‘ती’च्या अस्तित्वाचा प्रवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 


 
 
 
अन्याय सहन न करता, स्वत:चं अस्तित्व निर्माण करून ५० पैसे ते ८० कोटींची उलाढाल करणाऱ्या पेट्रीसिया नारायण या उद्योजिकेची प्रेरणादायी गाथा...
 

बोचरी जोडव्याची तार

येता विकासाच्या आड

तारेलाच दे वळण

मानू नकोस कधी हार

 

कवयित्री वर्षा तावडे यांच्या या काव्यपंक्ती स्त्रीजीवनाला सर्वार्थाने प्रेरणा देणाऱ्या. कारण, एका स्त्रीचं आयुष्यही मुळात असचं असतं, म्हणजे एकाच आयुष्यात ती अनेक भूमिका बजावत असते, म्हणजे खरंतर आयुष्याच्या रंगमंचावरची ती बहुरूपी अभिनेत्रीच. तिला आपल्या कुटुंबासाठी कधी आई, कधी बायको, सून, बॉस, बहीण, मैत्रीण, सहकारी यांसारखी बहुढंगी भूमिका निभावाव्या लागतात. मात्र, या प्रत्येक रूपात ‘ती’चं असं वेगळं अस्तित्व असतं. अशीच अनेक जबाबदाऱ्या पार पाडत स्वतःच्या अस्तित्वासाठी लढलेल्या पेट्रीसिया नारायण. चेन्नईतल्या गरीब ख्रिश्चन आणि अगदीच जुनाट विचारांच्या घरात त्या वाढल्या. त्यांचे वडील फारच शिस्तीचे. म्हणजे अगदी ऊठ म्हणजे ऊठ आणि बस म्हणजे बस. मात्र, त्यांच्या घरच्यांनी शिक्षणासाठी त्यांना कधीच अडवले नाही. पण, तरी पेट्रीसिया स्वयंपाकघरात खूप रमायच्या. अभ्यासात मुळातच त्यांना फारसा रस नसल्यामुळे त्या नेहमीच आईसोबत स्वयंपाकात गर्क असायच्या. त्यातच कॉलेजमध्ये असताना त्या एका हिंदू मुलाच्या प्रेमात पडल्या, अर्थातच पेट्रीसियाच्या घरच्यांना हा निर्णय मान्य नव्हता, तरी हट्टाने पेट्रीसिया यांनी वयाच्या १७ व्या वर्षी आंतरधर्मीय विवाह केला. तो काळ होता १९८० चा. त्यामुळे अर्थातच पेट्रीसियांबरोबर त्यांच्या आईवडिलांनी आपले सर्व संबंध तोडून टाकले. लग्नानंतर काही वर्षांनी अगदी राजाराणीचा असलेला संसारही मोडला. पेट्रीसिया यांचे पती त्यांच्यावर खूप अत्याचार करत, पण पदरात दोन मुलं असल्याने काय करावं, असा विचार करून त्या सर्व अत्याचार मुकाट्याने सहन करत राहिल्या. पण, एक वेळ अशी आली की, त्यांनी आपल्या संसाराचा हा धागा कायमचा तोडून टाकला.

 

नवऱ्याचं घर सोडल्यानंतर जाणार कुठे म्हणून त्या आत्महत्याही करायला निघाल्या होत्या, पण तरी त्यांनी स्वतःला सावरलं. या आत्मविश्वासाचे श्रेय ते आपल्या दोन मुलांना देतात, कारण त्यांच्या मते, “एक स्त्री म्हणून तुम्ही कितीही हतबल झालात तरी जेव्हा तुमची मुलं तुम्हाला ‘आई’ अशी हाक मारतात, तेव्हा त्याच मनगटात हत्तीचं बळ संचारतं.” पण, तरी जायचं कुठे हा प्रश्न होताच, कारण वडिलांच्या घरचे दरवाजे कधीच बंद झाले होते, तरीही त्यांच्या आईने पेट्रीसिया यांना घरात राहण्याची परवानगी दिली. पण, हे असं अवलंबून राहणारं जीवन त्यांना मान्य नव्हतं. म्हणूनच त्यांनी आपल्या स्वयंपाकाच्या आवडीचा उपयोग केला आणि चेन्नईच्या मरिना बीचवर चहा-सिगारेट विकायला सुरुवात केली. त्यांची पहिल्या दिवसाची कमाई होती केवळ ५० पैसे. त्यानंतर अधिक उत्पन्नासाठी मग त्यांनी इडली-सांबार, मेदूवडा यांसारखे खाद्यपदार्थ विक्रीस ठेवण्याचा निर्णय घेतला. पण, त्यासाठीही भांडवलाची गरज होतीच. पण, पेट्रीसिया यांनी मनात एक गोष्ट पक्की केली होती की, “काहीही झालं तरी मी कोणावर अवलंबून राहणार नाही, माझ्या आयुष्यातील जे निर्णय असतील ते मी घेतलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या परिणामांनाही मीच कारणीभूत असेन.” या निश्चयाने त्यांनी आधी आईकडून काही पैसे कर्ज स्वरूपात उधार घेतले आणि त्यांनी ही खानावळ सुरू केली. त्यावेळी त्यांना भरपूर परिश्रम घ्यावे लागले, पण आज त्यांची दिवसाची कमाई २५ हजार रुपयांच्या घरात आहे.

 

पेट्रीसिया यांनी आपल्या प्रवासात अनेक चढ-उतार पाहिले. पण, एवढी आर्थिक उलाढाल पाहिल्यानंतरही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुख कधीच नांदलं नाही. त्यांच्या मोठ्या मुलीचा लग्नानंतर काही दिवसांतच अपघात झाला आणि त्यात तिचा मृत्यू झाला आणि पेट्रीसिया यांना या गोष्टीचा जबर धक्का बसला आणि त्यांचं आपल्या व्यवसायावरच मन उडालं. “माझ्या मुलांसाठी मी सर्व काही केलं आणि आज माझ्याकडे सर्व असताना मुलंच नसतील तर या सुखाचा काय उपयोग?,” या विचाराने त्यांनी व्यवसायातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांच्या मुलाने त्यांना धीर दिला आणि त्यांनी ‘स्लम क्लिअरेंस बोर्ड आणि नॅशनल मॅनेजमेंट ट्रेनिंग’ कॉलेजच्या कँटिनमध्ये स्वयंपाक करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी मरिना बीचवर सुरू केलेल्या फिरत्या दुकानाचे रुपांतर हॉटेलमध्ये केलं आणि आज त्या ‘संदीपा’ नावाच्या हॉटेलच्या मालकीण आहे. एकट्याने सुरू केलेल्या त्यांच्या या प्रवासात आज चार ते पाच हजार लोकं आहेत आणि चेन्नई शहरात ‘संदीपा’ या त्यांच्या हॉटेलच्या एकूण १४ शाखा आहेत. ५० पैशांनी सुरू केलेल्या हा व्यवसाय पेट्रीसिया यांनी तब्बल ८० कोटींवर नेला. त्यांच्या या यशासाठी २०१० साली त्यांना सुषमा स्वराज यांच्या हस्ते ‘एफसीआयसीसीआय’चा ‘कर्तृत्ववान महिला उद्योजका’चा पुरस्कारही मिळाला. अन्याय सहन करत खितपत न पडता त्यातून बाहेर पडून यशस्वी होणाऱ्या अशा या उद्योजिकेची कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@