देशाचा परकीय चलनसाठा ३९३.१३ अब्ज डॉलर्सवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |



मुंबई: भारताच्या परकीय गंगाजळीत या आठवड्यात १.०५४ अब्ज डॉलर्सची सुधारणा झाली आहे. परकीय चलनसाठा आता ३९३.१३ अब्ज डॉलर्स इतका झाला आहे. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. याआधीच्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात घसरण होत, तो ३९२.०७८ अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता. मागील काही आठवड्यांमध्ये सातत्याने परकीय चलन साठ्यात घसरण होत होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रुपयाच्या मूल्यात होत असलेल्या घसरणीच्या पृष्ठभूमीवर डॉलर्सची विक्री करत होती.

 

एप्रिल महिन्यात परकीय चलनाचा साठा विक्रमी पातळीवर म्हणजे ४२६.०२८ अब्ज डॉलर्सवर पोचला होता. भारताच्या विदेशी चलनाच्या साठ्याने पहिल्यांदाच ४०० अब्ज डॉलर्सची पातळी ओलांडली होती. परंतु, त्यानंतर मात्र त्यात सातत्याने चढ उतार होत आहेत. परकीय गंगाजळीमध्ये महत्त्वाच्या देशांच्या चलनाच्या साठ्याचा महत्त्वाचा हिस्सा असतो. यात अमेरिकी डॉलर्स हा महत्वाचा घटक असतो. अमेरिकेच्या चलना व्यतिरिक्त युरो, पौंड आणि येनचासुद्धा समावेश भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात असतो. या साठ्यात ४८.७७ कोटी डॉलर्सची भर पडून, तो ३६८.१३८ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.

 

सोन्याच्या साठ्यातही वाढ

 

याशिवाय आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे सोन्याचा साठा आहे. सोन्याच्या साठ्यात ३६६.५ दशलक्ष डॉलर्सची वाढ होत, तो या आठवड्यात २०.८८८ अब्ज डॉलर्सवर पोचला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत असलेले विशेष रेखांकन हक्कांमध्ये २ लाख डॉलर्सची घट होत १.४५६ अब्ज डॉलर्सवर पोचले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जून २०१८ अखेरीस ५६६ मेट्रिक टन सोन्याचा साठा होता.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@