भाजपविरोधी आघाडी ठरणार दिवास्वप्न?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2018
Total Views |

 

 

 
 
 
बसपनंतर सपचीही काँग्रेसपासून फारकत, आणखी वाट पाहू शकत नाही : अखिलेश
 

नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विशाल महाआघाडीस्थापन करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना आता एकामागोमाग एक मोठे हादरे बसू लागले आहेत. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी काँग्रेससोबत फारकत घेतल्यानंतर आता समाजवादी पक्षाचे नेते व उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही आम्ही काँग्रेसची आता आणखी वाट पाहू शकत नसल्याचे सांगत पुढील वाटचाल स्पष्ट केली आहे. यामुळे भाजपविरोधी विषय महाआघाडी स्थापन करणे, हे काँग्रेससाठी एक दिवास्वप्नच ठरण्याची शक्यता दिसत आहे.

 

सपचे नेते व मुलायमसिंह यादव यांचे पुत्र अखिलेश यादव म्हणाले की, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत आघाडी करायची की नाही, हा निर्णय घेण्यासाठी आता आम्ही काँग्रेसची आणखी प्रतीक्षा करू शकत नाही. काँग्रेसने आम्हाला दीर्घकाळ प्रतीक्षेत ठेवले, आता आणखी किती प्रतीक्षा करायची, असा प्रश्न उपस्थित करत समाजवादी पक्ष मध्य प्रदेश निवडणुकीत वेगळी वाट शोधणार असल्याचे अखिलेश यांनी स्पष्ट केले. अखिलेश पुढे म्हणाले की, आम्ही गोंडवाना गणतंत्र पक्षासमवेत आघाडीसाठी चर्चा करणार आहोत. यापूर्वीही त्यांच्याशी आघाडी करण्यात आली होती. त्यामुळे गोंडवाना गणतंत्र पक्षाशी मध्य प्रदेश निवडणुकीत आघाडी करण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. याखेरीज, मायावती यांच्या बसपसोबतही आघाडीसाठी चर्चा करणार असल्याची मोठी घोषणा अखिलेश यांनी यावेळी केली. नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. प्रारंभी काँग्रेससोबत जाण्याची हवा करणाऱ्या सपाच्या या पवित्र्यामुळे काँग्रेससह विरोधी पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

कोणत्याही परिस्थितीत मध्य प्रदेश व राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी युती करणार नाही, असे स्पष्ट करत बसप सर्वेसर्वा मायावती यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. त्यानंतर आता सपनेही काँग्रेसच्या आशांवर पाणी फेरल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांच्या निवडणुका २०१९ मधील लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी मानली जात आहे. काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी जोरदार तयारी चालवली आहे. मात्र, मध्य प्रदेश व राजस्थान या दोन महत्वाच्या राज्यांत सप आणि बसप हे महत्वाचे पक्ष एकत्र येऊन काँग्रेसच्या विरोधात लढल्यास मोठे मतविभाजन होऊन त्याचा फायदा अप्रत्यक्षरित्या भाजपलाच मिळू शकणार आहे. तसेच, संभाव्य महाआघाडीतील बसप व सप या महत्वाच्या पक्षांनीच काँग्रेसला रामराम केल्यास २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसपुढे मोठा प्रश्न उभा राहणार आहे. 

 
"काँग्रेसने आम्हाला दीर्घकाळ प्रतीक्षेत ठेवले. आणखी किती काळ प्रतीक्षा करावयाची? आता आम्ही गोंडवाना गणतंत्र पक्षासमवेत आघाडीसाठी चर्चा करणार आहोत. तसेच बसपशीही चर्चा करणार आहोत."

- अखिलेश यादव, नेते, समाजवादी पक्ष

 

उभारणीपूर्वीच तडे

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रशंसा करणे, राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण करणे, बसपने काँग्रेसपासून फारकत घेणे आणि आता सपदेखील दूर जाणे, अशा अनेक घटनांमुळे काँग्रेस सर्वेसर्वा सोनिया गांधी व अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संभाव्य भाजपविरोधी महाआघाडीला उभारणीपूर्वीच एकेक मोठे तडे जाऊ लागले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान एका व्यासपीठावर येत जोशात शक्तीप्रदर्शन करणाऱ्या तमाम विरोधी पक्षांमधील चलबिचलदेखील या घटनांमुळे वाढल्याचे दिसून येत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@