आता पुन्हा भारनियमनाचे चटके नाही : ऊर्जामंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |


 

मुंबई: राज्यात दिवाळीनिमित्त बंद करण्यात आलेले भारनियमन पुन्हा सुरू करण्यात येणार नाही, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी दिली. राज्यात विजेची मागणी कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

 

राज्याच्या वीजपुरवठ्यासाठी असलेल्या कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने, तसेच विजेची मागणी वाढल्यामुळे दिवाळीपूर्वी भारनियमनाचा निर्णय घेण्यात आला होता, पण दिवाळीनिमित्त तो मागे घेण्यात आला. आता कोळशाचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. तसेच सध्या थंडीच्या दिवसांमुळे विजेची मागणीही कमी झाली आहे, त्यामुळे दिवाळीनंतर भारनियमन होणार नसल्याचे बावनकुळे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.

 

सध्या राज्यात विजेची मागणी कमी झाली आहे. गेल्या काही दिवसात विजेची मागणी २४ हजार मेगावॅटच्या पुढे गेली होती. ऑक्टोबर हीटमुळे विजेची मागणी वाढली होती. वाढलेल्या मागणीनुसार पुरवठा करणे त्यावेळी शक्य नव्हते, म्हणून भारनियमन सुरू करण्यात आले होते, असे बावनकुळे म्हणाले. आता परिस्थिती बदलली आहे. विजेची मागणी कमी झाली असून, ती २० हजार मेगावॅटवर आली आहे. येत्या काळात विजेची कमतरता भासू नये, यासाठी २५ हजार मेगावॅटपर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे. कोळशाचा मुबलक साठा सध्या उपलब्ध आहे. त्याचा फायदा वीज निर्मितीसाठीही होणार आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. राज्यातील शेतकर्‍यांकडे ३२ हजार कोटींपेक्षा जास्त वीज बिलांची थकबाकी आहे. राज्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे, शेतकरी संकटात आहे. तरीही शक्य झाल्यास किमान वीज बिल भरून शेतकर्‍यांनी सरकारला मदत करावी, असे आवाहनही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@