‘आसिया’च्या निमित्ताने..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Nov-2018   
Total Views |

 


 
 
 

आसियाच्या जिवंत असण्याचे कारण पोपसत्ता आणि तिच्या धर्मबांधवांची एकी आहे. विचार येतो, आसियाच्या जागी अनिता, सुनीता असती तर? तिच्या सुटकेसाठी जागतिक पातळीवरचा सोडा, पण भारतातला हिंदू एक झाला असता? आसियाच्या निमित्ताने इतकेच वाटले..

 

आसिया या ख्रिश्चन महिलेला इशनिंदा केली म्हणून पाकिस्तानच्या कनिष्ठ न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र, नुकतीच तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने ही मृत्यूदंडाची शिक्षा रद्द केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अपेक्षेप्रमाणे धर्मवेड्या पाकिस्तानी नागरिकांनी या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून निदर्शन करण्यास सुरुवात केली. मात्र, आसिया आणि इशनिंदा या प्रकरणावरून वाटते की, स्पृश्य-अस्पृश्याचे काटेरी वणवे जगभरात पाळले जातात. पाकिस्तानमध्ये तर याला चांगलाच धार्मिक रंग आहे. २०१० मध्ये आसिया या महिलेने एका विहिरीतलं पाणी बादलीने बाहेर काढले. तेथेच ठेवलेला पेला उचलला आणि त्यातून पाणी प्यायली. तिच्या आसपास असणाऱ्या महिलांनाही त्या पेल्यातून पाणी प्यायला दिले. यावेळी दुसऱ्या एका महिलेने आसियाला अडवले. तिच्या मते, इसाई आसियाने त्या पेल्यातून पाणी प्यायले होते. त्यामुळे ते पाणी ‘हराम’ झाले होते. आसिया या ख्रिस्ती महिलेने त्या पाण्याला स्पर्श करून पाणी अशुद्ध केले होते.

 

अस्पृश्यतेचे आणि विषमतेचे हे उदाहरण भारतातले नसून पाकिस्तानातले आहे. या धार्मिक विषमतावादाबद्दल कुणी काहीच बोलत नाही. असो, तर मुद्दा हा की, त्यावेळी आसिया म्हणाली की, “येशू ख्रिस्त आणि मोहम्मद पैगंबर यांनी ही घटना एकाच नजरेतून पाहिली असती.यावर “येशूची आणि पैगंबराची तुलना कशी होऊ शकते?,” असे म्हणत आसियाला प्रायश्चित्त घ्यायला सुनावले. आसियाने इस्लाम कबूल करावा. यावर आसियाने मुस्लीम आणि इसाई धर्माची तुलना केली. झाले... त्यामुळे आसियावर ईशनिंदेचा गुन्हा दाखल झाला. पाकिस्तानी कनिष्ठ न्यायालयाने तिला मृत्यूदंड सुनावला. भयानक आहे, हे सगळे. जागतिक पातळीवर या ईशनिंदा कायद्याची सातत्याने आलोचना होत आली आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या राष्ट्रीय विधानसभेची सदस्य शेरी रेहमान यांनी या ‘तौहीम-ए-रिसालत’ कानून अर्थात ईशनिंदा कायद्याच्या गैरवापराबद्दल आवाज उठवला होता. पण, पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी या विधेयकाचा पक्षाशी काही संबंध नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे शेरी रेहमान यांनी ते विधायक परत घेतले. त्यानंतर या ईशनिंदा कायद्यावर तिथे सगळ्यांनी अळीमिळी गुपचिळी ठेवली आहे ते आजपर्यंत.

 

पाकिस्तानमध्ये इतर धर्मीयांना नमवायचे असेल तर त्यांच्यावर ईशनिंदेचा आरोप केला की, तो इतर धर्मीय बाराच्या भावात गेलाच म्हणून समजा. हा ईशनिंदा कायदा तरी काय आहे? भारतावर ब्रिटिशांचे शासन होते. धर्माशी संबंधित सर्व गुन्हेगारी प्रकरणांसाठी १८६० साली ब्रिटिशांनी एक संहिता तयार केली, ईशनिंदा या कायद्याची पाळेमुळे या संहितेमध्ये आहेत. विभाजनानंतर पाकिस्तानने ही संहिता स्वीकारली. त्यानंतर स्वतंत्र पाकिस्तानमध्ये जिया-उल-हकच्या सैनिकी सरकारच्या दरम्यान १९८० ते १९८६ मध्ये या संहितेमध्ये अनेक कलमे सामील केली गेली. यामध्ये अहमदी या समुदायाला गैरमुस्लिम समुदाय घोषित केले गेले. जर या अहमदी यांनी मुस्लिमांसारखे धार्मिक रितीरिवाज पाळले तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर तरतूद करण्यात आली, तर दुसरीकडे ईशनिंदेच्या खाली कुराणासंबंधी काही असेल तर १० वर्षांची सजा आणि दंड होणार. जर मोहम्मद पैगंबरांबाबत काही असेल तर मृत्यूदंडच. केवढी ही अमानुष धार्मिकता. पण, पाकिस्तानमध्येही असली धार्मिकता कायद्याच्या हातात हात घालून चालते. पण, आसिया या मृत्यूदंडातून सुटली. कारण, तिच्या जीवितासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न झाले. आसियाच्या मृत्यूदंड सुनावणीच्या निषेधार्थ फेब्रुवारी २०१८ ला इटलीची राजधानी रोम येथील प्राचीन कॉलेजियमला लाल रंगाची रोषणाई केली होती. हजारो ख्रिस्ती नागरिक पाकिस्तानमधल्या आसियासाठी तिथे जमले होते. आसियाच्या जिवंत असण्याचे कारण पोपसत्ता आणि तिच्या धर्मबांधवांची एकी आहे. विचार येतो, आसियाच्या जागी अनिता, सुनीता असती तर? तिच्या सुटकेसाठी जागतिक पातळीवरचा सोडा, पण भारतातला हिंदू एक झाला असता? आसियाच्या निमित्ताने इतकेच वाटले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@