठकीत उपस्थितांना करून दिली
 
. मंडळनिहाय आढावा घेताना झालेल्या चुका दुरुस्त करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. पाचोरा मंडळ प्रमुखाने पालकमंत्री पक्षाचे विरोधक आर. ओ. तात्या पाटील यांच्याकडे जाऊन येतात.
 
पण त्याची माहिती भाजपाच्या कार्यकर्त्यांना नसते याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी सोबतच सुरू करण्याचे आवाहन केले.
 
लोकसभेनंतर सहा महिन्याने सप्टेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होईल. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षाच्या विजयात सोशल मीडियाचा मोठा वाटा होता. त्यावेळी इतर पक्ष सोशल मीडियाचा फारसा वापर करीत नव्हते.
 
मात्र, आता सर्वच पक्षांनी सोशल मीडिया सेल सुरू केले आहेत. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या प्रभावी वापरासाठी सज्ज व्हावे, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करावेत. 25 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस संपूर्ण मंडलनिहाय साजरा करण्याचे आवाहन केले.
 
प्रास्ताविक आ. सुरेश भोळे यांनी केले. लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवाराला जळगाव महानगरातून 3 लाखांचा लीड मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.
 
बैठकीच्या सुरुवातीला जळगाव लोकसभेचे माजी खासदार वाय. जी. महाजन सर, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना व ज्ञात-अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
 
ना. गिरीश महाजन, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, खा. ए. टी. नाना पाटील, प्रदेश चिटणीस आ. स्मिता वाघ, आ. उन्मेश पाटील, माजी मंत्री एम. के. अण्णा पाटील, जि. प. अध्यक्षा उज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, जिल्हा ग्रामीण सरचिटणीस प्रा. डॉ. सुनील नेवे, जि. प. शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे, जळगाव महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी, महेश जोशी, राजेंद्र घुगे पाटील, मनपा गटनेते भगत बालानी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर उपस्थित होते.
 
 
बैठकीचे सूत्रसंचालन पोपटतात्या भोळे यांनी केले. बैठकीला जिल्हा पदाधिकारी प्रदेश पदाधिकारी, लोकसभा संयोजक समिती, मंडल अध्यक्ष सरचिटणीस, जिल्हा आघाडी अध्यक्ष सरचिटणीस, विस्तारक, शहर अध्यक्ष जि.प.सदस्य, नगरसेवक आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेशी लढत
 
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी राजकीय विश्लेषण सादर करताना जळगाव मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ. डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अनिल भाईदास पाटील, डॉ. राजेश पाटील, चित्रसेन पाटील, काँग्रेसकडून अ‍ॅड. ललिता पाटील आणि शिवसेनेकडून माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील इच्छुक असल्याची माहिती दिली. त्यामुळे भाजपाचा सामना हा राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्याशी होणार असून, याही वेळेस भाजपा कार्यकर्ते चांगल्या मताधिक्क्याने जळगाव आणि रावेरची जागा निवडून आणतील, असा विश्वास उदय वाघ यांनी व्यक्त केला.
भाजपाचा एक, तर युपीएचे 10 उमेदवार
 
भाजपातर्फे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत, तर युपीएमध्ये 10 जण इच्छुक आहेत. भाजपाच्या विरोधात केव्हा एकत्र यायचे? हा विरोधकांचा घोळ अजून संपलेला नाही याकडे खा. दानवे-पाटील यांनी लक्ष वेधले.
@@AUTHORINFO_V1@@