हिवाळी अधिवेशन मुंबईतच; १९ नोव्हेंबरपासून होणार प्रारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Nov-2018
Total Views |



 

 मनोराचा पुनर्विकास अधिवेशनानंतर


मुंबई : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईतच होणार असल्याचे जाहीर करून राज्य सरकारनेयाविषयी गेले अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. दि. १९ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार असून मनोरा आमदार निवासाच्या पुनर्विकासाचे कामही या अधिवेशनानंतरच हाती घेणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

 

गुरूवारी मुंबईत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दि. १९ नोव्हेंबरपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सुरूवात होणार आहे. दरम्यान, सुट्टीचे दिवस वगळता फक्त ९ दिवसच कामकाज चालणार आहे. विशेष म्हणजे गुरूनानाक जयंतीच्या दिवशीही विधीमंडळाचे कामकाज सुरू राहणार आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे. संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी हे अधिवेशन दोन आठवडे अधिवेशन होणार असल्याचे सांगत विरोधकांनी गोंधळ न घालता सर्व विषयावर चर्चा करण्याचे आवाहन केले. तसेच चर्चेस आम्ही तयार असून आवश्यकता भासल्यास अधिवेशनाचे दिवस वाढविण्यात येतील आणि सुट्टीच्या दिवशी ही कामकाज होईल, असेही बापट यांनी स्पष्ट केले. सध्या राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने तसेच, आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने आतापासूनच वातावरण तापू लागले असल्याने, त्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.

 

आमदार निवासाचा पुनर्विकास अधिवेशनानंतर

 

मुंबईतील मनोरा आमदार निवासाचा पुनर्विकास हिवाळी अधिवेशन झाल्यानंतरच करण्यात येणार आहे. यापूर्वी विधिमंडळ सचिवालयाकडून हे आमदार निवास रिकामे करण्यासाठी पत्रक काढण्यात आले होती. नुकतीच विधानभवनात एक बैठक पार पडली. यावेळी हे आमदार निवास पाडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. २० वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून सध्या ही इमारत धोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल देण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या खोलीतील छत कोसळल्यानंतर राज्य सरकारने आता या इमारतीबाबत निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. सरकारने १७५ आमदारांना दोन ते तीन वर्षांसाठी दक्षिण मुंबईत स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांच्यासाठी सुसज्ज घर भाड्याने घेण्याच्याही जाहीराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. कफ परेड, नरीमन पॉईंट, वाळकेश्वर, मलबार हिल, वडाळा आणि दादर या भागातील घरांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

 

विरोधकांनी गोंधळ न घालता सर्व विषयांवर चर्चा करावी. यासाठी आम्ही तयार आहोत. गरज भासल्यास अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात येईल.

- गिरीष बापट

संसदीय कामकाज मंत्री
 

 

दुष्काळ आणि राज्यातील अनेक समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे. यावर विस्तृत चर्चेसाठी अधिवेशनाचा कालावधी तीन महिन्यांचा हवा होता. मात्र, ही चर्चा टाळण्यासाठी जाणीवपूर्वक अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवण्यात आला आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील

 - विरोधीपक्ष नेते, विधानसभा
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@