भुसावळ नगरपालिकेच्या विशेष सभेत नियोजननवीन 30 घंटागाड्या खरेदी करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |

 
भुसावळ,7 नोव्हेंबर - शहरातील व्यापक स्वच्छतेसाठी 30 नवीन घंटागाड्यांची खरेदी करण्याचे नियोजन नगरपालिकेने केले असल्याची माहिती मंगळवारी झालेल्या विशेष सभेत लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली.
 
जनआधारचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर व नगराध्यक्षांमधील किरकोळ शाब्दिक वाद वगळता सभा शांततेत पार पडली. या सभेत दोन्ही विषयांना मंजूरी देण्यात आली.
 
पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2019 साठी भुसावळ शहराचे तारांकित मानांकन जाहीर करण्यावर चर्चा करणे, तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत भुसावळ शहर ओडीएफ प्लस घोषित करण्याबाबत निर्णय घेण्याच्या दोन विषयांवर मंगळवारी विशेष सभा घेतली.
 
शहराच्या आरोग्याशी निगडीत प्रश्न असल्याने सत्ताधारी आणि विरोधक हा भेद बाजूला सारत विषय समजून घ्यावा, असे आवाहन सभेच्या सुरूवातीलाच नगराध्यक्षांनी केले.
 
यानुसार दोन्ही विषयांचे वाचन होऊन या विषयांना मंजूरी देण्यात आली. शासन निर्णय परिपत्रकानुसार स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत शहर स्वच्छतेबाबत शहराचे एक ते सात पैकी तारांकित मानांकन जाहिर करावयाचे असून 3 तारांकित मानांकन जाहिर करण्यात यावे, असे सभेत ठरवण्यात आले.
 
राज्य शासनाच्या मंजुरीनंतर पुन्हा सभा घेऊन मानांकनाचा ठराव करावा लागेल, अशी माहिती मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी दिली. शहरात सध्या ठेकेदाराच्या घंटागाड्यांतून कचरा संकलन केले जात आहे. आगामी काळात पालिका 30 घंटागाड्यांची खरेदी करणार असून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल असेही सांगितले.
नगराध्यक्षांचा पारा चढला
 
जनआधारचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी शहरातून दररोज 62 ते 68 टन कचरा वाहतूक केली जाते, शहरात मात्र कचरा पडून आहे तर मग वाहतूक होणारा कचरा येतो कुठून? असा प्रश्न उपस्थित केला.
 
यावर नगराध्यक्षांचा पारा चढला. मुळात हा प्रश्न चुकीचा व निरर्थक असल्याचा खुलासा त्यांनी केल्यावर काहीवेळ ठाकूर व सत्ताधार्‍यांमध्ये शाब्दिक वाद झाला.
@@AUTHORINFO_V1@@