खेळाडू उपाशी आणि....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


 

 

युवा अॅथलिट खेळाडुंची पंढरी म्हणजे युथ ऑलिम्पिक स्पर्धा. या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करता येईल, हेच काय ते या युवा खेळाडूंचे स्वप्न. याकरिता लाखो खेळाडू मेहनत घेत असतात. त्यातलेच अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच खेळाडू या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होतात. भारताकडून असेच ४२ खेळाडू यावर्षीच्या तिसऱ्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे आयोजन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच करते आणि यावर्षी ही स्पर्धा होत आहे ती अर्जेंटिनामध्ये. रविवारी सुरू झालेल्या या स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळवून दिलं ते मराठमोळ्या तुषार माने याने. १० मी. एअर रायफल प्रकारात तुषारने भारताला रौप्यपदक मिळवून दिले तर ज्युडो प्रकारात भारताची तबाबी ही रौप्यपदक जिंकणारी पहिली खेळाडू ठरली कारण, याआधी भारताने या खेळात कधीच पदक मिळवले नव्हते. पण या युथ ऑलिम्पिक स्पर्धेत वेगळाच मुद्दा गाजला. भारतीय खेळाडू आपल्या जिवाचं रान करून भारतासाठी पदकं मिळवतीलही पण खेळाडूंची जी हेळसांड होत आहे, त्याचं काय? युथ ऑलिम्पिकच्या यावर्षीच्या स्पर्धेत भारताकडून तब्बल ४२ खेळाडूंचा ताफा अर्जेंटिनाला रवाना झाला. मात्र, तिकडे या खेळाडूंना भारतीय जेवण तर सोडाच, खाण्यालायकही काही मिळाले नाही. यामुळे भारतीय ताफ्यातील काही खेळाडूंवर पहिल्याच दिवशी उपाशी राहण्याची वेळ आली आणि त्याचा परिणाम झाला तो त्यांच्या खेळावर. यात दोष कोणाला द्यायचा? आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला की, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला? या सगळ्या प्रकारानंतर खेळाडूंनाच विनंती करावी लागली की, निदान आम्हाला खाण्यायोग्य तरी काही द्या. हा प्रकार लाजिरवाणा आहे. २०० हून अधिक देशांचे युवा खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते, मात्र गैरसोय झाली ती फक्त भारतीय खेळाडूंची, का तर, आपल्या ऑलिम्पिक असोसिएशनचे मुळी लक्षच नाही, काय चालू आहे त्याच्याकडे. रविवारच्या सरावादरम्यान तर पोषक आहार न मिळाल्याने एक खेळाडू भोवळ येऊन पडला. या सगळ्या प्रकारामुळे रविवारी सगळ्याच भारतीय खेळाडूंचा सराव काही काळ बंद ठेवण्यात आला, जेणेकरून त्यांना विश्रांती घेता येईल. अशी सगळी परिस्थिती असली तरी, उद्या यातील काही खेळाडूंना भारतासाठी पदक नाही जिंकता आले, तर लगेच त्यांच्यावर ताशेरे ओढले जातील , पण इकडे खेळाडू उपाशी त्याचं काय?

 

सहाव्यांदाही गड राखलाच!

 

भारताच्या वरिष्ठ क्रिकेट संघाबरोबरच आता भारतीय युवा क्रिकेट संघाने आपला गड राखत आशिया खंडाचे आम्हीच चॅम्पियन हे दाखवून दिले. बांगलादेश येथे खेळवण्यात आलेल्या ‘अंडर १९’ आशिया चषक स्पर्धेत भारताच्या युवा शिलेदारांनी सगळ्याच संघांवर निर्विवाद वर्चस्व गाजवत, आशिया चषक पटकावला. भारतीय संघाने सिमरन सिंहच्या नेतृत्वाखाली आशिया चषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेवर एकहाती विजय मिळवत तब्बल सहाव्यांदा चषक पटकावला. याआधी दुबईमध्ये झालेल्या भारतीय वरिष्ठ संघाने बांगलादेशवर निसटता का होईना पण विजय मिळवत आशिया चषकावर नाव कोरले होते. त्यापाठोपाठ आता या युवा खेळाडूंनी नवे आहोत, पण कमी नाही, हे दाखवत सहाव्यांदा आशिया चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. भारताने यापूर्वी १९८९, २००३, २०१३-१४, २०१६ आणि २०१२ मध्ये १९ वर्षांखालील आशिया चषक चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती, तर २०१२ मध्ये भारताला पाकिस्तानसोबत विजय विभागून देण्यात आला होता. त्यावेळी क्वालालंपूर येथे उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारत आणि पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील संघामध्ये झालेला अंतिम सामना अनिर्णित राहिला होता. रविवारी झालेल्या या अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांनी केवळ तीन बळींच्या बदल्यात तब्बल ३०४ धावांचे आव्हान श्रीलंकेसमोर ठेवले, मात्र श्रीलंकेच्या संघाला हे आव्हान काही पेलता आले नाही आणि त्यांचा संघ केवळ १६० धावा करीत तंबूत परतला. नाणेफेक जिंकत अगदी रोहित शर्मा आणि शिखर धवन सारखेच, युवा संघातील यशस्वी जयस्वाल आणि अनुज रावत या सलामीवीरांनी ‘यशस्वी’ अशा ३०४ धावांचे ‘शिखर’ श्रीलंकेसमोर उभे केले. मात्र, या आव्हानाच्या जवळपासही भारताच्या युवा फिरकी गोलंदाजांनी श्रीलंकेला फिरकू दिले नाही. हर्ष त्यागी या भारताच्या फिरकी गोलंदाजाने केवळ ३८ धावा देत, श्रीलंकेच्या सहा खेळाडूंना तंबूत पाठविले आणि आशिया चषकाला आपल्या खिशात टाकले. या युवा खेळाडूंचा खेळ बघता, त्यांना या स्पर्धेच्या सुरुवातीलाच आपण चॅम्पियन होणार असल्याचा विश्वासच होता की काय, असे वाटत होते. एकूणच शेवटी चॅम्पियन आम्हीच, यात काही दुमत नाही...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@