मनात मॅरेथॉन सुरूच असते...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2018   
Total Views |



चालणे, धावणे या ईश्वराने दिलेल्या अनुपम भेटीचा मागोवा घेत धावत राहा-चालत राहा. जीवनातली आणि मनातलीही मॅरेथॉन सुरूच ठेवा, रोगांना दूर ठेवा, हा मंत्र ज्येष्ठ नागरिकांना देणारे अजित कांबोज.


महाराष्ट्रभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या कोणत्याही मॅरेथॉन स्पर्धेत विजेता म्हणून अजित कांबोज यांचे नाव येतेच येते. अजित कांबोज यांनी मॅरेथॉन धावण्याचे प्रशिक्षण घेतले आहे का? त्यांनी लहानपणापासून धावण्याचा सराव केला आहे का? त्यांच्या घरून तशी पार्श्वभूमी आहे का? छे... यापैकी काहीच नाही. मुळचे बार्शीचे असलेले कांबोज कुटुंब. श्रेणीकराजन कांबोज आणि श्रीमतीदेवी कांबोज हे दाम्पत्य १९५०च्या दशकात मुंबईला आले. श्रेणीकराजन उच्चशिक्षित, तर श्रीमतीदेवी अल्पशिक्षित. या दाम्पत्याला तीन मुली आणि एक मुलगा अजित. श्रेणीकराजन मिलमध्ये अकाऊंटंट होते. पण मिल बंद पडण्याच्या काळात आर्थिक ताणाताणीने कुटुंबाला त्रास झाला. या काळात कांबोज कुटुंब मशिद बंदरहून धान्य आणत आणि ते विकत असत, तर त्यावेळी लहान असणारे अजित घरोघरी वर्तमानपत्र टाकण्याचे काम करत. पुढे शाळेत असताना अजित यांनी खाजगी दवाखान्यात कंपाऊंडरचे काम केले आणि त्या पैशांनी कसेबसे शिक्षण पूर्ण केले. या सर्व घडामोडीत पळणे, धावणे तेही स्पर्धेच्यादृष्टीने केवळ अशक्य. पण मग अजित यांना ज्येष्ठ नागरिकांच्या मॅरेथॉनचे हमखास विजेते अशी बिरूदावली का आणि कशी मिळाली?

 

यावर अजित सांगतात, “मी पहिली मॅरेथॉन स्पर्धा जिंकली त्यावेळी माझे वय ४५ वर्षे होते. तोपर्यंत मी मॅरेथॉन स्पर्धा सोडा पण, साध्या धावण्याच्या स्पर्धेचाही विचार केला नव्हता. पण आता मला वाटते, मी धावू शकलो यात रा. स्व. संघाच्या शाखेचे खूप योगदान आहे. त्यावेळी माझे बालपण आठवले. आम्ही चेंबूरला टिळक नगरला राहायचो. लहान मुलांना खेळण्यासाठी काही नसायचेच. पण तिथे रा. स्व. संघाची शाखा होती. तिथे शिक्षक राजाभाऊ आचार्य आणि रामभाऊ देशपांडे आम्हाला खेळ शिकवायचे. तिथे खेळायची गोडी लागली. खेळाच्या शिस्तीची व नियमांची सवय झाली. पुढे शिक्षण आणि कामानिमित्ताने खेळू शकलो नाही. पण अचानक संधी मिळाल्यावर रा. स्व. संघ शाखेतील मनात रूजलेले ते खेळ, ती सांघिक भावना, शिस्त पुन्हा ताजी झाली. त्यामुळे मी मॅरेथॉनमध्ये यशस्वी होतो.” ६१ वर्षांच्या अजित यांना मॅरेथॉनमध्ये अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी समाज आरोग्य जागृतीसाठी धावणे, हे ध्येय ठेवले आहे.

 

ज्येष्ठ नागरिकांच्या संघाला ते भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांचा संघ असल्याने वयपरत्वे शारीरिक आजारांची चर्चा होते. जुने दिवस आठवतात. ते दिवस आठवून सध्याच्या दिवसाबाबत दु:ख व्यक्त केले जाते. हे सर्व ऐकून घेऊन, समजून अजित आपला विषय सुरू करतात. ते म्हणतात, “धावा. धावा. धावा. सगळ्या आजारांना दूर ठेवा. निवृत्तीच्या वयापर्यंत नोकरी व्यवसायानिमित्त आपण सकाळी लवकर उठतो. तीच सवय आताही आहे. फक्त आता कामाला जायचे नसते. फावला वेळ खायला उठतो ना? इथे कट्ट्यावर किंवा बागेत बसून राहण्यापेक्षा धावण्याचा सराव करा. धावता येत नसेल, तर चालत राहण्याचा सराव करा. हा नि:शुल्क व्यायाम आहे. निसर्गाने बहाल केलेल्या चालण्या-धावण्याच्या व्यायामाचा वापर करा आणि रोगराई, वयपरत्वे येणार्या दुर्धर आजारांना दूर ठेवा.” अजित या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना धावण्याचे, चालण्याचे मनोबल देतात. अर्थात, असे धावून ज्येष्ठ व्यक्तींच्या शरीराला जितका फायदा होत असेल, त्याहीपेक्षा धावल्यानंतर किंवा सलग चालल्यानंतर मी अजूनही धावू शकतो, चालू शकतो, काहीतरी करू शकतो, ही जी भावना त्यांच्या मनात येते तिची किंमत होऊच शकत नाही.मॅरेथॉनबरोबरच अजित यांनी गिर्यारोहणही सुरू केले आहे. पण हे गिर्यारोहण केवळ छंदासाठी नाही, तर त्यासाठी ते ज्येष्ठांचा गट जमवतात. त्यांची मानसिक, शारीरिक तयारी करून घेतात. मग छोटे छोटे गड-किल्ले, टेकड्यांवर हा गट चालत जातो. त्यावेळी अजित आपल्या सहकार्यांसमोर उद्दिष्ट ठेवतात ते म्हणजे, टेकडी स्वच्छ करणे, जमवलेले बी-बियाणे या टेकड्यांवर रुजत घालणे वगैरे...

 

सामाजिक उपक्रम राबवताना खेळाचा उपयोग करून घ्यावा,” असे अजित यांचे ध्येय आहे. ते म्हणतात, “मोठ्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपल्या देशाचा तिरंगा दुसऱ्या स्पर्धकाच्या हातात द्यायचा असतो. जेव्हा दुसरा स्पर्धक आपल्याकडे किंवा आपण दुसऱ्या स्पर्धकाकडे तिरंगा देत असतो तेव्हा तिरंग्याची ती शान, देशाचा अभिमान प्रत्येक छोट्या-मोठ्या स्पर्धकाच्या चेहऱ्यावर मनात उमटलेली असते. माझ्यासाठी तो क्षण सर्वश्रेष्ठ आहे.वृद्ध वयात धावण्याकडे वळलेल्या आणि त्यात उत्तम यश संपादन केलेल्या अजित यांनाही लोकबोलाचे धनी व्हावे लागले होते. निवृत्तीनंतर मॅरेथॉन स्पर्धेचा सराव करताना कितीतरी जण मुद्दाम येऊन सांगून गेले की, “अरे वय आहे का तुझे? या वयात पडलाबिडलास तर? खेळण्याचे धावण्याचे वय असते. वयाला साजेसे असे कर.” अजित म्हणतात, “पहिल्यांदा मी हा सल्ला ऐकून गोंधळलो. पण एकक्षण भरच. पुन्हा मनात धावणे सुरू केले होते. त्यामुळेच मी सातत्याने मॅरेथॉन स्पर्धेत धावू शकतो. मनात मॅरेथॉन सुरूच असते...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@