भूस्खलनांबद्दल थोडेसे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2018   
Total Views |



नमस्कार! ज्वालामुखींच्या जगात भटकंती केल्यावर आपण आता भूस्खलनांबद्दल गप्पा मारू. भूस्खलन ही क्रिया भूकंप व ज्वालामुखी यांच्यासारखीच विनाशकारी आहे. मात्र, याचे अनुमान काढणे बाकीच्यांपेक्षा तुलनेने सोप्पे आहे. कारण, भूस्खलन हे उघड्या डोळ्यांनी आपण पाहू शकतो. तसेच काही वेळा भूस्खलनाचा वेग बराच कमी असतो व त्यामुळेही स्वतःचा जीवही वाचवणे यात शक्य असते.


 

भूस्खलनाचे दोन प्रकार असतात - वेगवान भूस्खलन व सावकाश भूस्खलन. वेगवान स्खलन हे काही क्षणांमध्ये होते. याचा वेग इतका असतो की, तो याच्या प्रवाहात येणाऱ्या कोणत्याही गोष्टीला आपल्याबरोबर घेऊन जातो. याचे अनुमान सहसा काढणे शक्य होत नाही. अनुमान काढता आले तरी, इतक्या तत्काळ कोणतीही उपाययोजना करणे फारच कठीण असते. वेगवान स्खलनाचे वहन (Flowage), स्खलन (Sliding) व डोंगरकड्यांवरून खडक कोसळणे (Rock toppling) असे अनेक याचे प्रकार असतात. हळू स्खलनाचे अनुमान काढणे शक्य असते. हे स्खलन वर्षानुवर्षे चालू असू शकते. याचा वेग फारच कमी असतो. हळू भूस्खलनामध्ये ‘स्खलन’ हा प्रकार असतो. ‘जमीन खचणे’ हा प्रकारही हळू स्खलनातच मोडतो. भूकंप व ज्वालामुखीच्या उद्रेकाप्रमाणे भूस्खलनही मुख्यत: जमिनीचे बलीय संतुलन बिघडल्यामुळेच होते. तसेच जेव्हा एका वस्तूमधील दोन कणांमध्ये कोणत्याही चिकट पदार्थाशिवाय आकर्षण निर्माण होते, तेव्हा त्याला ‘घर्षणीय बल’ (Friction force, Shear force, cohesion) म्हणतात. कोणत्याही कारणामुळे जर जमिनीत कंपने निर्माण झाली व त्यामुळे जमिनीच्या उतारावरील मातीच्या कणांमधील घर्षणीय बल कमी झाले, तर भूस्खलन होऊ शकते. या कंपनांची कारणे बघू.

 

. भूकंपातून निघणाऱ्या भूकंपलहरींमुळे मातीच्या कणांमध्ये कंपन निर्माण होते. त्यामुळे त्या कणांपैकी बारीक कण खाली जातात व जाडे कण वरच राहतात. याला ‘सॅग्रिगेशन’ (Segregation) म्हणतात. यामुळे त्यांच्यातील कोहेजन कमी होते व वरील सुटे झालेले दगड खाली येऊ शकतात. यामुळे भूस्खलन होते.

 

. भूस्खलनांमध्ये पाण्याचे कार्य फार महत्त्वाचे आहे. पाणी हे नैसर्गिक वंगणासारखे कार्य करते. जेव्हा जमिनीत पाणी जाते तेव्हा ते मातीच्या कणांमधील घर्षण कमी करते. तसेच या पाण्यामुळे जमिनीत छिद्रीय बल (Pore pressure) निर्माण होते. यामुळे जमिनीची दाब झेलण्याची क्षमता (Load bearing capacity) कमी होते. त्यावर बांधकाम केल्यास भूस्खलन होऊ शकते.

 

. भूगर्भातील काही रचनाही भूस्खलनास कारणीभूत ठरतात. भूगर्भामध्ये विविध प्रकारचे खडक आहेत. काही खडक कठीण, तर काही ठिसूळ आहेत. बरेच खडक स्तरित (Layered) आहेत. त्यांचा क्षितिजाशी असलेला कोन बऱ्याचदा खूपच जास्त असतो. ते स्तर एकमेकांवरून घसरू शकतात. याशिवाय भूगर्भात सतत हालचालीही होत असतात. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर ताण पडतो. यामुळेही भूस्खलन होऊ शकते.

 

. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीची हालचाल होते. तसेच उद्रेकातून बाहेर पडलेले खडक, मॅग्मा इ. उतारावर पडत असतात. एखादा फारच मोठा खडक पडल्यास तेथे मोठा आघात होऊनही भूस्खलन होऊ शकते.

 

. मानवी कारणांमुळेही भूस्खलन होऊ शकते. अती खोदकाम केले, तर जमिनीत हादरे निर्माण होऊन त्यामुळे तिथे भेगा तयार होतात. तसेच बोगदे खणताना कधीकधी विस्फोटकांचाही वापर केला जातो. त्यामुळेही जमीन कमजोर होऊ शकते. बऱ्याचदा बांधकाम करताना वृक्षतोड केली जाते. अमर्याद वृक्षतोडीमुळेही भूस्खलन होऊ शकते.

 

आता भूस्खलनांचे परिणाम बघू.

 

. भूस्खलनांमुळे जीवितहानी व वित्तहानी होते.

 

. भूस्खलनांमुळेही भूकंप होऊ शकतो.

 

. ज्वालामुखींच्या परिसरात भूस्खलन झाल्यास ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो.

 

. खाणींच्या परिसरात भूस्खलन झाल्यास खाणींमधील उतार व बोगदे कोसळू शकतात.

 

. भूस्खलन झाल्यामुळे इतर परिसराचाही समतोल बिघडू शकतो. १९६७ मध्ये इटलीतील एका धरणामध्ये झालेल्या भूस्खलनामुळे पाण्याची फार मोठी लाट धरणावरून खाली आली व खालच्या गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

 

आता भूकंप किंवा ज्वालामुखीपेक्षा तुलनेने भूस्खलनापासून स्वत:चा बचाव करणे शक्य आहे कारण, याचे अनुमान करणे बाकी सगळ्यांपेक्षा सोप्पे व अचूक आहे. भूस्खलनापासून बचाव करण्याचे अनेक उपाय आहेत, त्यात प्रथम येते ते म्हणजे अनुमान (Forecasting of prediction). अनुमानामुळे होणाऱ्या भूस्खलनांची माहिती आधीच मिळवून स्वत:ची व जास्तीत जास्त आपल्या मालमत्तेची काळजी घेणे शक्य होते. हे अनुमान कसे काढतात? हे अनुमान काढण्यासाठी विविध सेन्सर्स वापरता येतात. तसेच असे एक यंत्र आहे, जे पृथ्वीतील त्वरण मोजू शकते. याला ‘त्वरणमापक‘ (accelerometer) म्हणतात. याशिवाय सॅटेलाईटवरील तसेच विमानातून काढलेल्या फोटोंचा अभ्यास करूनही हे अनुमान काढता येते.

 

आता भूस्खलनांसाठीच्या संरक्षक उपायांची माहिती घेऊ. हे उपाय केल्याने भूस्खलनांचा धोका बऱ्यापैकी कमी करता येतो. हे उपाय आपण बऱ्याचदा घाटांत बघतो.

 

. आपण बघितलेच आहे की, पाणी हे भूस्खलनांमागील महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे जमिनीतील अतिरिक्त पाणी काढून टाकणे हा भूस्खलन थांबवण्याचा एक उपाय आहे. यासाठी उतारांमध्ये पाण्याचे पाईप्स टाकून सर्व अतिरिक्त भूजल त्या पाईपांतून वाहून जाईल अशी व्यवस्था केली जाते.

 

. भूस्खलन थांबवण्याचा अजून एक मार्ग म्हणजे उतारांवर संरक्षक भिंती (Retaining walls) बांधणे. संरक्षक भिंती बांधल्यामुळे उताराच्या वरील भागात जरी भूस्खलन झाले तरी, भिंतीमुळे अडून राहते व अपघाताची शक्यता कमी होते.

 

. अजून एक मार्ग म्हणजे खडकांचे बोल्टिंग (Rock bolting) करणे. खडकांमध्ये मोठमोठे बोल्ट्स ठोकून त्याच्यात लोखंडाची जाळी लावली जाते. त्यामुळे पडणारे खडक जाळीतच अडकतात व खाली पडत नाहीत.

 

. जर बोल्टिंग अथवा संरक्षक भिंती बांधणे शक्य नसेल, तर उतारावर खड्डे खणून त्यांच्यात उच्च दाबाने काँक्रिट वगैरे भरले जाते. याला ग्युनायटिंग (Guniting) म्हणतात. त्यामुळे जमिनीत घर्षण वाढते व भूस्खलन होत नाही.

 

. वनीकरणामुळे (Forestation) भूस्खलनापासून संरक्षण करता येऊ शकते. कारण, झाडांची मुळे जमीन धट्ट धरून ठेवतात. तर, भूस्खलनांबद्दल एवढी माहिती माहिती घेतल्यावर हे प्रकरण आपण इथेच थांबवू. पुढील लेखात आपण भूगर्भशास्त्राच्या आणखी एका शाखेबद्दल माहिती घेऊ.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@