जाळणार्‍यांनाही मनुस्मृतीचाच आधार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Nov-2018
Total Views |
 
 

जे छगन भुजबळ आज समतेचा नारा देत मनुस्मृती जाळण्याचा तमाशा मांडू इच्छितात, त्यांच्या मनातल्या जातीयवादाचे काय करायचे? आज बहुतेकांच्या विस्मरणात गेलेली वा जाणूनबुजून सांगितली न जाणारी एक घटना मुंबईत घडली होती, ज्यात छगन भुजबळांच्या मनातल्या जातीयवादाचे दर्शन अवघ्या महाराष्ट्राला आणि अनुसूचित जाती-जमातीतील समाजाला झाले होते.

 

तुरुंगात जाताना छातीत कळ निघणाऱ्या आणि तुरुंगातून बाहेर आले की, तोंडातून भाजपविरोधाची राळ उडवणाऱ्या छगन भुजबळांचे कारनामे उभा महाराष्ट्र जाणतो. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात व बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपात मार्च २०१६ मध्ये छगन भुजबळांना गजाआड करण्यात आले. भुजबळांना बेड्या ठोकल्यानंतर तत्काळ नाशिकसह अन्यत्र त्यांच्या समर्थक-कार्यकर्त्यांनी जनतेला वेठीस धरत आंदोलनांचे नाट्य आरंभले. पण, ज्या राज्यघटनेच्या नावाने आपण मतांचा जोगवा मागतो, त्याच राज्यघटनेतील दंडविधानांनुसार आपल्याला आणि साहेबांना कारागृहात टाकण्यात आले, हे भुजबळ आणि त्यांचे पाठीराखेही सोयीस्कररित्या विसरले. हा दुटप्पीपणा नव्हे काय? उलट राज्यघटना मानणाऱ्या ने सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतर निर्दोष सुटून तुरुंगाबाहेर येणे, हे राज्यघटनेचा सन्मान करणारे ठरले असते. पण, असे काही करण्याऐवजी भुजबळांच्या समर्थक-कार्यकर्त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेलाच वाऱ्या वर सोडण्याची मागणी करणे अधिक श्रेयस्कर समजले. इतकेच नव्हे तर भुजबळ ज्या ज्या वेळी जामिनावर कारागृहाबाहेर आले, त्या त्या वेळी त्यांनी अटकेविरोधात आकांडतांडव करत चोरावर मोर होण्याचा प्रकार केला. भुजबळांचे हे वागणे म्हणजे चिखलात हात बरबटलेल्याने “बघा, बघा, माझेच हात किती स्वच्छ,” असे सांगण्यासारखेच होते. आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो वा समता परिषदेचे समर्थक-कार्यकर्ते ‘आमचे साहेब’ निर्दोष असल्याच्या आरोळ्या ठोकत गावगन्ना हिंडत-फिरतच असतात. पण, आपण केलेले धंदे बाहेर येऊ नये म्हणून मोर्चा व आंदोलने करत सरकार व न्यायपालिकेवर दबाव आणण्याचे भुजबळांचे हे उद्योग निश्चितच भूषणावह नाहीत, हेही खरे.

 
 

छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातले तसे कर्तृत्ववान नाव. दादरमधल्या साध्या भाजीविक्रेत्यापासून ते मुंबईच्या महापौर, आमदार आणि पुढे थेट उपमुख्यमंत्रिपदाला घातलेली गवसणी, ही निश्चितच भुजबळांच्या यशाचे दाखले देणारी. यात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा वाटा अर्थातच सर्वाधिक. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीच छगन भुजबळांना व त्यांच्यातल्या आक्रमकपणाला, राजकारण्याला हेरले व पुढे मोठमोठ्या पदांवर नेऊन बसवले. एवढेच नव्हे तर छगन भुजबळांच्या आक्रमकपणाची एक आठवण नेहमी सांगितली जाते, ती म्हणजे- बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पेटलेली असताना महाराष्ट्रातल्या नेत्यांना कर्नाटकात प्रवेशबंदी होती, त्यावेळी छगन भुजबळांनी व्यापाऱ्या च्या वेषात सीमाभागात प्रवेश केला. कानडी पोलिसांना गुंगारा देऊन एका मैदानात जमलेल्या मराठीजनांसमोर भाषण ठोकत भुजबळांनी त्यांची मनेही जिंकली. या कामगिरीबद्दल नंतर बाळासाहेबांनी भुजबळांचा सत्कारही केला. हा झाला छगन भुजबळांचा शिवसेनेतला काळ. पण, पुढे पुढे विरोधी पक्षनेतेपदावरून त्यांचे शिवसेनेशी जे बिनसले ते कायमचेच. बाळासाहेबांच्याच भाषेत म्हणायचे तर ‘लखोबा लोखंडे’चा गुण लागलेल्या छगन भुजबळांनी शरद पवारांच्या नादाला लागून इकडून तिकडे उड्या मारायला सुरुवात केली. पवारांनी दाखवलेल्या आमिषाला छगन भुजबळ भुलत गेले आणि नंतर तर त्यांनी थेट बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्यापर्यंतही मजल मारली. अर्थात, पवारांनी जोपर्यंत गरज होती, तोपर्यंत या सेनापतीला वापरून घेतले आणि वेळ आली तेव्हा अजित पवारच आपला वारस असतील, असेही सांगून टाकले. तिथेच भुजबळांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वारसदाराचा पत्ता कट झाला अन् नंतर जितेंद्र आव्हाडरूपी ओबीसी नेत्याच्या लुडबुडीने भुजबळांचे उरलेसुरले महत्त्वही संपत गेले. म्हणजेच छगन भुजबळांचा शिवसेना सोडल्यानंतरचा गेल्या २७ वर्षांतला राजकीय प्रवास पाहिला की, तो चढत्या आणि नंतर उतरत्या कमानीसारखा असल्याचे दिसते.

 
 

आता मात्र छगन भुजबळांना ‘छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी,’ असे म्हणत राज्याच्या राजकारणात परतण्याचे वेध लागल्याचे दिसते. विशेष म्हणजे, पुन्हा एकवार उडण्यासाठी भुजबळांनी आधार घेतला, तो मनुस्मृती जाळण्याचा. जी मनुस्मृती बहुसंख्य हिंदू समाजाने कधी वाचलेलीही नाही आणि आताच्या घडीला कित्येकांच्या घरात या ग्रंथाच्या प्रती शोधूनही सापडत नाहीत, त्या मनुस्मृतीला जाळून छगन भुजबळांना हनुमंत होण्याचे स्वप्न पडू लागले. पण, जे छगन भुजबळ आज समतेचा नारा देत मनुस्मृती जाळण्याचा तमाशा मांडू इच्छितात, त्यांच्या मनातल्या जातीयवादाचे काय करायचे? आज बहुतेकांच्या विस्मरणात गेलेली वा जाणूनबुजून सांगितली न जाणारी एक घटना मुंबईत घडली होती, ज्यात छगन भुजबळांच्या मनातल्या जातीयवादाचे दर्शन अवघ्या महाराष्ट्राला आणि अनुसूचित जाती-जमातीतील समाजाला झाले होते. रिडल्सच्या वादाने राज्य ढवळून निघालेले असताना अनुसूचित जाती-जमातीतील लोकांनी मुंबईतल्या हुतात्मा स्मारकावर मोर्चा आणला होता. त्यावेळी मोर्चाला सामोरे जात आपल्याच समाजातल्या बांधवांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी छगन भुजबळांनी कानावर हात ठेवण्याचा प्रताप केला. मनात जातीयवादाचे भूत पक्के ठाण मांडून बसलेल्या छगन भुजबळांना अनुसूचित जाती-जमातीतील बांधवांचा हुतात्मा स्मारकावर मोर्चा आल्याने संताप अनावर झाला. त्याच दिवशी अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांनी हुतात्मा स्मारक परिसरात प्रवेश केल्याने ते ठिकाण बाटल्याचा, विटाळल्याचा ग्रह करून मुंबईचे महापौर असलेल्या छगन भुजबळांनी तो संपूर्ण परिसर गंगाजल शिंपडून शुद्ध करून घेतला. छगन भुजबळांचा तो अवतार मनातल्या मनुस्मृतीला कवटाळून बसण्यासारखाच नव्हता काय? आज हा प्रकार बहुतेकांना माहिती नाही. पण छगन भुजबळांनी हे लक्षात ठेवावे की, आज मनुस्मृती जाळण्यासारख्या कृत्यातून जातीयवादाचे एकमेव विरोधक होऊ पाहणाऱ्या भुजबळांचे ३०-३२ वर्षांपूर्वीचे ते जातीयवादी रूप आणि विचार महाराष्ट्र अजूनही विसरलेला नाही.

 
 

दुसरीकडे आज बहुतांश हिंदू घरांमध्ये मनुस्मृती दिसतच नाही ना ती वाचली जात. हिंदू धर्मामध्ये ईश्वरविषयक, पारलौकिक कल्याणविषयक, नीतीनियमविषयक असंख्य ग्रंथ आहेत. विशेष म्हणजे हिंदूंचा कोणताही एकच एक असा धर्मग्रंथही नाही, म्हणूनच ते हिंदू धर्माचे वैशिष्ट्य ठरते. शिवाय हिंदू धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीला पटेल त्या ग्रंथाचे वाचन, पालन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य हिंदू धर्मानेच दिलेले आहे. हिंदू समाजानेही स्वातंत्र्यानंतर नवतेचा स्वीकार करण्याची मानसिकता जोपासत आपली वाटचाल पुढे सुरू ठेवली. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे आज संपूर्ण हिंदू समाज देशाच्या घटनेलाच दररोजच्या आचार-विचार-वर्तणुकीचे नियम सांगणारा ग्रंथ मानतो. पाकिस्तानसारख्या धर्मग्रंथावर राज्य चालणाऱ्या, कायदे करणाऱ्या देशाच्या धर्मांधपणापायी कशा चिंधड्या उडताहेत, हेही हिंदू समाज जाणतो. त्यामुळेच हिंदू वा हिंदुत्वाच्या विरोधासाठी मनुस्मृती जाळण्याच्या छगन भुजबळांच्या उपद्व्यापांना ‘पब्लिसिटी स्टंट’व्यतिरिक्त दुसरे काहीही म्हणता येणार नाही. शिवाय असले आगलावे उद्योग केल्याने आपल्याला ‘अच्छे दिन’ येतील, असा जर भुजबळांचा समज असेल, तर तो मोठा विनोदच म्हटला पाहिजे. सोबतच छगन भुजबळांवर निरनिराळ्या घोटाळ्यांतून अमाप माया जमवल्याचा आरोप नेहमीच केला जातो आणि या मायेतून उपकृत केलेली माणसेच भुजबळांच्या असल्या उद्योगांना साथ देऊ शकतील. खरे म्हणजे, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली छगन भुजबळ हे प्रकार करू इच्छितात, त्या पक्षानेच ‘बजाव टाळी, हटाव माळी’ ही घोषणा दिल्याचे त्यांना आठवतही नाही. आज मनुस्मृतीच्या नावाने खडे फोडणाऱ्या भुजबळांनी आपल्याच पक्षातल्या जातीयवाद्यांविरोधात ठोस भूमिका घेतली असती तर ती नक्कीच जातीअंताची लढाई ठरली असती. पण, तसे करणे छगन भुजबळांच्या राजकीय सोयीच्यादृष्टीने योग्य ठरत नसेल, म्हणून त्यांना कालबाह्य झालेल्या गोष्टींना काडी लावत त्यातल्या निखाऱ्या वर आपल्या राजकारणाची डाळ शिजवण्याची बुद्धी झाली. पण, भुजबळांची ही डाळ शिजण्याची अजिबात शक्यता नाही, कारण अशा जातीयवादाच्या धगीला पाच वर्षांपूर्वीच नरेंद्र मोदींनी कायमचे विझवून टाकले.

 
 
२०१४ साली मोदी सत्तेवर आले त्याचवेळी जातीयवादाची सगळीच राजकीय नाटके पूर्णपणे संपली. मोदींच्या नेतृत्वात ‘सबका साथ सबका विकास’चे राजकारण सुरू झाले आणि आतापर्यंत जातीयवादाच्या तापल्या तव्यावर आपली पोळी भाजणार्‍यांचे राजकारण उद्ध्वस्त होऊन गेले. गेल्या पाच वर्षांतील मोदी सरकारच्या कामगिरीमुळे जातीयवादी राजकारणाचे महामेरू म्हणता येईल, अशा छगन भुजबळ आणि त्यांचे गुरू शरद पवारांची उपयुक्तताही संदर्भहीन झाली. देशातल्या राजकारणाचा पोत आणि प्रवाह बदलल्यामुळेच हे शक्य झाले आणि जातीयवादाच्या दलदलीत अडकलेल्यांना जनतेने जागा दाखवून दिली. म्हणूनच छगन भुजबळांचा आताचा मनुस्मृती जाळण्याचा इशारादेखील त्यांचा राजकारणातील अंत करणारा शेवटचा खिळा असेल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@