आई, वहिनी आणि पत्नी 6 महिन्याच्या बाळाला सोबत घेत मजुरीला जात...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |

साकळीचे धोंडू माळी यांची विदारक आठवण,

आई म्हणाली, माझा मुलगा देशाचे काम करतो, शरण नाही जाणार

जळगाव, 7 नोव्हेंबर - कमवता कारागृहात आणि घरात मोठा परिवार...आई, वहिनी आणि पत्नी 6 महिन्याच्या बाळाला सोबत घेत शेतकामाला जात असत असा संतापजनक व विदारक अनुभव आहे, साकळीचे धोंडू माळी यांचा माझा मुलगा देशाचे काम करतो, शरण नाही जाणार...असेही आई अभिमानाने म्हणायच्या.
 
यावल तालुक्यातील यावल-चोपडा मार्गावरील साकळी हे संघाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे गाव...येथील 8 कार्यकर्ते कारागृहात डांबण्यात आले, त्यात धोंडू देवचंद माळी तथा धोंडूअण्णा हेही होते. सध्या ते विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांताचे पूर्ण वेळ कार्यकर्ते असून महिला विभागाचे पालकत्व त्यांच्याकडे आहे.
 
ते महाजन वाड्यातील रहिवासी,जन्म 1 जून 1945 चा...वडील बंधू लक्ष्मण रात्रशाखेचे कार्यवाह होते. त्यांनी 1960 मध्ये संघाचा प्रथम शिक्षा वर्ग आणि अण्णांनी 67 मध्ये संघशिक्षा वर्ग केला. लक्ष्मण यांचा 67 ला दुदैर्र्वी अंत झाला. अण्णा संघकार्यात जास्त जबाबदारी घेऊ शकले नाहीत, कारण त्यांच्यावर परिवाराची सर्व जबाबदारी आली होती.
 
साकळी, किनगाव, यावलला आठवडे बाजाराच्या दिवशी लालमिरची विक्रीचा आणि अन्य दिवशी साकळीला मुख्य चौकात चहाचे हॉटेल आणि पानटपरीचा व्यवसाय यावर त्यांच्या परिवाराचा प्रपंच अवलंबून होता.
 
25 जून 1975 ला आणीबाणी जाहीर होण्यापूर्वी त्यांच्याकडे तालुका सहकार्यवाहपदाची जबाबदारी होती. संघ शाखा विस्तारासाठी प्रवास, संपर्क सुरुच होता, पण साकळीला नियमित सायंशाखा भरायची.
 
परिवाराचा कर्ता अण्णा कारागृहात गेल्याने इकडे परिवाराची पार वाताहत झाली. आई, पत्नी विजयाबाई , विवाहित 2 मुली मालती दिलीप महाजन (जळगाव) आणि हेमलता विनोद महाजन (द्ल्लिी) होत्या..., त्यातील एकीचे बा़ळ अवघे 6 महिन्याचे, वहिनी भागिरथीबाई आणि भावाची 4 मुलं असा मोठा परिवार होता. नाईलाजास्तव आई, पत्नी व वहिनी अनेकदा 6 महिन्याचे बाळ घेऊन शेतात मजुरीला जात.
 
 
एक वेळ 2 घास पोटात ढकलायचे आणि नंतर रात्री पीठात मीठ टाकून घाटा (पातळ द्रव) प्यायचा, अशी भूक मारण्याची युक्ती घरच्यांनी शोधून काढली होती. ते कारागृहात भेटायला येण्यासाठी तळमळत पण पैशाअभावी मन मारत होते. त्यांना पोस्टकार्डाची आस असे, ते मिळाले की मग त्याचे वारंवार व गल्लीत वाचन होत असे.
 
नाशिकरोडला कारागृहात असताना 16 महिन्यांच्या कारावासात अनेक थोरमहान नेत्यांचा त्यांना सहवास लाभला. त्यात बाबाराव भिङे, यशवंतराव केळकर, प्रल्हादजी अभ्यंकर, बाळासाहेब आपटे, आबाजी थत्ते, बाळासाहेब घटाटे, पंढरपूरचे वा.ना.उत्पात, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, गिरीश बापट यांच्यासारखे महनीय आणि त्यात ताकदीचे मलकापूरचे जनसंघाचे आमदार अर्जुनराव वानखेडे, मुरलीधर दाणेज (पारोळा), भुसावळचे बापू मांडे, चोपड्याचे विठ्ठलभाई गुजराथी आदी तसेच काँग्रेसचे तत्कालीन तरुण तुर्क नेते मोहन धारिया यांना जवळून पाहता, ऐकता आले. स्वत:चे दु:ख, चिंता, काळजी विसरण्याच्या प्रयत्नात अण्णा इतरांची अशीच दु:ख जाणून घेत...मन हलके होई.
 
दिनक्रम असा होता...सकाळी 5 ला उठणे व व्यायाम, खेळ आणि साडेआठला दूध, नाश्ता होई. सकाळी 9 ते 11 या वेळात होमिओपॅथीचा आणि सोलापूरचे दाते शास्त्री यांच्या कडून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास त्यांनी केला.
 
या कालावधीत इकडे साकळीत (स्व.) बुधाभाऊ तायडे हे गावातून धान्य जमा करुन आणून देत, संघाचे प्रचारक (स्व.) नानाराव ढोबळे तर अनेकदा वेश पालटून जळगावहून पायी साकळीला येत असत. घरातल्यांच्या कपड्यांची व्यवस्थाही त्यांनी करुन दिली.
 
 
सर्वसमावेशक व व्यापक सेवाभाव जपा, समाज व देशहिताला प्राधान्य देत सेवाकार्यात सहभाग द्या, असे त्यांचे सर्वांना आवाहन आहे.
‘मला चिंता नाही...तरी माझ्या मुलाला सांभाळून घ्या...’
 
आणीबाणी लादल्यावर विरोधकांचे अटकसत्र सुरु झाले. या हुकुमशाहीसद़ृश स्थितीत इंदिराजींच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तालुक्यात गावोगावी आणीबाणीला विरोध दर्शवणारी पत्रके वाटण्याचे आणि 3 डिसेंबरला सत्याग्रह करण्याचे ठरले...पण पोलीस प्रशासनाला कुणकुण लागलीच...अन् त्याआधीच 29 नोव्हेंबरला अण्णा आणि साकळीतील गोरगरिबांचे तज्ज्ञ डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे डॉ.गोकूळ उखर्डू नेवे (नाना) यांना अटक करण्यात आली, पोलीस त्यांना घेऊन मार्गस्थ होत असतानाही त्यांनी आणीबाणीच्या धिक्काराच्या घोषणा देत सप्तस्वातंत्र्यांचा पुरस्कार केला.
 
आई नवसाबाई (मृत्यू 2005) यांची मनस्थिती विदारक तरीही धिराची होती, ती म्हणाली, ‘तुझ्याबरोबर शांतारामबापू (स्व.शांताराम नानाजी नेवे) आणि डॉ.नाना (स्व. डॉ.गोकुळनाना नेवे) आहेत ना, मला चिंता नाही...’ आईची भावना होती, माझा मुलगा देशाची सेवा करतो, तो अशा सरकारला शरण जाणार नाही...आम्ही पडेल ती कामे करु, घर चालवू...अशी तिची जिद्द राहिली...पण निरोप देतांना दोघांना ती म्हणाली...‘ माझ्या मुलाला सांभाळून घ्या’
@@AUTHORINFO_V1@@