मांडा - टिटवाळामधील बाप्पांचे होते दुसऱ्यांदा विसर्जन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2018
Total Views |


 

टिटवाळा (अजय शेलार): गणपती बाप्पा म्हणजे अगदी लहान-थोरांपासून सगळ्यांच्याच अगदी जवळचा. सालाबादप्रमाणे त्याला अनेक घरांत सार्वजनिक मंडळात वाजत गाजत, ढोल-ताशांच्या गजरात थाटामाटात घरी आणले जातात. मनोभावे त्याची पूजा-अर्चाहीकेली जाते. त्यानंतर आपापल्या श्रद्धेनुसार त्यांना दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अगदी अनंत चतुर्दशी ते अगदी २१ दिवसांपर्यंतही त्याची मनोभावे पूजा करून त्यानंतर भावपूर्ण निरोप देत गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. मात्र, अनेक वेळा प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करून बनवलेल्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यातच कमी खोली असलेल्या आणि पाणी कमी असलेल्या भागात त्यांचे विसर्जन केल्याने त्या भग्न आणि केविलवाण्या मूर्ती पुन्हा काठावर आलेल्या आपल्या अनेकांच्या नजरेस पडतात. मात्र, चूकचुकण्याशिवाय कोणी काहीच करत नाही. परंतु हे चित्र तीन वर्षांपूर्वी मांडा-टिटवाळ्यात राहणार्‍या योगेश पाटील या युवकाने पाहिले आणि त्याने आपल्या श्रद्धास्थान असलेल्या आपल्या लाडक्या बाप्पाला आपण अशा भग्न अवस्थेत न ठेवण्याचा संकल्प केला. आपल्या मनातील विचार त्याने त्याच्या ‘साई कृष्णाई’ समाजिक संस्था आणि ‘गण गर्जना ढोल-ताशा पथका’ला सांगितल्यानंतर या सगळ्या मंडळींनी मिळून बाप्पांचे पुन्हा आस्थापूर्वक विसर्जन करायला सुरुवात केली. गेली तीन वर्षे योगेश पाटील आणि त्याचे सहकारी हा पुनर्विसर्जनाचा उपक्रम राबवत आहेत.

 

यंदाच्याही वर्षीगण गर्जना ढोल-ताशा पथका’तर्फे पुन्हा एकदा विसर्जन उपक्रम आयोजित करण्यात आला. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अनंत चतुर्दशीनिमित्त गुरवली काळू नदी, रूंदा नदी आणि पश्चिमेच्या वासुंदरी नदीत गणेश विसर्जनानंतर पाण्याच्या प्रवाहाने वर आलेल्या मूर्ती पुन्हा विसर्जित करण्यात आल्या. या उपक्रमात ‘गण गर्जना ढोल-ताशा पथका’तील वादक असलेल्या योगेश पाटील, संजित चव्हाण, सिद्धांत मोरे, तेजस भांगरे, रोहन पवार, तुषार आंबरे, दुर्वेश पाटील, ओमकार मोरे, आशुतोष मेमाणे, स्वरूप पुनस्कर, प्रथमेश सपकाळ, मयूर जाधव, लक्ष्मण मंचरकर, केयूर मंचरकर, चारुशीला मंचरकर, नेहा भोय, कल्याणी पवार यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक तर होतच आहे पण, त्याचबरोबर अनेक युवक-युवतीदेखील यासारख्या अनेक सामाजिक उपक्रमासाठी योगेश पाटीलशी जोडले जात आहेत.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@