रिक्षाचालकाचा खून, संशयितास कोठडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |

रेल्वेस्थानक भागातील घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण

जळगाव, 10 नोव्हेंबर
दोन रिक्षाचालकांचा वाद वाढून त्यातील एकाने चाकू भोसकून दुसर्‍या रिक्षाचालकाचा खून केल्याची घटना गुुरुवार, 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जळगाव रेल्वे स्थानकासमोरील रिक्षा थांब्याजवळ घडली.संशयित रिक्षाचालक नितीन जगन पाटील उर्फ पपई याला न्यायालयाने 14 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
 
 
इस्माईल शहा आणि नितीन हे दोन्ही जण रिक्षा चालवितात. रेल्वे स्टेशन परिसरातील थांब्यावर त्यांची रिक्षा उभी असते. 8 रोजी सायंकाळी पाच वाजता नितीन याने इस्माईल याच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. ते दिले नाही म्हणून नितीन याने रागात इस्माईल याच्या पोटात चाकू खुपसला. या घटनेमुळे रेल्वे स्टेशन परिसरात पळापळ झाली होती.
 
घटनेची माहिती मिळाल्यानंतर ईस्माइलचा मोठा भाऊ लतीफ शहा व अन्य नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या इस्माईलला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती ईस्माइल याला मृत घोषित केले.
 
लतीफ शहा गुलाब शहा (रा. मास्टर कॉलनी, जळगाव) यांच्या फिर्यादीवरुन नितीन उर्फ पपई याच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण झाले होते.
 
 
दरम्यान, टवाळखोर व दारुडे हे नेहमीच या भागात फिरत असतात. प्रवाशांना आणि दादर्‍यावरुन ये-जा करणार्‍यांना त्यांचा त्रास होत असतो.
 
पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज
 
जळगाव रेल्वे स्थानकासमोरील रिक्षा थांब्याजवळ रिक्षा लावण्याहून नेहमी वाद होत असतात. काही रिक्षाचालक नंबरमध्ये रिक्षा न लावता परस्पर रिक्षा भरतात.
 
त्यातून रिक्षा चालकांमध्ये नेहमीच भांडणे होतात. याचा नाहक त्रास प्रवाशांना होत असतो. अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
 
गोलाणी मार्केट परिसरातून संशयितास अटक
 
रिक्षाचालक ईस्माइल शहा गुलाब शहा (वय 36, रा.गेंदालाल मिल, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. संशयित रिक्षाचालक नितीन जगन पाटील उर्फ पपई (रा.आव्हाणे, ता.जळगाव) याला रात्री आठ वाजता गोलाणी मार्केट परिसरातून अटक करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे व गुन्हे पथक हल्लेखोराच्या शोधार्थ होते.
@@AUTHORINFO_V1@@