सूर्य-चंद्र-ग्रह आणि चिन्हसंकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2018   
Total Views |

 

 

 
चित्र क्र १, इजिप्शियन सूर्यदेव “रे” याचे चिन्ह.
 
 
चिन्ह आणि चिन्हसंस्कृतीचा प्राचीन भारतीय संस्कृती- शिल्पकला-मूर्तिकला-चित्रकला याच्या माध्यमांतून मागील वीस लेखांत करून दिलेला परिचय वाचकांना निश्चितपणे आवडला असेल याची मला खात्री आहे. शिल्प-मूर्ती-चित्र यावर अजूनही भरपूर लिहिले जाईल, याचीही जाणीव आहे. मात्र, आता या टप्प्यावर वास्तव जगातील या सर्व व्यक्त कलांच्या पलीकडे जाण्याची मला उत्सुकता आहे. म्हणूनच आता जगभरातील अजूनही टिकून राहिलेल्या आणि अस्तंगत झालेल्या अशा दोन्ही प्रकारच्या प्राचीन मानवी संस्कृतींच्या, खगोलीय सूर्य-चंद्र-ग्रह यांच्या चिन्ह आणि चिन्हसंकेतांचा परिचय आपण करून घेणार आहोत.
 

सूर्य-चंद्र-ग्रह-प्राणी-पक्षी यांच्या चिन्ह आणि चिन्हसंकेतांच्या असतील काही पुराणकथा... त्यात नाविन्य ते काय असेल?? असाही प्रश्न एखाद्याला पडेलही कदाचित. आपण त्यांचा पूर्वग्रह दूर करायचा प्रयत्न करूया. जगातील प्रचलित आणि अस्तंगत धर्म संकल्पना आणि विविध पंथ-सांप्रदायिक गटांच्या निश्चित स्वीकृत उद्दिष्ट आधारांचा आणि सिद्धांतांचा अभ्यास केला, तर पहिली गोष्ट लक्षात येते की, वर्तमानकाळात कुठलाही धर्म आणि संप्रदाय त्यांचे असे मूळ उद्देश-सिद्धांत आता विसरला आहे. दर्शनी विधींचे महत्त्व विनाकारण वाढले आहे. समारंभ, उत्सव यालाच प्रमाणाबाहेर महत्त्व दिले जात आहे. अलीकडेच संपन्न झालेला गणेशोत्सव बघा. गणेशमूर्ती, विसर्जन क्रिया यांच्या तपशिलांचा उपहास आणि विटंबना झाल्याचेच अनुभवास येते. या उत्सवातील अनियंत्रित-आकस्मिक-प्रासंगिक आक्रमक उत्साह फक्त लक्षात राहतो. विसरलेल्या मूळ उद्देश विधानाचे गणेशोत्सव हे फक्त एक नैमित्तिक उदाहरण आहे इतकेच.

 

अशा अनेक प्राचीन धर्म-पंथ-सांप्रदायिक संकल्पनाच्या मूळ धारणा आणि स्वीकृत सिद्धांताच्या गाभ्यामध्ये सूर्याची-सूर्य देवतेची उपासना हे प्राथमिक उद्दिष्ट होते. भारत आणि शेजारील चीन यांच्या सारख्या प्रचलित प्राचीन संस्कृती असोत किंवा मेक्सिकोतील माया आणि इजिप्तमधील फारोह अशा प्राचीन मात्र अस्तंगत संस्कृतींमध्ये सूर्याची उपासना महत्त्वाची आहे आणि होती. आता या वास्तवाला फक्त एक पुराणकथा म्हणून दुर्लक्ष करावे की सूर्य-चंद्र-ग्रहांच्या उपासनेच्या अशा संकल्पना एकेकाळी या धर्म-पंथ-सांप्रदायिक उपासकांना आत्मिक ऊर्जा देऊन आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवत होत्या, हे वास्तव म्हणून स्वीकारावे याचा अभ्यास आणि विश्लेषण आपण करणार आहोत. परदेशी धार्मिक शिक्षण संस्थांमध्ये शिक्षित महाभागांना आणि मार्क्स-लेनिन-माओच्या अनुयायांना अशा श्रद्धा आणि भक्तीच्या संकल्पना हिणकस, अप्रतिष्ठित-दर्जाहीन वाटतात. अशा प्राचीन सांस्कृतिक आणि पारंपरिक श्रद्धा आणि भक्तीच्या जागा कल्पित कथा, असत्य आणि मिथ्या असल्याचा कांगावा करून, त्याचा पुरस्कार करणार्‍या व्यक्तींवर सर्व माध्यमांतून सतत हल्ले होत असतात. अशा श्रद्धांना सांस्कृतिक-ऐतिहासिक-पुरातत्व मूल्य आहे, हे सिद्ध करण्यासाठी अशा श्रद्धेच्या धारणा कायद्याच्या तराजूमध्ये मोजाव्या लागतात, हा अलीकडचा नित्याचा अनुभव आहे. प्राचीन संस्कृतीतील काही शतकांपूर्वीच्या काळात तत्कालीन नागरिकांना मात्र या उपासना पद्धती, पुराणकथा न वाटता एखाद्या निश्चित ज्ञानशाखेच्या अभ्यासाचे सहज उपलब्ध होणारे साधन वाटत होते. निव्वळ लिखित शब्द लिहून आपले आध्यात्मिक अनुभव व्यक्त करता येणार नाहीत, याची जाणीव आपल्या पूर्वजांना नक्की होती. नाईल नदीच्या काठावरील आता अस्तंगत झालेल्या प्राचीन इजिप्शियन संस्कृतीतील अशा पुराणकथा-मिथके आणि त्याला जोडलेली चिह्ने यांचा परिचय प्रथम करून घेऊया.

 

या सगळ्या चिन्हसंस्कृतीची चर्चा सुरू असताना प्रथम आपण पुराणकथा आणि मिथकं या संकल्पनांची व्याख्या करूया, त्याची लक्षणे आणि मर्यादा समजून घेऊया. ‘धर्म’ ही पूर्ण संकल्पना कधीही एकदम निर्माण होत नाही. त्याच्या प्रगतीचा मार्ग समजून घेण्यासाठी टप्प्या टप्प्याने त्यामागील घटना आणि समाजाची मानसिकता याची नोंद घ्यावी लागते. पुराणकथा नेहमीच एका समाजाच्या, एखाद्या समुदायाच्या सामूहिक श्रुती आणि मग स्मृतींचा भाग असतात. कधी एखाद्या समाजाच्या-समुदायाच्या ध्येय, अपेक्षा किंवा स्वप्नसुद्धा असतात. उदाहरणार्थ, स्वातंत्र्याची आस असे एखाद्या समाजाचे स्वप्न असू शकते. भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थितीचा, घटनांचा आणि दीर्घकालीन अनुभवांचा फार मोठा प्रभाव अशा समाजाच्या पुराणकथा, मिथके आणि अपेक्षांवर झालेला अनुभवता येतो. प्राचीन इजिप्तच्या भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थितीत नाईल नदीला सतत येणारा महापूर, त्यामुळे होणारे शेती आणि सुपीक जमिनीचे नुकसान, होणारी प्राणहानी आणि यावर कायमस्वरूपी उपाययोजनेचा अभाव या सर्वांमुळे तत्कालीन समाज गोंधळून गेला होता. महापूर, रोगराई, प्राणहानी, नुकसान ही आणि अशी कारणे देवाची अवकृपा असावी अशा धारणेने त्याची श्रद्धास्थाने शोधत होता. रोज उगवणारा, समोर दिसणारा सूर्य आणि चंद्र हे आपले देव आहेत, अशी श्रद्धा त्या समाजात दृढ झाली होती.

 

चित्र क्र २, इजिप्शियन फरोह आखेनातेन आणि त्याचे कुटुंबीय सूर्य उपासना करताना. 

 

निसर्गाचा कोप, नुकसान, निराशा त्यामागोमाग सांत्वन- समाधान व्हावे म्हणून धीर देणारी श्रद्धा आणि श्रद्धास्थाने या कालांतराने परंपरा बनत होत्या. अशा परंपरा संस्कृतीचे स्वरूप आणि चेहरा बनल्या आणि मोठ्या समाजाच्या, समुदायाच्या सामूहिक श्रुती आणि मग स्मृतींचा भाग झाल्या. कालांतराने त्या श्रद्धा, देवाच्या नियमित उपासनेच्या आणि पूजेच्या गरजा बनल्या. उपासना कशासाठी, याचे वर्णन करण्यासाठी लिपी आणि भाषा स्वरूपात निश्चित माध्यम तयार झाले असले तरी, त्याचा प्रसार फार मर्यादित होता. पर्यायी योजना म्हणून उपासना-पूजा-प्रार्थनेच्या वेळी चित्र आणि भूमितीय आकृती स्वरूपात सर्व मान्य प्रतिमा रचना आणि पक्षी-प्राण्यांची चित्रे, चिन्हे स्वरूपात समोर ठेवली गेली. शतकानुशतके अशी प्रगती होत राहिली आणि पुराणकथा, मिथके यापासून उपासना संस्कृती निर्माण झाली आणि कालांतराने क्रमाक्रमाने त्याचे धर्म, पंथ, संप्रदाय यामध्ये परिवर्तन झालेअसे धर्म-पंथ-संप्रदाय नेहमीच स्वत:ची चिन्हे आणि चिन्हसंस्कृती निर्माण करत होते. जशी व्यक्तींना स्वतःची ओळख निर्माण करायची होती, तशीच गरज त्या समाजाची आणि समुदायाची होती. खास निर्माण केलेली चिन्हे त्या त्या समाजाची-समुदायाची उपासनेची ओळख होती आणि समविचारी नागरिक त्या त्या समुदायाकडे जोडले जात होते. प्राचीन इजिप्तमध्ये प्रत्येक छोट्या गावातून असे उपासना पंथ-संप्रदाय तयार झाले होते. असा प्रत्येक समुदाय, त्यांच्या मर्यादित अनुभवातील जगाचे व्यवहार, रोज बदलणारा निसर्ग, जन्माला येणारे बालक आणि दुर्घटनेत मृत्यू झालेले आप्तेष्ट यांचाच विचार करत होता आणि त्यांच्या सर्व उपासना आणि चिन्हे या मर्यादित विचारांवरच केंद्रित झाली होती.

 

असा काही शतकांच्या परंपरा आणि श्रद्धा-उपासना संस्कृतींच्या प्रभावातून निर्माण झालेली ‘धर्म’ ही संकल्पना समाजातील नागरिकांना एकत्र आणण्याचे निश्चित काम करत असते. कारण, त्या समाजाची-समुदायाची अपेक्षा-उद्दिष्टे-स्वप्ने समान असतात. सातव्या-आठव्या शतकांतील इजिप्तच्या इतिहासात या ‘उपासना’ आणि ‘धर्म’ संकल्पनेचा प्रभाव एक विशेष संस्कृती निर्माण करणारा होता आणि त्यामध्ये चिन्हे आणि चिह्नसंस्कृती भूमिका अगदी महत्त्वाची आणि प्राथमिक स्वरूपाची होतीइजिप्त या राष्ट्राचा आधुनिक काळात मिळणारा परिचय या सूर्य-चंद्र आणि खगोलीय ग्रहांच्या उपासना संस्कृतीतील चिन्हे, पारंपरिक संस्कृतीमध्ये वापरलेली प्राणी आणि पक्षांची त्यांच्या नैसर्गिक क्षमता आणि वैशिष्ट्यांसाठी वापरलेली प्रतीके या सर्वांच्या चिन्हसंकेतांचा पुढील अभ्यास निश्चितपणे फार रंजक आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@