जिंदगी न मिलेगी दुबारा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2018
Total Views |




वेळेचा दबाव, माणसाचा दबाव, नात्यांचा दबाव ही सारी ‘आपत्कालीन वस्तुस्थिती’ आयुष्यात आणूच नये. खेळीमेळीचे जीवन जगावे. आयुष्य आपला मार्ग चालत राहणार. आयुष्याला आनंदाचे एक सुंदर रूप द्यावे.

 

माझ्या खूप वर्षांपासूनच्या ओळखीच्या एक बाई आहेत. त्या केव्हाही जाता-येता मला रस्त्यात किंवा आमच्या कॉम्प्लेक्समध्ये राहतात तिथे भेटत असतात. बऱ्याचदा त्यांची माझी वर-वर नजरभेट होत राहते. मग त्या मला “कैसे हो? कैसा चल रहा है?” असे तेच जुजबी जुनाट प्रश्न विचारतात. मीसुद्धा त्यांना फारसा विचार न करता तीच जुनीपुराणी उत्तरे देते. “ठीक है। अच्छा है।” मग त्या बाई पुन्हा घाईघाईत म्हणतात की, “कितने दिनसे ऐसेही घाईघाईमेंही है? फुरसदही नही मिलती। जब देखो तब इतना काम पडा होता है । अर्जंट होता है, क्या करे? फिर मिलेंगे।” ही जी ‘अर्जंट पात्रे’ असतात ती आपल्याला आपल्या जीवनात सतत भेटत असतात. बघावे तेव्हा घोड्यावर स्वार होऊन असतात. ही मंडळी आपल्या घरात दिसतात. शेजारीपाजारी असतात. आपल्या ऑफिसमध्ये असतात. आपला ‘बॉस’ असतात. आपल्या हाताखाली असतात. पण जे काही छोटे-मोठे काम करतात ते जणू आपत्कालीन काम असावे अशा पद्धतीने करतात. बघावे तेव्हा ‘घाईत’ किंवा ‘जल्दीमें’ असतात. त्यांच्या मागे सदैव कुणीतरी घाईचे भूत लागलेले असावे असे वाटते. कुठेच न स्थिरावता दिशाहीन भटकत राहणे त्यांच्या नशिबात येते.

 

आज मला चहा आणायचा आहे, उद्या साखर संपत आली आहे, भाजी फक्त दोन दिवसांची शिल्लक आहे, आता फ्रीज भरला पाहिजे. खरे तर ही कामे निश्चित आपत्कालीन वाटत नाहीत. पण, ज्या पद्धतीने काही गृहिणी ही दैनंदिन स्थिती आपत्कालीन असल्याचा जो दावा करतात, त्यात त्यांचे गृहसौख्यच निघून जाते. नवऱ्याबरोबर चार गुजगोष्टी करायच्याऐवजी घरातील साध्या गोष्टींची भलीमोठी जबाबदारी डोक्यावर घेत या गृहिणी गृहसौख्यासाठी किती वेळ फुकट घालवितात, याचे त्यांना भानच राहत नाही. मुलाबाळांबरोबर वेळ कसा मजेत घालवायचा, कुठे बागेत जायचे, कधी सिनेमा-नाटकाला जायचे आणि आईमुलांच्या नात्यातील अतीव आनंद घेत राहायचा हे त्यांना सुचतच नाही. आनंदाचे हे क्षण खरे तर दुर्मिळच असतात. पण, आपल्याशिवाय घरात सगळे ‘प्रॉब्लेम्स’ कुणी हाताळूच शकणार नाहीत, हा जो ‘अंध’विश्वास असतो ना ती यांची खरी समस्या आहे.

 

माझ्याकडून काम होत नाही, मुलांना खाणे वेळेवर देऊ शकत नाही. यामुळे अतिचिंतीत होणाऱ्या अनेक स्त्रिया मी पाहिल्या आहेत. याशिवाय असेच पुरुषही आहेत, ज्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये काम करण्याशिवाय इतर काहीच करता येत नाही. तेथील साधे कामसुद्धा त्यांना ‘आपत्कालीन’ वाटते. त्यांच्याशिवाय त्यांना त्यांचा बॉस किंवा शिपायालासु़द्धा काही करता येणार नाही असे वाटते. असे सद्गृहस्थ मुलांच्या किंवा पत्नीच्या आवडीनिवडी पुऱ्या करीत नाहीत. त्यांचे वाढदिवस, शाळेतील प्रोग्रॅम्स त्यांना काहीही साजरे करता येत नाहीत, ऑफिसमध्ये प्रत्येक गोष्ट त्यांच्या द़ृष्टीने ‘अर्जंट’ वाटते. अर्थात, आपली ध्येये स्वप्ने व कामे महत्त्वाची जरूर आहेत. पण आपल्या आयुष्यात मौज करणे, कुटुंबाबरोबर आनंद घेणे, कुटुंबाला आनंद देणे, आपले छंद जोपासणे हे सारेसुद्धा खूप महत्त्वाचे नाही का? साध्या साध्या गोष्टींचे अवडंबर करून आपल्या आनंदाला आपण तिलांजली द्यायची यासारखी दुसरी दुर्दैवी गोष्ट आपल्या आयुष्यात काय असू शकते? म्हणूनच आपण थोडेसे एक ‘साधारण माणूस’ म्हणून जगायला पाहिजे.

 

आपल्याशिवाय तसे कुणाचे खूप अडणार नाही. आपलेही कुणाशिवाय तसे अडलेले नाही. मग आपणच असे अडचणीचे प्रश्न निर्माण का करावे? म्हणून वेळेचा दबाव, माणसाचा दबाव, नात्यांचा दबाव ही सारी ‘आपत्कालीन वस्तुस्थिती’ आयुष्यात आणूच नये. खेळीमेळीचे जीवन जगावे. आयुष्य आपला मार्ग चालत राहणार. आयुष्याला आनंदाचे एक सुंदर रूप द्यावे. त्याचे ‘आपत्कालीन विभागा’त रूपांतर करू नये. आयुष्याचा ‘स्पीड’ हा आपल्याला धक्के देणार नाही इतका मर्यादित ठेवावा. सगळ्याच स्वप्नांना मूर्त स्वरूप देता येणार नाही. पण, अशा अमूर्त स्वप्नांच्या व्यर्थपणे मागे जाऊन आपण भकास करणार नाही इतके भान ठेवावे. साईबाबा म्हणतात तसे, ‘थोडेसे सबुरीने घ्यायला शिकावे’ किंवा गुलजारच्या स्थिरावलेला क्षणांचा शोध घेणाऱ्या शब्दांना तरी आठवून पाहूया,

 

‘दिल ढूंढता है, फिर वहीं फुरसत के रात दिन बैठे रहे तसव्वुर-ए-जाना किये हुये।

 

- डॉ. शुभांगी पारकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@