कौरची ‘अ’शक्य खेळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 


 
 
 
सर्वोच्च न्यायालयाने या दिवाळीत फटाक्यांवर बंधने घातली. त्यामुळे हिरमुसलेले सगळे अखेर भारतीय क्रिकेटच्या मैदानावरील आतशबाजीकडेच डोळे लावून बसले होते. क्रिकेटप्रेमींसाठी ही दिवाळीची सुट्टी खरी आनंददायी होती. कारण, एकीकडे पुरुष संघाने वेस्ट इंडिजची केलेली दैना आणि दुसरीकडे महिला संघाची विश्वचषकाच्या स्पर्धेत अव्वल राहण्याची लढाई. त्यातच मग दिवाळी दणक्यात सुरुवात केली ती रोहित शर्माने. वेस्ट इंडिज विरोधात जे काही सुतळी बॉम्ब त्याने फोडले, त्यामुळे यावर्षी फटाके न फोडताही रोहितच्या षटकारांनी ती भारतीय क्रिकेटप्रेमींची कसर भरून काढली. पण, यातच नेहमी ‘अंडरडॉग’ समजला जाणारा भारतीय महिला क्रिकेट संघही काही कमी नाही, सध्या वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात आतषबाजीची होती नव्हती ती सगळी कसर भरून काढली आणि फ्रंटफूटवर येऊन पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड संघाची दाणादाण उडवून दिली ती कर्णधार ‘हरमनप्रित कौर’ हिने. केवळ ५१ चेंडूंत १०३ धावांची आतशबाजी केली. ८ षटकार आणि ७ चौकारांचा वर्षाव केला आणि विश्वचषकात इतिहासाची नोंद केली. २० षटकांच्या खेळात शतक ठोकणारी हरमनप्रीत कौर एकमेव खेळाडू ठरली. विशेष म्हणजे तिने उरलेल्या फक्त ३० धावा एक आणि दोन धावा करत केल्या. हे वाचून आपल्याला नेहमीचंच वाटेल, कारण रोहित असो वा विराट यांच्यासाठी आणि अर्थात क्रिकेटप्रेमींसाठीही हे काही नवीन नाही. पण, फिट नसताना तंबूत बसून फक्त संघाचा खेळ बघत न बसता हरमनप्रित स्वत: मैदानात उतरली ती पण तेव्हा, जेव्हा संघाला तिची खरी गरज होती. पहिल्याच पाच षटकांत चार खेळाडू बाद झाल्यानंतर हिच ‘अनफिट’ हरमनप्रित मैदानात आली. कोणत्याही खेळात फिटनेस फार महत्त्वाचा असतो, मग तो खेळ क्रिकेट असो किंवा कबड्डी. मग या फिटनेसमध्ये पुरुष आणि स्त्री सगळे खेळाडू समान. सामन्याच्या काही तास आधीच कौरला पोटदुखीचा त्रास व्हायला लागला, एवढा की तिला उभंसुद्धा राहवत नव्हतं, पण सलामीच्या फलंदाजांनी हात टेकल्यानंतर हरमनप्रीतला मैदानावर उतरावंच लागलं. ती नुसती मैदानात आली नाही, तर न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर चांगलीच बरसली. धावता येऊ नये म्हणून ती फक्त षटकार आणि चौकारांचा वर्षाव करत राहिली. कौर काही थांबली नाही. शेवटी १९४ धावांपर्यंत संघाने मजल मारल्यावरच ती थांबली आणि विश्वचषकात पहिल्याच सामन्यात खणखणीत शतक ठोकणारी पहिली खेळाडू ठरली आणि न्यूझीलंडवर ३४ धावांनी मात करत स्पर्धेची मोठ्या धडाक्यात सुरुवातही तिने केली. आता हे कौर नावाचं वादळ प्रतिस्पर्धींना कसं नेस्तनाबूत करतं, हे आगामी सामन्यात कळेलच...
 

बजरंगाची कमाल...

 

खाशाबा जाधव यांच्यामुळे भारताने कुस्तीत सुवर्णदिवस पाहिले आणि त्यानंतर कुस्ती हा खऱ्या अर्थाने ‘खेळ’ झाला. मग त्यानंतर सुशीलकुमार असो किंवा योगेश्वर दत्त, या दोघांनीही खाशाबांचा आदर्श पुढे नेत ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याची किमया केली. यांचाच कुस्तीचा वारसा पुढे घेऊन जाणारे सध्या अनेक कुस्तीपटू भारतीय संघात आहेत, पण या सगळ्यांमधला अवलिया म्हणजे बजरंग पुनिया. कारण, त्याला सतत जिंकण्याची भूक असते आणि या भुकेपोटीच त्याने ६५ किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. या वर्षात पाच पदके जिंकणाऱ्या २४ वर्षीय बजरंग पुनिया यूडब्ल्यूडब्ल्यूच्या यादीत ९६ गुणांसह प्रथम क्रमांकावर विराजमान झाला. याआधी मॅटबाहेर जास्त गाजलेले बजरंगचे नाव त्याने स्वतःच्या किमयेने पुन्हा एकदा कुस्तीत सिद्ध केले. त्यातच आताच पार पडलेल्या जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा बजरंग हा एकमेव खेळाडू ठरला. या स्पर्धेत त्याला सुवर्णपदक जिंकता आले नसले तरी, २०१८ हे वर्ष बजरंगसाठी खास ठरलं. कारण, एकामागोमाग एक सुवर्णझेप तो घेत होता, राष्ट्रकुल तसेच आशियाई स्पर्धेतही त्याने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. पण, जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तरीही ९६ गुणांच्या जोरावर बजरंग ६५ किलो वजनी गटात अव्वल ठरला. विशेष म्हणजे, या क्रमवारीत पहिल्या दहामध्ये येणारा बजरंग हा एकमेव भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. त्यामुळे २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी तो सुवर्णपदकाच्या शर्यतीतील अव्वल खेळाडू मानला जातो. यासाठी त्याचे गुरू आणि ऑलिम्पिक पदक विजेते योगेश्वर दत्त यांनी निवृत्ती घेत आपल्या शिष्याला सुवर्णपदकासाठी तयार करण्याचा विडा उचलला. मात्र, बजरंगसाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणे तेवढे सोपे जाणार नाही, कारण जपानच्या टाकुटोने चॅम्पियनशीप स्पर्धेत बजरंगच्या हातातून सुवर्णपदक हिसकावले होते, त्यामुळे २०२० च्या ऑल्मिम्पिकसाठी बजरंगला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तूर्तास बजरंगसाठी हा हंगाम शानदार राहिला यात काही वाद नाही, मात्र येणाऱ्या स्पर्धांमध्ये केवळ एक नाही तर पहिल्या दहांमध्ये भारताचे किमान पाच खेळाडू तरी असावे, तेव्हा कुठे खाशाबा यांनी सुरू केलेल्या पर्वाला चांगले दिवस येतील...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@