सागराच्या उदरात... भाग १३

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018   
Total Views |



 
 
मागील लेखात आपण नद्यांची व हिमनद्यांची माहिती घेतली. या लेखात आपण सागर व महासागरांची माहिती घेणार आहोत. आजच्या लेखाचे नाव ‘सागराच्या उदरात’ या मराठी पुस्तकावरून ठेवण्यात आले आहे.
 

समुद्र! अनेक साहित्यिकांचा व वैज्ञानिकांचा आवडीचा विषय. असे म्हणतात की, आपल्याला अवकाशाविषयी जेवढी माहिती व ज्ञान आहे, त्याच्या तुलनेत फारच कमी ज्ञान आपल्याच समुद्रांबद्दल आहे. समुद्रात कितीतरी अशी आश्चर्ये आहेत ज्यांचा अजून शोधच काय, त्यांचा गंधदेखील आपल्याला लागलेला नाही. बऱ्याच प्राचीन संस्कृतींचे भग्नावशेष समुद्रातून मिळालेले आहेत. जगातील कितीतरी मोठे अपघात समुद्रातच झालेले आहेत. त्यामुळे समुद्राचा सगळ्या अंगांनी विविध वैज्ञानिकांकडून अभ्यास सुरू असतो. आपण भौगोलिक व भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या समुद्राकडे बघू. ‘प्लेट टेक्टॉनिक’ हा सिद्धांत जेव्हा मी सांगितला होता (पाहा- भूकंपाशी दोन हात करताना) तेव्हा त्याबद्दल आणखी माहिती पुढील एका लेखात येईल, असे म्हटले होते. समुद्रांबद्दल माहिती घेण्याच्या आधी आपण या ‘प्लेट्स’बद्दलच माहिती घेऊ. पृथ्वीचा सर्व पृष्ठभाग हा खंडीय ठोकळ्यांमध्ये विभागला गेलेला आहे, हे आपल्याला माहीतच आहे. हे सर्व भाग कुठे ना कुठेतरी एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे दोन प्लेट्समध्ये सरहद्द (plate boundary) तयार झालेली आहे. या सरहद्दींचे प्रकार बघू.

 

. सागर-सागर सरहद्द (ocean- ocean boundary) - या प्रकारात सरहद्दीच्या दोन्ही बाजूंना ‘सामुद्रिक ठोकळा’ (oceanic plate) असतो. यामध्ये जो सामुद्रिक ठोकळा दुसऱ्यापेक्षा जड असेल, तो दुसऱ्याच्या खाली जातो. त्यामुळे ‘सबडक्शन झोन’ तयार होतो. उदाहरणार्थ, इंडो-ऑस्ट्रेलियन प्लेटचा उत्तर भाग व एशियन प्लेटचा दक्षिण भाग (ज्याला ‘बर्मा मायनर प्लेट’ असेही म्हणतात). यात इंडो-ऑस्ट्रेलियन प्लेट जड असल्यामुळे ती एशियन प्लेटच्या खाली जाऊन ‘सबडक्शन झोन’ तयार झाला आहे. यामुळे येथे सारखेच भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात. उदाहरणार्थ - २००४ चा अंदमानचा भूकंप, टोबा, क्रॅकाटोआ यासारखे ज्वालामुखी.

 
 

 
 

सागर-सागर सरहद्दीमुळे निर्माण झालेला सबडक्शन झोन

 

. सागर-खंड सरहद्द (ocean- continent boundary) - या प्रकारात सरहद्दीच्या एका बाजूला सामुद्रिक ठोकळा, तर दुसऱ्या बाजूला खंडीय ठोकळा असतो. यापैकी सामुद्रिक ठोकळा हा कायमच जड असल्यामुळे तो खंडीय ठोकळ्याच्या खाली जातो व तेथेही ‘सबडक्शन झोन’ तयार होतो. उदाहरणार्थ, अमेरिकेचा पश्चिम किनारा व प्रशांत महासागराचा पूर्व किनारा. प्रशांत महासागराची प्लेट अमेरिका खंडाच्या प्लेटखाली जाते. त्यामुळे हा भागही भूकंपीय व ज्वालामुखीयदृष्ट्या संवेदनशील आहे. उदाहरणार्थ - १९६४ चा अलास्कामधील भूकंप, माऊंट सेंट हेलेस, माऊंट रेनिअर यासारखे ज्वालामुखी.

 

. खंड-खंड सरहद्द (Continent – Continent Boundary) - या प्रकारामध्ये सरहद्दीच्या दोन्ही बाजूंना खंडीय प्लेट्स असतात. दोन्ही प्लेट्स या तुलनेने समान वजनाच्या असल्याने कोणतीच प्लेट दुसऱ्याखाली जात नाही व येथे ‘सबडक्शन झोन’ तयार होत नाही. त्याऐवजी दोन्ही प्लेट्सचा वरचा भाग एकमेकांवर दाबला जाऊन वर उचलला जातो व यामुळे ‘वळी पर्वत’ तयार होतात. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हिमालय. भारतीय उपखंड हे आशियाई भूखंडाला येऊन चिकटल्यामुळे हा पर्वत तयार झाला आहे. भारतीय उपखंड हे आशियाई भूखंडाच्या दिशेने सरकत असल्यामुळे या पर्वताची उंची ही सदैव वाढतेच आहे. अशा पर्वतांमधील खडकांमध्ये खूप ताण (stress) असल्यामुळे येथे भूकंपांची शक्यता व तीव्रता खूप आहे. मात्र, ज्वालामुखी एकही नाही. उदाहरणार्थ - २०१५ चा नेपाळचा भूकंप. प्लेट टेक्टॉनिक्सचा अभ्यास समुद्रांच्या प्रकरणात महत्त्वाचा आहे. कारण, जगातील बऱ्याचशा प्लेट्सच्या सरहद्दी या समुद्रांतर्गतच अस्तित्वात आहेत. आता समुद्राबद्दल माहिती घेऊ.

 

 
 

दोलनकारी लाट (ऑस्किलेटरी वेव)

 

समुद्र किंवा सागराची शास्त्रीय व्याख्या ही खाऱ्या पाण्याचे प्रचंड जलाशय अशीही करता येते. समुद्राची खोली साधारण चार किलोमीटरपर्यंत असते. सागरामध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू तसेच विविध भूस्तर असतात. समुद्राच्या विविध गोष्टी शिकण्यासाठी विविध विद्याशाखा अस्तित्वात आहेत. समुद्राचा उगम, त्यांची कार्यपद्धती इत्यादी गोष्टींचा अभ्यास करण्याला ‘ओशनोग्राफी’ (oceanography) असे म्हटले जाते. समुद्रांतर्गत जीवजंतूंच्या अभ्यासासाठी समुद्री जीवशास्त्र (marine biology), तर समुद्रतळावरील भूगर्भाच्या अभ्यासासाठी समुद्री भूशास्त्र (marine geology) अशा विज्ञानशाखा अस्तित्वात आहेत. जमिनीपासून समुद्र तत्काळ सुरू होत नाही. समुद्राला हळूहळू उतार मिळत जातो व हळूहळू तो खोल होत जातो. जेथे समुद्र जमिनीला येऊन मिळतो त्या भागाला किनारा म्हणतात. किनाऱ्यापासून खोल समुद्रापर्यंत समुद्राला दोन प्रकारचे उतार असतात. त्यांची माहिती घेऊ.

 

.भूखंड मंच (continental shelf) - याचा उतार फारच कमी असतो. हा भाग किनाऱ्यापासून फारच थोड्या अंतरावर किंवा कधीकधी शेकडो किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेला असतो.

 

. भूखंड उतार (continental slope) - हा भाग भूखंड मंचाच्या शेवटी सुरू होतो आणि समुद्रतळापर्यंत जातो. या भागाचा उतार भूखंड मंचाच्या तुलनेत बराच तीव्र असतो.

 

याशिवाय खालील वैशिष्ट्येही समुद्रात सापडतात.

१. भूखंड उंचवटा (continental rise) - काही वेळा भूखंड उतारावरील थोडासा भाग हा वर आलेला असतो. या भागाला ‘भूखंड उंचवटा’ असे म्हणतात.
 

. मध्यसामुद्रिक पर्वतरांग (mid oceanic ridge) - समुद्रतळावर फार मोठ्या आकाराच्या पर्वतरांगा अस्तित्वात आहेत. त्यांना ‘मध्यसामुद्रिक पर्वतरांगा’ असे म्हणतात.

 

. सामुद्रिक उंचवटे (oceanic rise) - ‘सामुद्रिक उंचवटे’ म्हणजे समुद्रतळावरील असे उंच भाग, जे मध्यसामुद्रिक पर्वतरांगेचे भाग नाहीत.

 

. समुद्रांतर्गत दऱ्या (submarine canyon) - जसे समुद्रतळाशी पर्वत आहेत, तशाच दऱ्याही आहेत. बऱ्याचशा दऱ्या या समुद्रांतर्गत प्रवाहांमुळे भूखंड मंचाची झीज होऊन निर्माण होतात. काही वेळा समुद्रांतर्गत दऱ्या या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील दऱ्यांचेच समुद्रातील भाग असतात. उदाहरणार्थ, जेव्हा नदी समुद्राला मिळते, तेव्हा तिच्या प्रवाहाच्या बरोबरच ती ज्या दरीतून वाहत आली ती दरीही समुद्रात येते व नंतर खोलवर जाते.

आता आपण विविध प्रकारच्या लाटांचा अभ्यास करू. आपण समुद्रावर फिरायला गेलो की, समुद्राच्या लाटांमध्ये डुंबण्याचा आनंद घेत असतो. या लाटांचेही दोन महत्त्वाचे प्रकार पडतात

 

. दोलनकारी लाटा (oscillatory waves) - या लाटा खोल समुद्रात असतात. या लाटांमधील पाण्याचे कण हे गोलाकार कक्षेत फिरत असतात. या लाटा जेव्हा किनाऱ्यावर येतात, तेव्हा त्यांची कक्षा तुटते व अर्धचंद्राकार लाटा तयार होतात. या लाटांना सर्फ (Surf) असे म्हणतात. सर्फिंगचा खेळ अशा लाटांवरच खेळला जातो.

 

. संक्रामक लाटा (Translator waves) - या लाटा मुख्यतः उथळ समुद्रात सापडतात. जेव्हा दोलनकारी लाटा फुटतात तेव्हा बऱ्याचदा त्यांचे रूपांतर या प्रकारच्या लाटांमध्ये होते.

 

लाटांप्रमाणेच काही प्रवाहही समुद्रात असतात. ते खालीलप्रमाणे –

 

. समुद्रतटीय प्रवाह (littoral currents) - हे प्रवाह किनाऱ्याला समांतर वाहतात.

 

. परतीचे प्रवाह (Rip currents) - जेव्हा लाट किनाऱ्यावर येऊन फुटते, तेव्हा जे पाणी समुद्रात परत जाते त्याला ‘परतीचा प्रवाह’ म्हणतात.

 

सागराच्या उदराचा एवढा अभ्यास केल्यावर पुढील लेखात आपण सर्व प्रमुख समुद्र व महासागरांची माहिती घेऊ.

 

संदर्भ – Textbook for Engineering and general geology, Parbin singh, katson publishing house

 

(लेखक हे एका अभियांत्रिकी महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असून अमेरिकेतील एका नामांकित विद्यापीठातून भूशास्त्रीय अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षणही घेत आहेत. तसेच अमेरिकेतील त्यांच्यासहकाऱ्यांबरोबरच तेथेच त्यांचे शोधनिबंधही प्रसिद्ध झाले आहेत.)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@