बिन बादल ‘बरखा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |



बरखा म्हणजे हिंदीत पाऊस. अशीच एक ‘बरखा’ भारतीय माध्यम क्षेत्रातही गेल्या दोन दशकांहून अधिक काळ नुसती बिन बादलच बरसतेय. डाव्या सेक्युलरांच्या कळपात वावरून बोंबाबोंब करण्यात पटाईत असलेली महिला पत्रकार बरखा दत्त... अशा या बरखाचे आज स्मरण करण्याचे कारण म्हणजे हिंदूविरोधी गरळ ओकणारा तिचा जारी झालेला ‘न्यूज का ज्यूस’ हा चार मिनिटांचा द्वेषमूलक व्हिडिओ...


काही दिवसांपूर्वीच आम्हीवृत्त मूल्याची ऐशीतैशीया अग्रलेखातून संघविरोधी स्वयंघोषित माध्यमवीरांचा समाचार घेतला होता. माध्यमांचा अस्त्रासारखा वापर करून कशाप्रकारे हिंदूंविरोधी, संघद्वेषी प्रचार करून सत्याची मोडतोड ‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावाखाली खपवली जाते, याची मांडणी त्यात होतीच. त्याचीच एक पुढची कडी म्हणून बरखा दत्तच्या चार मिनिटांच्या फुटकळ व्हिडिओकडे बघावे लागेल. डाव्या विचारांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध असलेल्या एका खाजगी डिजिटल वेबपोर्टलवरून या बरखाबाई ‘न्यूजचे ज्यूस’ काढतात. (हिंदूविरोधी वृत्तविश्लेषणाला कदाचित ‘ज्यूस’ म्हणण्याची ही फेक्युलरांची रीत असावी.) पण, हे ‘ज्यूस’ आणि त्याचा अर्कही साधारण नाही. कारण, हे ‘ज्यूस’ ‘लाल’ रंगाचे आणि चव म्हणाल तर अगदी कडवट हिंदूविरोधाची! एनडीटीव्हीमधील २१ वर्षांची पत्रकारितेची कारकीर्द सोडून ‘न्यूजचे ज्यूस’ काढण्याची वेळ आलेल्या या बरखाबाईंच्या नसानसांत हिंदूद्वेष अगदी भिनलेला. कदाचित, आपण स्वत:ही हिंदू आहोत, याचाही त्यांना फार पूर्वीच विसर पडलेला असावा. असो... तर बरखा दत्त यांनी या व्हिडिओमध्ये नेहमीचीच हिंदूविरोधी टेप वाजवत आपल्या अज्ञानाची, एकांगी पत्रकारितेची टिमकी मिरवली. या त्यांच्याच भाषेतील ‘ज्यूसी’ व्हिडिओमध्ये बरखाबाई त्यांच्याच दृष्टीने ज्वलंत वाटणारा एक सवाल उपस्थित करतात आणि एकतर्फी उदाहरणांतून स्वत:च त्याचे उत्तरही देऊन मोकळ्या होतात. तो सवाल असा की, या देशात खरंच हिंदू अत्याचाराला बळी पडतात का? तेच पीडित आहेत का? या निरर्थक प्रश्नाला लगेचच उत्तराचा मुलामाही मिळतो - ‘इट इज ऑल नॉनसेन्स.’ मग हिंदूंचे विचार संकुचित-एकांगी कसे, तेच कसे इतरांना छळतात, हिंदू कसे ढोंगी याची या बरखाबाई क्षुल्लक उदाहरणांतून मांडणी करून आपला ‘डावा’ मेंदूच किती चालतो, याची झलक दाखवितात.

 

बरखाबाईंच्या मते, हिंदू समाज या देशात कधीही पीडित होऊच शकत नाही. कारण, भाजप आणि काँग्रेसची मदार या हिंदू व्होटबँकेवर आधारित आहे. या हास्यास्पद प्रथम दाव्यानंतर बरखाबाई चक्क तिहेरी तलाक आणि शबरीमलाच्या न्यायालयीन निर्णयाची हिंदू-मुस्लीम अशी सरसकट तुलना करून मोकळ्या होतात. त्यांच्या मते, तिहेरी तलाकला ऐतिहासिक म्हणून उचलून धरणारे हिंदू मात्र शबरीमला मंदिरातील महिलाप्रवेशाच्या निर्णयाला दुटप्पी भूमिका घेत विरोध करतायत. त्यांचा तिसरा आणि असाच बाष्कळ दावा म्हणजे, मशिदींच्या भोंग्यांच्या ध्वनिप्रदूषणावरून बोंबाबोंब करणारे हिंदूधर्मीय दिवाळीतील फटाक्यांच्या आवाजांवर नियंत्रण करण्याच्या न्यायालयीन निर्णयाचा मात्र विरोध करतात. या तीन मुख्य उदाहरणांचा कीस पाडून झाल्यानंतर हिंदू कसे राजकीयदृष्ट्या खंबीर, आक्रमक आणि धीट आहेत, पण पीडित नाहीत, हे स्वकल्पित प्रमेय सिद्ध करून बरखाबाई ‘ज्यूस’ काढून झाल्याची धन्यता मानतात. खरं तर बरखाबाईंच्या एकाही दाव्यात पुरेसे तथ्य नाही. हिंदूद्वेषापोटीच्या जळजळीतून दिलेली ही आधारहीन उदाहरणे त्यांच्या वृत्त मूल्यांचे खरे मूल्य दाखविणारीच. कारण, तिहेरी तलाक आणि शबरीमला या दोन्ही न्यायालयीन प्रकरणांची आणि निकालांची मुळात तुलनाच होऊ शकत नाही. तिहेरी तलाकचा मुद्दा हा अधिक गंभीर, मुस्लीम महिलांच्या हक्कांचे हनन करणारा आणि मोठ्या समुदायाला प्रभावित करणारा विषय. पण, शबरीमलाचा मुद्दा हा केवळ एका मंदिराच्या प्रवेशापुरता आणि तोही धार्मिक परंपरांमुळे संवेदनशील ठरतो. तेव्हा, अशाप्रकारे उगाच न्यायालयाचे दोन धर्मांशी निगडित, दोन वेगळे निकाल दाखवून जनतेची दिशाभूल करणे म्हणजे बरखाबाईंची बौद्धिक दिवाळखोरीच. १९९९च्या कारगिल युद्धाच्या कव्हरेज नंतर प्रकाशझोतात आलेल्या या बरखाबाईंनी २००२च्या गुजरात दंगलीदरम्यानही असेच हल्लेखोरांचे हिंदू-मुस्लीम धार्मिक वर्गीकरण करून धर्मद्वेष भडकवला होता. इतकेच काय तर २००८च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळीही ‘२४ तास कव्हरेज’ च्या नावाने बरखाने सनसनाटी निर्माण करून उलट पाकमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना अप्रत्यक्ष मदत केल्याचे अजूनही जनता विसरलेली नाही. नीरा राडिया टेप प्रकरणीही याच बोल्ड, बिनधास्त बरखाचे नाव समोर आले होतेच. पण, त्याचा ना साधा खेद, ना खंत...

 

आणि आता राहता राहिला मुद्दा दिवाळीच्या फटाक्यांचा आणि मशिदीवरील भोंग्यांचा... तर न्यायालयाच्या आदेशानंतरही मशिदीवरील भोंगे अजूनही शांत झालेले नाहीत की त्यामुळे कोणाला अटक झाल्याचेही ऐकिवात नाही. फटाके हे फक्त दिवाळीचे चारच दिवस वाजवले जातात. त्यातही न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या शेकडो जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे बरखाबाईंचा हा ‘आवाजी’ मुद्दा सर्वार्थाने फुसका बारच ठरतो. हिंदूंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी इतर फेक्युलरांप्रमाणे बरखाबाईंनीही अखलाख आणि दादरीच्या घटनेची ‘री’ ओढलीच. गोरक्षकांमुळे मुसलमानांच्या हत्येत वाढ झाल्याची कुठली तरी आकडेमोड अगदी बिनधास्तपणे त्यांनी आलेखात उतरविली. पण, या बरखाबाईंना याच देशातील हिंदूंवर अगदी मुघलांच्या काळापासून झालेल्या निर्घृण हत्यांचे असेच आकडे तरी देता येतील काय? इतिहासाचे सोडा, पण हल्लीच्या काळातही अनुसूचित जाती-जमाती, वनवासी यांच्या हत्यांचे रक्त नेमके कोणाच्या हाताला माखलेले? कर्नाटकच्या किनारी प्रदेशात मुसलमानांकडून झालेल्या हिंदूंच्या हत्या, केरळमधील स्वयंसेवकांचे खून आणि बंगालमधील दीदींच्या गुंडांचे हिंदूंवरील अत्याचार हे विषय तर बरखाबाईंच्या साधे वार्तांकन यादीतही नाहीत. गोध्रा हत्याकांडावेळी कारसेवकांचे गेलेले बळी, मुंबई दंगलीत हिंदूंना भोगाव्या लागलेल्या मरणयातना तर या बरखाबाईंच्या खिजगणतीतही नसाव्यात.

 
रझा अकादमीच्या मुंबईमधील मुस्लीमधार्जिण्या मोर्च्याने थेट पोलिसांवर केलेला हल्ला असो वा सरकार विरोधाच्या नावाखाली भडकवलेली दंगलसदृश परिस्थिती, त्याविषयी या पुरोगामी पत्रकारांनी कधी ‘ब्र’ही काढला नाही. मग केवळ कुणा एका धर्मियांविरोधातील हत्या, अत्याचारांचा बरखासारख्या या डाव्या विचारसरणीच्या पत्रकारांना एवढा पुळका का? की, जे हिंदू बहुसंख्येने या देशात आहेत, ते अगदी सुरक्षित आणि सत्ता उपभोगणारे म्हणून त्यांच्याकडे उलट्या चष्म्यातून पाहण्यात काय हशील? पण म्हणतात ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, यांचीही तसलीच गत. याच तथाकथित विद्वान पत्रकारांनी किडलेल्या काँग्रेसी खोपडीतून निघालेल्या ‘हिंदू दहशतवाद’, ‘हिंदू तालिबान’ वरही असाच आगडोंब माजवला होता. ‘दहशतवादाला रंग नाही, धर्म नाही, नॉट ऑल टेररिस्ट्स आर मुस्लिमस्म्हणून कंठशोष करणाऱ्या याच बरखासारख्या पत्रकारांनी मात्र ‘हिंदू टेरर’ ला जात्याच टार्गेट केले. जे घडलेच नाही, तेही घडवले. पण, पोलखोल झाल्यानंतरही यांच्या रक्तातच भिनलेला हिंदूद्वेष काही विरलेला नाही. हिंदूंना सवाल विचारण्यात, आरोपीच्या पिंजऱ्यात वारंवार उभे करणाऱ्या या बरखाबाईंना कधी मंदिरांप्रमाणे चर्च, मशिदींवर सरकारी नियंत्रण का नाही? हजला अनुदान, मग अमरनाथ-वैष्णोदेवी या हिंदूंच्या यात्रेला मदत का नाही? पटेलांच्या-शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सरकारवर ताशेरे ओढणाऱ्या या बरखाबाईंना टिपू सुलतानची जयंती साजरी करणाऱ्या कर्नाटक सरकारला जाब विचारण्याची हिम्मत आहे का? तर नाही. कारण, हे प्रश्न त्यांच्यालेखी ‘नॉनसेन्स’ ठरावेत. कारण, ते फक्त हिंदूंसाठीच काय तो ‘सेन्स’ असणारे आणि बाकीच्यांसाठी ‘नॉनसेन्स’च! त्यामुळे बहुसंख्य हिंदूंच्याच देशात हिंदूंना सर्वार्थाने लक्ष्य करण्याची ही फेक्युलर मानसिकता देशाच्या एकात्मिक मूल्याला छेद देणारी आहे, यात तिळमात्रही शंका नसावी. परंतु, पत्रकारितेच्या चौथ्या स्तंभाच्या आड धार्मिक द्वंद्व पसरविणाऱ्या, विषवल्ली पेरणाऱ्या या माध्यमधेंडांचा खरा चेहरा जनतेसमोर वेळोवेळी आणलाच पाहिजे. कारण, डोळ्यांसह एकूणच मेंदूला झापडं लावून सुरू असलेली यांची अशी ही ‘करेजवाली’ पत्रकारिता आजच्या डिजिटलयुगातही फार काळ तग धरणार नाहीच.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@