सोमवारपासून नेरुळ-खारकोपर सेवा सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |




 

नवी मुंबई : नेरूळ ते उरण रेल्वेमार्गावरील पहिल्या टप्प्यातील खारकोपरपर्यंतची बहुप्रतिक्षित अशी लोकल सोमवारपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते रविवारी दि. ११ नोव्हेंबर रोजी, सकाळी ११ वाजता पहिल्या लोकलला हिरवा झेंडा दाखवून उद्धाटन करण्यात येणार आहे. या रेल्वेसेवेमुळे व आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे उलवे नोड येथील रहिवासी आणि बांधकाम व्यावसायिकांत आनंदाचे वातावरण आहे.

 

नेरुळ-उरण रेल्वे हा प्रकल्प सिडकोने मध्य रेल्वेच्या सहकार्याने नवी मुंबईच्या दक्षिण भागाच्या विकासासाठी उचललेले महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. या प्रकल्पासाठीचा २२०० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. हा पहिला टप्प पुर्ण झाला असला तरी अद्यापही खारकोपरपुढील उरणपर्यंतच्या रेल्वेमार्गासाठी जमीन संपादनाची समस्या कायम आहे. रेल्वे व सिडकोने पहिल्या टप्प्याला प्राधान्य देत या मार्गाचे काम पूर्ण केले आहे. उद्घाटनानंतर पहिली रेल्वेगाडी खारकोपर ते बेलापूर या मार्गावर धावणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सिडको एमडी लोकेश चंद्र आदींसह अधिकारीवर्गाने उद्घाटन सोहळा होणार असलेल्या खारकोपर रेल्वेस्थानकात जाऊन शुक्रवारी पाहणी केली.

 

* नेरुळ-उरण दक्षिण नवी मुंबईच्या परिसरातील प्रकल्पांच्या दृष्टीने वरदान ठरणारा रेल्वे मार्ग

 

* तब्बल २२०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा ६७% खर्च सिडको आणि ३३% खर्च मध्य रेल्वेकडून करण्यात आला आहे.

 

* एकूण २७ कि.मी. लांबीचा, दोन टप्प्यांमध्ये नियोजित असलेला प्रकल्प. १२ कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्यात उलवे, बेलापूर, नेरुळ नोडस् एकमेकांशी जोडले जातील.

 

* सदर रेल्वे मार्गावरील प्रस्तावित तरघर स्थानक हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सर्वांत जवळ असणारे उपनगरीय रेल्वे स्थानक. 

 

 
 

वेळापत्रक

 

नेरुळहून खारकोपरकडे सुटणार्‍या गाडया 

सकाळी ७.४५, ८.४५, १०.१५, ११.४५, दुपारी १.१५, २.४५, सायं. ४.१५, ५,४५, रात्री ७.१५, ८.४५

 

बेलापूरहून खारकोपरकडे सुटणार्‍या गाडया

सकाळी ६.२२, ९.३२, ११.०२, दुपारी १२.३२, २.०२, ३.३२, सायं. ५,०२, ६.३२, रात्री ८.०२, ९.३२

 

खारकोपरहून नेरुळकडे सुटणार्‍या गाडया

सकाळी ६.५०, ९.१५, १०.४५, दुपारी १२.१५, १.४५, ३.१५, सायं ४.४५, ६.१५, ७.४५, ९.१५

 

खारकोपरहून बेलापूरकडे सुटणार्‍या गाडया

सकाळी ८.१५, १०.००, ११.३०, दुपारी १.००, २.३०, ४.००, सायं. ५.३०, ७.००, ८.३०, १०.००

 

दिवा-पेण आणि वसई मार्गावरील ‘मेमू’ ट्रेनचेही उद्घाटन

मध्य रेल्वेने वसई रोड - दिवा - पनवेल - पेण विभागात ‘मेमू’ ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते या नव्या ‘मेमू’ सेवेचे उद्घाटन होणार असून सोमवारपासून प्रत्यक्षात ही सेवा प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. वसई रोड - दिवा - पनवेल - पेण विभागात एकूण ‘मेमू’च्या आठ फे़र्‍या होणार आहेत. शनिवार आणि रविवार वगळून आठवड्याच्या पाच दिवस ‘मेमू’ सेवा उपलब्ध होणार आहे. नुकतेच मध्य रेल्वेने पनवेल ते पेणपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण केलेले आहे. त्यामुळे ‘डेमू’ ऐवजी ‘मेमू’ चालविणे शक्य झाले असून प्रवाशांचा त्यामुळे फायदा होणार आहे.

"नेरुळ-खारकोपर या पहिल्या टप्प्यातील रेल्वेमार्गाबरोबरच नेरुळ-उरण रेल्वे सुरू करण्यासाठी सिडको व रेल्वे प्रयत्नशील आहे. जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या रेल्वेमार्गामुळे उलवे व उरण पट्टयाचा झपाटयाने विकास होणार आहे." असे सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी म्हटले.


 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@