‘आम्ही विचारपूर्वक सत्त्याग्रह केलाय, पळून जाणार नाही !’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |

जळगावचे निष्ठावंत कार्यकर्ते गजाननराव जोशी यांचे रोखठोक उत्तर : रस्त्यावर उतरत घोषणा देत उठवला आवाज


 
जळगाव, 10 नोव्हेंबर 
 
जळगावहून अकोला कारागृहात रेल्वेने रात्री नेतांना सतर्कता म्हणून (आणि नोकरी टिकविण्याच्या प्रयत्नात) पोलिसांनी दोरखंडाने बांधून नेण्याचा मनसुबा आखला होता...तेव्हा आम्ही म्हणालो, विचारपूर्वक आम्ही सत्त्याग्रह केला आहे, पळून जाणार्‍यातले आम्ही नाहीत...,असा रोमांचक अनुभव आहे, जळगावचे तत्कालीन भारतीय जनसंघाचे (भाजपचा पूर्वपक्ष) निष्ठावंत व सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगराध्यक्ष गजानन पन्नालाल जोशी यांचा.
 
आणीबाणीच्या दहशतीच्या काळात कितीही दिवस तुरुंगवास होणारच हे ठरलेले...तरीही 21 नोव्हेंबर 1975 ला दुपारी भर रस्त्यावर घोषणा देत सत्त्याग्रह केला होता त्यांनी.
 
ते मित्र परिवारात गजूशेठ, गजूभाऊ म्हणूनही सुपरिचित आहेत. शास्त्रीय गायन, नाट्यसंगीत, जुनी मराठी-हिंदी गाणी, भाषणं ऐकण्याची आणि आवेशपूर्ण भाषण करण्याचीही त्यांना आवड आहे. समयोचित शेर-शायरी सादर करीत वाहवा मिळवण्यातही त्यांचा लौकिक आहे.
 
सर्वकालिक ज्येष्ठ नेते, कवीहृदयाचे विख्यात वक्ते अटलजींसारख्या कितीतरी नेत्यांच्या सहवास त्यांना लाभला, अनेक निवडणुकांसाठीची रणनिती आखणे आणि कोषप्रमुख या अवघड जबाबदारीतही त्यांनी यशस्वी कामगिरी बजावलेली आहे.
 
भवानी पेठेतील सध्या जेथे रतनलाल सी.बाफना यांची सराफी नवीन फर्म आहे, त्या जागी जी टुमदार हवेली होती, हे त्यांचे मूळ घर. सध्या त्यांचा 11, गणेशकॉलनी येथे रहिवास आहे.
 
त्यांचा जन्म 28 ऑगस्ट 1938 चा...ला.ना.विद्यालयात अकरावीपर्यंत आणि पुढे पुण्यात बृहन्महाराष्ट्र कॉमर्स महाविद्यालयात इंटरपर्यंतचे त्यांचे शिक्षण झाले आहे. (कारण तेव्हा एवढ्या उच्च शिक्षणाची सुविधा जळगावात नव्हती.) नवी पेठेतील बँक स्ट्रीटवरील गणेश बिल्डिंगमधील मे.ओंकारदास बाळाराम जोशी अँड सन्स (कापड दुकान) आणि नवभारत एजन्सी (मशिनरी स्टोअर्स) या फर्मचे ते मालक. त्यांच्या 40 खोल्यांच्या हवेलीतील एकत्र परिवारात 65 सदस्य... वडील पन्नालाल ओंकारदास, काका मिश्रीलाल, चुलत बंधू पुरुषोत्तम मिश्रीलाल, मुरलीधर मोहनलाल आदींचा हा परिवार. सध्या यातील अनेकांचा सागरपार्कच्या पश्चिमेकडील विद्यानगर, जयनगरात स्वतंत्र रहिवास आहे.
 
गजूभाऊ 1965 मध्ये जनसंघात सक्रिय झाले. राजकारणाबरोबरच जळगावच्या सांस्कृतिक व वैचारिक क्षेत्रात अग्रगण्य ठरलेल्या ‘लोकहितवादी मंडळ’चे ते संस्थापक, 1968 मध्ये स्थापन या मंडळातर्फे अनेकदा व वर्धापनदिनी मैफिलू होत. त्यात कितीतरी दिग्गज कलावंतांनी रसिकांची दाद मिळवली आहे.
 
अवघ्या 5 रुपयात 3-3 गायकांना ऐकविण्याचा विक्रमही या मंडळाने केला तर राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेद्वारे जबरदस्त विद्यार्थी वक्ते ऐकवणे आणि घडवण्याचे व्रत मंडळाने चालवले .कितीतरी वर्ष हा दिव्य आनंद सोहळा आठवणारे, अनुभवणारे शेकडो रसिक आहेत. सलग 23 वर्ष ते या मंडळाचे अध्यक्ष राहिले.
 
या स्थानबद्धांकडे स्वयंपाकगृह जणू त्यांच्याकडे सोपवलेले. नंतरच्या टप्प्यात जळगावातील अनेक जण तेथे आले. सकाळी चहा, ज्येष्ठांना हवे तर दूध, कांजी (घाटा), दुपारी ज्वारीची भाकरी, बारापत्तीची भाजी असे. चिखलीचे संघ कार्यकर्ते श्रीकिसन भैरुलाल व्यास यांच्यासह स्वयंपाकघर ही मंडळी सांभाळत असे. गाठीभेटी, गप्पा आणि वाचनालयातील पुस्तकांचे वाचन यात वेळ निघून जाई, स्वत:हून विचारपूर्वक कारावास पत्करल्याने पश्चाताप, घरची आठवण, काळजी नव्हती. घरी परतल्यावर औक्षण झाले.
अपिलात शिक्षा 6 महिन्यावरुन 3 महिन्यांवर...
 
 
नियोजनानुसार दुसर्‍या टप्प्यात 21 नोव्हेंबर 1975 ला दुपारी 12 वाजता घोषणा देत चौघेजण रस्त्यावर उतरले...साने गुरुजी रुग्णालयासमोर गजाननरावांसह पंढरीनाथ वाणी, विश्वास कुळकर्णी, चंद्रकांत सोले यांनी ‘भारत माता की जय, वंदे मातरम्, जयप्रकाश नारायण झिंदाबाद, आणीबाणी मुर्दाबाद‘ अशा घोषणा देत जनतेचा सुप्त राग व्यक्त केला.
 
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कनिष्ठ न्यायालयाने त्यांना 6 महिने कारावास सुनावला. या शिक्षेविरुद्धच्या पुनरावेदनात (अपील) तत्कालीन सहसत्र न्या. मुजुमदार यांनी ही शिक्षा 3 महिने केली.
 
सरकारतर्फे होते अ‍ॅड.श्रीकांत मालते (पुढे चंदिगड उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती, निवृत्तीनंतर आता औरंगाबादला वकिली व्यवसायात) आणि सत्याग्रहींतर्फे विख्यात विधिज्ञ आणि राष्ट्रभक्तांना साथ देणारे (स्व.) अ‍ॅड. रमेश डी. गुप्ते. या राजकैद्यांना पॅसेंजर रेल्वेने अकोला कारागृहात हलवण्यात आले. पूर्ण डबा रिक्त होता. निरोप द्यायला परिवारातील सदस्य अभिमानपूर्वक रेल्वेस्थानकावर आले होते.
लोकप्रियता आणि निकराची झुंज
 
नया पैसाही न लागण्याच्या काळात गजूभाऊ 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. काही काळ नगराध्यक्षपदही मिळाले. 1974 मध्ये तर थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी जनसंघाच्या दीपक चिन्हावर लढवत निकराची झुंज दिली.
 
अटलजींची सोबत...अविस्मरणीय आठवण
 
भाजपच्या स्थापनेनंतर आणि 1984च्या प्रारंभी अटलजींची सभा जळगावच्या जी.एस.मैदानावर दुपारी 3 वाजता झाली. तेव्हा त्यांच्या औरंगाबाद विमानतळ ते जळगाव असा येण्याजाण्याच्या प्रवासाची जबाबदारी गजूभाऊंवर होती.
 
अ‍ॅम्बेसॅडर कारचे मालक-चालक होते ते स्वत: आणि बाजूला होते फ्रंट सीटवर अटलजी...मनमोकळ्या गप्पा करीत सोबत येण्याजाण्याचे ’देवदुर्लभ भाग्य’ त्यांना लाभले. ही दिवसभराची सोबत आणि अनेक दिग्गज नेत्यांच्या भेटी हा आयुष्यातला ‘अविस्मरणीय ठेवा’ ते मानतात. त्यांच्यासमवेत मंचावर होते गजूभाऊ आणि उमेदवार डॉ.गुणवंतराव सरोदे, फर्डे वक्ते धुळ्याचे धरमचंद चोरडिया, पूर्णवेळ कार्यकर्ते चंद्रकांत मेंडकी. प्रास्ताविक स्व.प्रा. शामकांत कुळकर्णी यांनी केले होते.
निवडणुकीत उमेदवार प्रतिनिधी...
 
1977 च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचे कार्यालय सध्याच्या हिमालय ट्रॅक्टर्सच्या जागी (चित्रा चौकाजवळ ) होते, नंतरच्या निवडणुकीत ते डॉ.जे.जी.पंडित यांच्या दवाखान्याजवळ होते. त्याची अवघड धुरा ‘उमेदवार प्रतिनिधी’ या नात्याने त्यांनी जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली.
@@AUTHORINFO_V1@@