‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा ‘शिल्पकार’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Nov-2018
Total Views |


स्टॅच्यू ऑफ युनिटीहा जगातील सर्वात उंच पुतळा साकारणारे हात मराठी माणसाचेच आहेत. लोहपुरुषाचा पुतळा साकारणार्‍या राम सुतार यांच्या कार्याची ओळख करून देणारा हा लेख... 

 
 

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. गुजरातच्या नर्मदा नदीकिनारी सरदार सरोवर प्रकल्पाजवळ बांधण्यात आलेला १८२ मीटर उंचीचा हा पुतळा चीनमधील बुद्ध प्रतिमेपेक्षाही उंच आहे. या महाकाय पुतळ्याला साकारण्यामागची मेहनत आहे, ती प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांची.नोएडामध्ये असलेल्या विशाल स्टुडिओत वयाच्या ९३व्या वर्षीही ते कलेशी एकरूप आहेत. इतिहासातील, पुराणातील विविध व्यक्तिमत्वांच्या प्रतिमा साकारण्यासाठी ते ओळखले जातात. महात्मा गांधी, पं. दीनदयाळ उपाध्याय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या प्रतिमा साकारणार्या राम सुतार यांच्या नावे आता जगातील सर्वात उंच पुतळा साकारण्याचा विक्रमही नोंदवला गेला आहे. किंबहुना ते मराठी असल्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

 
 

१९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावात त्यांचा जन्म झाला. खडतर परिस्थितीवर मात करत आज प्रतिष्ठेच्या स्थानावर पोहोचलेल्या सुतार यांची पहिली कमाई ३०० रुपये होती. महात्मा गांधी यांची चेहर्यावर स्मित असलेली एक प्रतिमा त्यांच्याजवळ होती. सुतार यांच्या शिक्षकांना एक गांधीजींचा लहान आकाराचा पुतळा बनवून हवा होता. गुरूआज्ञेनुसार त्यांनी त्यावेळेस पहिली प्रतिकृती तयार केली. पुतळ्यात गांधीजींच्या चेहर्यावरील स्मितहास्य हुबेहूब उमटवल्याची शाब्बासकी देत त्यांना ३०० रुपये मानधन त्यावेळी दिले होते. सुतार यांच्या हाताला थोरपुरुषांच्या प्रतिभेचा स्पर्श मिळत गेला आणि आज सुतार यांची प्रतिमा जगभरात पोहोचली आहे. शिक्षकांच्या अशा शाबासकी आणि मार्गदर्शनामुळे त्यांनी अभ्यासाबरोबर ही कलाही जोपासली. त्यांचे गुरू श्रीरामकृष्ण जोशी यांनी या क्षेत्रात येण्यासाठी मार्गदर्शन केले. मुंबईत सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी प्रतिरुपण आणि शिल्पकलेविषयक शिक्षण घेतले आणि त्यांच्या अवगत असलेल्या कलेला शिस्त मिळत गेली. त्यांच्या कलेच्या कक्षा त्यातूनच रूंदावत गेल्या. सुरुवातीपासूनच गांधीजींच्या विचारधारेने प्रेरित झालेले सुतार हे स्वदेशीच्या आंदोलनात सहभागी झाले होते. सुतार यांचे कार्य ५०च्या दशकात प्रामुख्याने लोकांसमोर आले होते. राजस्थानमधील गांधीसागर बांधावर एक प्रतिकात्मक शिल्प साकारायचे होते. सुतार यांनी एका खडकापासून आई आणि मुलाच्या नात्याविषयीचे पैलू दाखविणारे चंबलदेवीचे शिल्प साकारले. तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना ही कलाकृती भावली आणि त्यानंतर त्यांच्या प्रतिमेचा विस्तार वाढतच गेला. एलोरा पुरातत्त्व विभागातही त्यांनी काम केले. पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनात पुरातन शिल्पांचे जतन करण्याचे काम त्यांनी केले. दगड आणि शिल्पकामात सुतार यांचे प्रभुत्व असले तरीही ब्रॉन्झ शिल्पांविषयी त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी साकारलेली महात्मा गांधी यांची ध्यानमुद्रेतील मूर्ती लोकप्रिय आहे.

 

गांधीजींचे आत्तापर्यंत ३५०हून अधिक पुतळे त्यांनी साकारले आहेत. मुंबईत अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प उभारण्याचे कामही तेच पाहणार आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते १९९९मध्ये त्यांनापद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. २०१६मध्ये त्यांनापद्मभूषण पुरस्कारप्रदान करण्यात आला. सांस्कृतिक समरसतेत गौरविल्या जाणार्याटागोर सांस्कृतिक ऐक्यया पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केले जाणार आहे. राम सुतार यांच्या जीवनावर आधारितस्कल्पटर राम व्ही. सुतार : लाईफ स्टोरीहे पुस्तकही प्रसिद्ध आहे. बुधवारी अनावरण करण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या कामाची सुरुवात २०१३मध्ये सुरू झाली होती. यावेळी त्यांच्यासह १०० जणांचे पथक काम करत असत. १८२ मीटर उंच इतक्या प्रचंड मूर्तीची घडवणूक करताना त्यातील बारकाव्यांकडे सुतार यांचे लक्ष असे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यातही ते दिसून येते. शिल्पातील डोळे, खांदे, पाय आदींतून मनुष्याच्या प्रतिमेची ठेवण यांची हुबेहूब प्रतिमा साकारण्याची कला सुतार यांनी जोपासल्यामुळेच शिल्पांमध्ये जीवंतपणा आलेला दिसतो. पटेल यांच्या शिल्पाचा चेहरा ७० फूट उंच, डोळ्यांची बुबुळे दीड मीटर रूंद,१४० फूट रूंद खांदे आणि ८० फूट रूंद असलेली पादत्राणे ही दुरुनही स्पष्ट दिसतात. शिल्प साकारताना त्यात जीव ओतणार्या या कलेच्या महापुरुषाचा गौरव आज सातासमुद्रापार पोहोचला आहे. इतकी वर्षे कलेची कठोर साधना केल्यानंतरही उतारवयातही एखाद्या तरुणाला लाजवेल, अशा धडाडीने ते कार्य करत आहेत.

 
- तेजस परब 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@