अठरा दिवसानंतरही ‘तो’ शिक्षक मोकाटच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |

संस्थाचालकासह, पोलिसांचे संशयित आरोपीला अभय ?; वाघळीत विद्यार्थिनीस शिक्षकानेच दाखविली होती अश्लील चित्रफित

चाळीसगाव, 10 नोव्हेंबर
 
तालुक्यातील वाघळी येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनीस अश्लील चित्रफित दाखविणारा शिक्षक तथा शिक्षण सभापती बंटी ठाकूर याच्यावर गुन्हा दाखल होऊन अठरा दिवसानंतरही तो अद्यापही मोकाटच आहे.
 
या प्रकरणातील संशयित आरोपीला पकडण्यात पोलीस यंत्रणा चालढकल करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. याबाबत संबंधित संशयित शिक्षकावर गुन्हा दाखल होऊन दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतरही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.त्यामुळे त्या शिक्षकाला संस्थाचालकासह पोलिसांकडून अभय मिळाले आहे का? अशी चर्चा सुरू आहे.
 
 
या प्रकरणानंतर तब्बल 10 ते 12 दिवसानंतर या विद्यालयातील सहा शिक्षकांच्या बदल्या संस्थाचालकांनी केल्या आहेत. मात्र संशयित आरोपी शिक्षक बंटी ठाकूर याच्यावर संस्थेने अद्यापही कुठलीही कारवाई केलेली नाही.
 
त्यामुळे वाघळीकरांचा रोष कायम आहे. आरोपीच्या अटकेचे कारण पुढे करीत संस्थाचालकांनी संबंधित शिक्षकाला अभय दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या संतापात अजूनच भर पडली आहे.
 
याप्रकरणात चर्चेत आलेल्या आणखी एका शिक्षकांचीही संस्थेने बदली केली आहे. त्या शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी होती. मात्र त्या शिक्षकावर कारवाई होण्याऐवजी फक्त बदली करण्यात आल्याने ग्रामस्थांत नाराजीचा सूर आहे.
 
 
संस्थाचालकांची अद्यापही पीडित कुटुंबियांची घेतली नाही भेट
 
या प्रकरणाला अठरा ते वीस दिवसांचा काळ लोटल्यानंतरही अद्यापही संस्थाचालकांची पीडित कुटुंबियांची भेट घेतलेली नाही. या कुटुंबियांची साधी चौकशी सुध्दा आजपर्यंत केलेली नाही.
 
त्यामुळे संस्थेतील मग्रुरी यानिमित्ताने समोर आली आहे. संस्था त्या शिक्षकावर कारवाई करण्यासाठी धजावत नसल्याने ग्रामस्थांच्या संतापात अजूनच भर पडत आहे.
 
वाघळीकरांची विशेष ग्रामसभेची मागणी
 
संबंधित संस्थाचालक त्या शिक्षकावर कारवाई करीत नसल्याने संस्थाचालकांचा निषेध नोंदविण्यात येणार असून त्यासाठी विशेष ग्रामसभा बोलविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ लोटल्यानंतरही संशयित आरोपीवर संस्था चालकांकडून कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आरोपीला संस्थाचालक पाठिंशी घालत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामसभेची मागणी होत आहे.
घटनेचा गांभीर्याने तपास
 
या घटनेचा गांभीर्याने तपास सुरू आहे. संशयित आरोपीचा भ्रमणध्वनी बंद येत असल्याने तपासातील अडचणी वाढल्या आहेत. मात्र त्याला अटकपूर्व जामीन मिळू नये या पध्दतीने कार्यवाही सुरू आहे.
- प्रशांत बच्छाव, अपर पोलीस अधीक्षक
 
फरार संशयिताचा शोध सुरूच
 
या प्रकरणातील संबंधित फरार शिक्षकाचा शोध सुरू आहे. त्याच्या नातेवाईकांकडून शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. संशयित आरोपींचा अटकपूर्व जामीन सेशन कोर्टाने फेटाळला आहे. काळजीपूर्वक तपास सुरु आहे.
- राजेद्र रसोडे, तपासी अधिकारी
 
ग्रामस्थांच्या मागणीनुसार विशेष ग्रामसभा
 
ग्रामस्थांनी ग्रामसभेची मागणी केल्यास विशेष ग्रामसभा घेण्यात येईल. गावाचा प्रथम नागरिक म्हणून गावांची समस्या ती माझी समस्या असेल. याबाबत विशेष ग्रामसभा घेण्यास माझी हरकत नाही.
- विकास चौधरी, सरपंच वाघळी
 
...तर त्या शिक्षकाला निलंबित करणार
 
वाघळी माध्यमिक विद्यालयात घडलेल्या या प्रकारानंतर सहा शिक्षकांसह मुख्याध्यापकाची बदली केली आहे. त्या शिक्षकाला जामीन मिळाल्यास शिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रार करून त्यास निलंबित करू .
- अरूण निकम, सचिव, राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ
 
@@AUTHORINFO_V1@@