माझे ‘मी’पण घडवताना...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |

 


 
 
 
परिस्थिती माणसाला खूप शिकवते,’ या उक्तीची उदाहरणे आपण भोवताली पाहतो. कुठलीही परिस्थिती हाताळण्याची ताकद मात्र घराघरांतील वातावरणातून, संस्कारांतून उमलत्या वयात मुलांना मिळते. माझी लहान बहीण केवळ १३ वर्षांची असताना, घरातील एक गंभीर परिस्थिती अचानकपणे एकटीने हाताळण्याची वेळ तिच्यावर आली तेव्हा तिने दाखवलेला संयम, सक्रियता, समयसूचकता, पद्धतीतशीर नियोजन आणि प्रगल्भता याने आम्ही कुटुंबीय स्तिमित होऊन गेलो होतो.
 
 
आम्ही तिला घरातले शेंडेफळ समजत असताना, तिच्या संवेदनशील वयात ती मात्र घरातल्या वातावरणातून कितीतरी कौशल्ये कळत-नकळत आत्मसात करत गेली, हे आम्हाला त्या संकटसमयी प्रकर्षाने जाणवले. त्यानंतर माझ्या आणि तिच्या नात्याचा प्रवासही थोरली-धाकटी बहीण कडून मैत्रीकडे वळला. दिवसेंदिवस शहरी-निमशहरी समाजाचा आर्थिक दर्जा वाढत आहे. बहुतांश घरात येणारे दुहेरी उत्पन्न आणि विभक्त कुटुंबपद्धती यामुळे वस्तूंची, सुखसोयींची रेलचेल आहे. त्याचबरोबर सभोवतालची स्थिरता मात्र घटत चालली आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे लांबलेला प्रवास, अपघात, जीवनशैलीसंबंधित अनारोग्य, हिंसक जमावी उद्रेक, सायबर गुन्हेगारी, गटबाजी-गुंडगिरी, भ्रष्टाचार, विकृत अत्याचार, यामुळे रोजच्या आयुष्यात अनेक पेचप्रसंगांना सामोरे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. पालक म्हणून कितीही मनापासून वाटत असले तरी, आपण आपल्या मुलांना या गोष्टींपासून संपूर्ण संरक्षण देऊ शकत नाही. मानवी विकासाची, मानसशास्त्राची अभ्यासक म्हणून मुलांना असे सतत पंखांखाली सुरक्षित ठेवणे मला योग्यही वाटत नाही.
 

मध्यंतरी एक गोष्ट वाचनात आली होती. एका मुलाला बागेतल्या एका झाडावर फुलपाखराचा एक इवलासा कोष दिसला. तो रोज सकाळ-संध्याकाळ त्या कोषाचे निरीक्षण करू लागला. कालांतराने त्या कोषाशी गप्पा मारू लागला. फुलपाखरू कोषातून बाहेर येण्याची वाट पाहू लागला. एका सकाळी कोषाच्या आत त्याला हालचाल जाणवली. कोषाच्या पारदर्शक भिंतीतून त्याला त्याचा इवला मित्र दिसू लागला. मित्राची कोष उसवण्यासाठी चाललेली धडपड जाणवू लागली, मिटवून ठेवलेल्या पंखांची कष्टप्रद फडफड दिसू लागली. काही काळ हे नाट्य पाहिल्यानंतर मुलगा अस्वस्थ होऊ लागला. त्याला वाटले की, आपला मित्र अडकून पडलाय. त्याला मदतीची गरज आहे. अजून काही क्षण संयम ठेवल्यानंतर मात्र न राहवून त्याने मदतीचा हात पुढे केला. अलगद हातांनी त्याने तो कोष उसवला; त्यापेक्षाही मऊ हातांनी आपल्या इवल्या मित्राला हळुवारपणे बाहेर काढून कुंडीत ठेवले आणि अनिमिष नेत्रांनी त्याच्याकडे पाहत राहिला. फुलपाखराने पंख फडफडवले, थोडी हालचाल केली, उडण्याचा प्रयत्न केला आणि ते पुन्हा थकून पडून राहिले. दोन-तीन-चार-पाच वेळा त्याने हीच धडपड केली. मग मात्र त्याला हालचाल करणेही अवघड होऊन गेले. दुर्दैवाने काही वेळानंतर फुलपाखरू कायमचे शांत झाले. कोषातून बाहेर आल्यावर पंख उघडून मस्त भिरभिरणाऱ्या फुलपाखराचे स्वप्न पाहणारा मुलगा खूप नाराज झाला.

 

कोष फोडून बाहेर येण्यासाठी करावी लागणारी धडपड अत्यंत आवश्यक आहे. फुलपाखरांच्या पंखांमध्ये उडण्याची सक्षमता भरण्यासाठी केलेली ती नैसर्गिक योजना आहे. तितकीच नैसर्गिक आहे, पौगंडावस्थेतील मुलांनी स्व-निर्मितीखातर केलेली धडपड. या धडपडीतूनच त्यांना मिळणार आहे, भरारी घेण्याची ताकद. तेव्हा या वयातील मुलांना पाठीशी घालून पालकांनी, स्वतः छातीची ढाल करून, त्यांच्यापुढे चालत राहणे श्रेयस्कर नाही. मुलांच्या शक्य त्या लढाया त्यांना स्वतःला लढू देणे, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी फायद्याचे ठरते. पालकांची भूमिका मुलांची युद्धकौशल्ये विकसित करण्याची, त्यांची शस्त्रे पाजळून घेण्याची आणि कुठली शस्त्रे कधी वापरायची याची त्यांना जाणीव देण्याची असावी. युद्धानंतरच्या घावांवर फुंकर घालण्याचा ओलावा हा तर वात्सल्याचा उपजत भाग आहेचसंकटाचे प्रसंग जाणीवपूर्वक मुलांना अनुभवायला लावणे, काही काल्पनिक पण घडू शकणाऱ्या प्रसंगांविषयी आपल्या मुलांशी आणि त्यांच्या मित्रमंडळींशीही गप्पा मारणे असे वातावरण कुटुंबांमध्ये असणे गरजेचे आहे. यातून मुले स्वतः समस्यांचे निराकरण करायला शिकतात; कठीण प्रसंग हाताळण्यातून त्यांना स्वतःच्या भावनांचे प्रभावी व्यवस्थापन करता येते, हा त्याचा अजून एक मोलाचा फायदा!

 
 

- गुंजन कुलकर्णी

(लेखिका नाशिक येथे बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ आहेत.)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@