वाचक आणि पुलं

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |



 


पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष ८ नोव्हेंबरपासून सुरू झाले. आपल्या उत्तमोत्तम साहित्य प्रकारांद्वारे पुलंनी वाचकांना भरभरून प्रेम दिले. तसेच वाचकांकडून, रसिकव्यक्तींकडून त्यांना भरभरून प्रेम मिळाले.


तमाम मराठी वाचकांना आणि रसिकांना आपल्या अफाट साहित्याने निर्भेळ आनंद देणाऱ्या पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष ८ नोव्हेंबरपासून सुरू झाले. आपल्या उत्तमोत्तम साहित्य प्रकारांद्वारे पुलंनी वाचकांना भरभरून प्रेम दिले. तसेच वाचकांकडून, रसिकव्यक्तींकडून त्यांना भरभरून प्रेम मिळाले. पुलंचे वैशिष्ट्य असे की, ते वाचकांना जवळचे वाटत असत. त्यांच्या अनेक लेखांमधून आपल्याला जे म्हणायचे आहे, तेच पुलंच्या लेखणीतून व्यक्त झालेले वाचकांना वाटते. लिखाण थांबवून अनेक वर्ष होऊनदेखील आजही त्यांचे लिखाण टवटवीत वाटते. पुलंचा हजरजबाबीपणा तसेच निरीक्षणशक्ती दाद देण्यासारखी होती. ही निरीक्षणशक्ती त्यांच्या अनेक लेखांमधून प्रकट झालेली दिसते. ‘माझे खाद्य जीवन,’ ‘माझे पौष्टिक जीवन,’ ‘काही अप काही डाऊन’ ही त्याची काही उदाहरणे. ‘माझे खाद्यजीवन’ या लेखाद्वारे तुमच्या-आमच्या मनातील समस्त खाद्ययात्रा पुलंनी वाचकांसमोर मांडली आहे. या लेखाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, “माणसाचा सारा इतिहास म्हणजे त्याच्या खाण्याचा इतिहास आहे. चराचर सृष्टी याचा अर्थच कशावर तरी चरणारी सृष्टी असा आहे.”

 

मानवाची सारी वाटचाल स्वतःच्याहाताने चरणे, चारणे, चिरणे आणि चोरणे या ‘च’कारी बाराखडीतून होत होत चम.च:हपर्यंत आली आहे. ‘माझे खाद्यजीवन’ या लेखाच्या शेवटी पुलंनी व्यक्त केलेली ‘सुखाची कल्पना’ ही सर्वांचीच सुखाची कल्पना असू शकते. पोस्टाच्या कारभाराचा अनुभव सगळ्यांनीच घेतलेला असतो आणि सर्वच जण घेतात. पुलंनी १९६५ साली लिहिलेल्या ‘माझे पौष्टिक जीवन’ या लेखातील निरीक्षणे आजही तंतोतंत लागू होतात. पोस्टाच्या कारभाराचे वर्णन करताना पुलं म्हणतात, “पोस्ट हापीस ही एक अजब गोष्ट आहे. तिथे पब्लिकसाठी म्हणून ठेवलेल्या टाक दौतीपासून ते आतल्या पोस्ट मास्तरापर्यंत प्रत्येक स्थिर चरावर कसला तरी निराळाच शिक्का मारलेला असतो. तो पोस्टाच्या इतर कुठल्याही शिक्क्याप्रमाणे वाचता येत नाही. फक्त त्या शिक्क्याचे अस्तित्व जाणवते. पोस्टात नोकरीला घेताना उमेदवारांना त्यांच्या चेहऱ्यावर काही विशिष्ट भाव किंवा चेहऱ्यावर कुठल्याही भावांचा अभाव पाहून निवडले जात असावे. पोस्टाच्या इमारतीच्या घडणीतच काही निराळी गोष्ट असते. भरपूर उजेड, वारा वगैरे खेळता कामा नये अशी दक्षता घेऊनच पोस्ट हापिसे बांधली गेली आहेत.” पोस्ट ऑफिसचे एवढे यथार्थ वर्णन पुलंच करू शकतात...

 

‘काही अप काही डाऊन’ या लेखात रेल्वे स्थानक आणि तेथील वातावरण याचे तंतोतंत वर्णन मांडण्यात आले आहे. पुलंच्या व्यक्तिमत्वात लहान मुलाचे दडलेले निरागसपण, कुतूहल त्यांच्या लेखांमधून व्यक्त झालेले आहे. ‘राहून गेलेल्या गोष्टी’ या लेखात पुलं म्हणतात की, “रेल्वे गाडीच्या इंजिनात बसून प्रवास करण्याची हौस बेळगावच्या स्टेशन मास्तरांनी बेळगाव ते गोकाक असा प्रवास इंजिनातून करायला देऊन पूर्ण केली. इतकेच नव्हे, तर इंजिनाची शिट्टी वाजवण्याची हौसदेखील पूर्ण करून घेता आली.” पुलंच्या प्रचंड लिखाणातून आपण जरी निर्भेळ आनंद घेत असलो तरी, त्यांच्या लिखाणातून निश्चित स्वरूपाचे चिंतन दिसून येते. ‘बटाट्याची चाळ - एक चिंतन’ यामधून आणि इतरदेखील लिखाणातून हे चिंतन दिसून येते. ‘हसवणूक’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत पुल लिहितात की, “जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये पकडून नियतीने चालविलेली आपणा साऱ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणाऱ्या माणसांची हसवणूक करण्यापलीकडे आणखी काय करायचं?” पुलंनी सर्वसामान्य रसिकांना आपल्या साहित्याद्वारे भरभरून दिले.

 

-अॅ. सुरेश पटवर्धन

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@