काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला रोखण्यासाठी समविचारी पक्षांनी भाजपासोबत यावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |

खडसेंच्या प्रश्नावर खा. दानवेंचा त्रागा


 
जळगाव, 10 नोव्हेंबर
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला रोखायचे असेल, तर शिवसेनेसह समविचारी पक्षांनी आमच्यासोबत आले पाहिजे ही भाजपाची भूमिका असल्याचे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांनी केले.
 
 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातर्फे महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांचा आढावा घेण्यात येत आहे. त्याच्या दुसर्‍या टप्प्यात खा. दानवे-पाटील जळगाव जिल्ह्यात आले असता, जळगाव येथील भाजपा कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रपरिषदेत बोलत होते. खा. ए. टी. नाना पाटील, जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आ. सुरेश भोळे, आ. स्मिता वाघ, माजी मंत्री एम. के. अण्णा पाटील, जि. प. शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे आदी उपस्थित होते.
 
 
मतदारसंघ दौर्‍याची माहिती देऊन खा. दानवे-पाटील म्हणाले की, भाजपाने गेल्या चार वर्षांत पायाभूत सुविधा, शेतकर्‍यांना कर्जमाफी, दुष्काळी स्थिती जाहीर करण्यात तत्परता दाखविली आहे मात्र, गेली 25 वर्षे सत्तेत राहूनही आपण राज्याचा विकास करू शकलो नसल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्षात आल्याने आता ते भाजपाला विरोध करीत आहेत.
 
निवडणुकीत मतांचे विभाजन टाळण्यासाठी शिवसेनेसह समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे. पक्ष म्हणून सेनेची भूमिका वेगळी आहे मात्र, सरकार म्हणून त्यांच्यासोबत आमचे मतभेद नाहीत, असा दावा त्यांनी केला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे श्रीराम मंदिरासाठी अयोध्येला जात असल्याचे त्यांनी स्वागत केेले.
 
खासदारांच्या रिपोर्ट कार्डबाबत पक्षाने सर्वेक्षण केलेले नाही. त्यामुळे याबाबतच्या बातम्या निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 48 लोकसभा व 288 विधानसभा मतदार संघांमध्ये पक्षाने पूर्णवेळ विस्तारक नेमले आहेत. 92 हजार बुथबांधणीचे काम सुरू असून, 82 हजार ठिकाणी बुथप्रमुखांची नियुक्ती केली असल्याचे त्यांनी सांगितले.

खडसेंच्या प्रश्नावर खा. दानवेंचा त्रागा
 
माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या पुनर्वसनाबाबत प्रश्न विचारला असता, त्यांच्यावरील आरोप अजून सिध्द झालेले नाहीत. बेछूट आरोप करण्यात आले आहेत.
 
प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर बघू, अशी भूमिका खा. दानवे-पाटील यांनी मांडली. त्यावर न्यायालय आपला निर्णय देईलच परंतु पक्ष म्हणून आपली काय भूमिका आहे, असे विचारले असता खा. दानवे-पाटील यांनी त्रागा व्यक्त करीत आम्हाला आमची पार्टी चालवू द्या, असे उत्तर दिले. येत्या निवडणुकीत शिवसेना सोबत न आल्यास पक्षाची भूमिका काय असेल? या प्रश्नावरही नेमके उत्तर देणे त्यांनी टाळले.
@@AUTHORINFO_V1@@