सुसंस्कृत (च)व्हाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2018
Total Views |


 

अजित पवारांनी जसे धरणात पाणी नाही, तर लघुशंका करून धरण भरण्याचे कौशल्य आपल्याकडे असल्याचे सांगत लाखो शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले, तसेच चव्हाणांनीही केले. अर्थात ज्यांचा मेंदूच लघुशंकेइतका लघु आहे, त्यांच्या मुखातून अपशब्दांव्यतिरिक्त अन्य काही निघूही शकत नाही, हेही खरेच म्हणा.


सदैव काँग्रेसी संस्कृतीच्या महानतेचा जप करत सभ्यता आणि सुसंस्कृततेवर प्रवचने झोडणाऱ्यांची योग्यता नेमकी काय, हे अशोक चव्हाण यांच्या ताज्या वक्तव्यातून नुकतेच उघड झाले. आपल्या नावातला ‘च’ वगळून ‘व्हाण’ खाण्याचे काम करत अशोक चव्हाणांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर अश्लाघ्य भाषेत टीका केली. गेल्या काही दिवसांपासून स्वतःच्या मनसबदाऱ्या आणि वतने गेल्याने सैरभैर झालेल्या काँग्रेसी नेत्यांनी जनतेचे-जनसेवेचे नाव घेत संघर्ष यात्रेची टूम काढल्याचे वृत्त माध्यमांत झळकले. पण, घराण्याचे गुलाम आणि मूठभर कार्यकर्त्यांव्यतिरिक्त चिटपाखरूही फिरकत नसल्याने या संघर्ष यात्रेशी सर्वसामान्यांचा काही संबंध नसल्याचे बहुसंख्य जनतेच्या तत्काळ लक्षात आले. परिणामी चार-दोन निष्ठावान टाळक्यांव्यतिरिक्त त्या यात्रेला कोणी उपस्थितही राहिले नाही. त्यामुळे स्वतःचे कथित बालेकिल्ले वाचवण्याचा आणि गांधी कुटुंबीयांच्या डोळ्यापुढेआम्हीही काहीतरी हातपाय मारतो आहोत,’ हे दाखवून देण्याचा संघर्ष करणाऱ्यांनी विदुषकी चाळे करत या यात्रेला गर्दी जमविण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण, राष्ट्रीय पातळीवरील विनोदवीराचा अनुभव असलेल्या जनतेने चव्हाणांच्या उद्योगांकडे ढुंकूनही पाहण्याचे कष्ट घेतले नाही. तेव्हा जनतेने आपल्यामागे यावे म्हणून काहीतरी साहस करण्याच्या नादात अशोक चव्हाणांना गोष्ट सांगण्याची लहर आली. बरं, गोष्ट सांगावी तर ती निदान पटण्याजोगी तरी हवी ना? पण सुंभ जळाला तरी पीळ जात नाही, या न्यायाने अशोक चव्हाणांनी गोष्टही खासच निवडली. अजित पवारांनी जसे धरणात पाणी नाही, तर लघुशंका करून धरण भरण्याचे कौशल्य आपल्याकडे असल्याचे सांगत लाखो शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले, तसेच चव्हाणांनीही केले. केंद्रातल्या व राज्यातल्या भाजप सरकारचा कारभार एकसारखाच असल्याची टीका करण्याच्या नादात त्यांची जीभ घसरली आणि ते बेताल बरळत सुटले.

 

एका गावातल्या शाळेत मधल्या सुट्टीत एक खोडकर विद्यार्थी गुरुजींच्याच टेबलावर उभा राहून लघुशंका करीत असतो. ते पाहून गुरुजी त्याची तक्रार करायला विद्यार्थ्याच्या घरी जातात, तर विद्यार्थ्याचे वडीलही घराच्या छतावरून आपला लघुशंकेचा कार्यक्रम उरकत असतात.’ ही गोष्ट सांगत अशोक चव्हाणांनी केंद्र व राज्य सरकार या बाप-लेकासारखेच असल्याचे तारे तोडले. खरे म्हणजे राज्याचे ‘आदर्श’ मुख्यमंत्री असलेल्या अशोक चव्हाणांनी आधी आत्मपरीक्षण करायला हवे. कारण चव्हाणांनी सांगितलेल्या गोष्टीतल्यासारखे केंद्र आणि राज्याचे संबंध काँग्रेसच्या सत्ताकाळात नक्कीच असू शकतील. केंद्रातील काँग्रेसने एखादी गोष्ट केली की, मग आपल्या राज्यातही गरज असो वा नसो त्या गोष्टीचे अनुकरण करण्याची इथल्या काँग्रेसची रीतच होती. हायकमांडच्या पावलावर पाऊल ठेवत सारासार विचार करण्याची शक्ती गमावलेली काँग्रेस आणि चव्हाणांसारखे नेते यापेक्षा वेगळे काही करुही शकत नव्हते. म्हणूनच अशोक चव्हाणांना आता मोदी आणि फडणवीसांबद्दल बाप-लेकाचे विकृत उदाहरण देण्याचे सुचले. आता अशोक चव्हाणांनी एकच काम करावे व केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार असताना दोघांतले नाते नेमके कसे होते, हे लवकरात लवकर जाहीर करुन टाकावे. कारण चव्हाणांच्याच वक्तव्याने जनतेलाही आता तत्कालीन राजवटीतल्या कथा ऐकण्याची नि वाचण्याची उत्सुकता निर्माण झालीच आहे. शिवाय सत्ता आपल्याच बापजाद्यांची जहागिरी समजणाऱ्यांनी आणि दिल्लीत बसलेल्या हायकमांडची हुजरेगिरी करण्यात आयुष्य गेलेल्यांनी भाजप सरकारांची घाणेरड्या भाषेत तुलना करण्याचे काम करण्याची अजिबात गरज नाही. कारण इथे कोणतीही कामे लपूनछपून नव्हे तर जनतेला समोर ठेऊनच केली जातात. कोणालाही कोणाची हांजी हांजी करण्याची गरज पडत नाही की, बळजबरीही केली जात नाही. पण ज्यांचा इतिहासच गांधी कुटुंबीयांचे बूट उचलण्याचा आहे, त्यांना या गोष्टी समजतील का, हा प्रश्न निर्माण होतोच.

 

सैनिकांच्या बलिदानावर डल्ला मारण्याचा ‘आदर्श’ प्रस्थापित करणारे मुख्यमंत्री ही अशोक चव्हाणांची खरी ओळख. आता चव्हाणांना आपल्या जुन्या ओळखीसह अजितदादांच्या रांगेत जाऊन बसण्याची घाई झाली आणि त्यांनी मोदी व फडणवीसांबद्दल अपशब्द उच्चारले. अर्थात ज्यांचा मेंदूच लघुशंकेइतका लघु आहे, त्यांच्या मुखातून अपशब्दांव्यतिरिक्त अन्य काही निघूही शकत नाही, हेही खरेच म्हणा. दुसरीकडे सत्ताभ्रष्ट झाल्याने अनेकांची ‘मती फिरते’ असे म्हणतात. सध्या अशोक चव्हाणांसह बहुतांश काँग्रेसी नेत्यांची गत तशी झाल्याचे दिसते. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीसांचे सरकार आल्यापासून काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळातील घोटाळ्यांना वाचा फोडण्याचे काम सुरू झाले. घोटाळ्यांच्या चिखलात आपलेही हात बरबटलेले असल्याने अशोक चव्हाणांना नेमके काय करावे आणि काय नाही, असे झाले. चौकशी-तपासाच्या फेऱ्यानंतर आपलीही रवानगी तुरुंगात झाली तर, या भयगंडाने पछाडलेल्या अशोक चव्हाणांना मग सर्वत्र मोदी-फडणवीस दिसू लागले. त्याच भरात त्यांनी लघुशंका करणाऱ्या बापलेकांशी मोदी-फडणवीसांची तुलना तर केलीच, पण भाजप सरकारच्या कार्यकाळात लोक दरिद्री झाल्याचाही आरोप केला. अशोक चव्हाणांचे बरोबरच आहे. भाजप सरकारमुळे राज्यातला सर्वसामान्य नागरिक दरिद्री वा गरीब झाल्याचे कोठे आढळले नाही, मात्र अशोक चव्हाणांसारखे आपापल्या गढ्या सांभाळणारे लोक दरिद्री झालेच. राज्यात सलग १५ वर्षे सत्ता उपभोगणाऱ्यांनी इथल्या जनतेला गंडवण्याचा, निरनिराळे खोटेनाटे धंदे नि घोटाळे करण्याचा विक्रमच केला. घोटाळ्यांच्या माध्यमातून कोट्यवधींची माया रिचवलेल्यांचे भाजप सरकार आल्याने मात्र इन्कमच बंद पडले. सोन्या-चांदीच्या ताटात जेवणाऱ्यांना मग दररोजच दारिद्य्राचा अनुभव येऊ लागला. साहजिकच हे दरिद्री जिणे असह्य झाल्याने संतापाचा कडेलोट झालेल्या अशोक चव्हाणांनी भाजप सरकारमुळे दारिद्र्य आल्याचे कबूल केले, त्यात त्यांची चूक मुळीच नाही. फक्त जनतेने आगामी काळातही अशोक चव्हाणांवर अशीच कृपा करत दारिद्र्याची अनुभूती सतत कशी मिळत राहील, हे पाहावे. कारण हे सत्तादारिद्र्यच चव्हाणांसारख्यांना ठिकाणावर आणू शकते.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@