एक अतूट स्नेहबंध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2018
Total Views |

 


 
 
कलाग्रणी गदिमा आणि लोकाग्रणी यशवंतराव 
 

महाराष्ट्र वाल्मिकी, पटकथा लेखक आणि अभिनेते ग. दि. माडगूळकर तथा अण्णा (१५ ऑक्टोबर, १९१९ ते १४ डिसेंबर, १९७७) यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. सन २०१२ मध्ये यशवंतरावजी चव्हाण यांची जन्मशताब्दी आपण साजरी केली. साहित्यप्रेमी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री हा यशवंतरावांचा लौकिक. त्यांचे लेखन, त्यांची भाषणे, त्यांच्या प्रस्तावना, नवोदित साहित्यिक-कवींना कौतुकाची थाप पोहोचविणारी त्यांची शेकडो पत्रे हे या महाराष्ट्राचे मोठे सांस्कृतिक संचित आहे. राजकारणाच्या व्यस्त आणि विषम वेळापत्रकात इतके विपुल लेखन आणि वाचन करणारा मुख्यमंत्री असे त्यांचे मानांकन बहुधा यापुढेही अनेक वर्षे कायम रहील. अण्णा आणि यशवंतराव यांच्यातील अतूट स्नेहबंध उभयतांची कर्तृत्वाची क्षेत्रे भिन्न असूनही कायम होते.

 

यशवंतराव आणि गदिमा या दोन्ही माणदेशी माणसांचा स्नेहबंध १९४२च्या आंदोलनकाळात भूमिगत असतानाचा. कुंडल येथील आंदोलकांच्या गुप्त बैठकांमध्ये शाहीर शंकरराव निकम यांनी काही कविता आणि कवने सादर केली ज्यांची यशवंतरावांना भुरळ पडली. शाहिरांकडे विचारणा केली असता, गदिमांचे नाव पुढे आले. उभयतांची प्रत्यक्ष भेट मात्र १९५० साली मुंबईत एका मित्राच्या घरी झाली. “या भेटीत मला माझा एक जिवलग दोस्त मिळाला,” असे यशवंतराव सांगतात. १९६७ चे महाबळेश्वर अधिवेशन हे महाराष्ट्र काँग्रेसच्या इतिहासातील एक महत्त्वाचे अधिवेशन. यावेळी यशवंतराव आणि गदिमा चार दिवस एकत्र होते. यशवंतरावांचा पिंड साहित्य रसिकाचा आणि त्यांना लाभलेले अण्णांसारखे मित्र. त्यामुळे उभयतांच्या सहजभेटी मैफलीमध्ये सहज परावर्तीत होत. ‘ऋणानुबंध’ मध्ये यशवंतरावांनी अतिशय हृद्य आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. ते म्हणतात, “अण्णांच्या आणि माझ्या अनेक भेटी, बैठका झाल्या, पण क्वचितच अशी बैठक असेल की, मी त्यांना हात धरुन शेजारी बसवून म्हटले नाही, “अण्णा, ‘जोगिया’ म्हणा ना!” अण्णा गीतरचना करू लागले की अनेक सुंदर सुंदर रसाळ शब्द आणि कल्पना त्यांच्यासमोर ‘मला घ्या, मला घ्या’ असे म्हणत गर्दी करत असल्या पाहिजे.” गदिमांच्या निधनाची बातमी यशवंतरावांना कळली तेव्हा गहिवरलेल्या यशवंतरावांचे शब्द होते, ‘‘अण्णा, फार लवकर गेलात... ‘पापण्यात गोठविली मी नदी आसवांची...’ सीतेच्या अग्निप्रवेशाच्या वेळी रामाने काढलेले हे उद्गार अण्णांच्या अकाली निधनाचा शोकभार सहन करताना आठवावेत, हा त्या शब्दांचा प्रभाव म्हटला पाहिजे,” असे यशवंतराव लिहितात. ‘गदिमा’ १९६२ ते १९६८ आणि १९६८ ते १९७४ असे दोन टर्म विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य होते. म्हणजे असं की, त्यावेळी साहित्य-कला-क्रीडा-विज्ञान यात योगदान देणाऱ्यालाच राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नेमले जात होते! विधान परिषद सदस्य म्हणून चर्चेत सहभाग घेताना त्यांनी मांडलेले विचार हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दयानंद तथा भाऊसाहेब बांदोडकर यांच्या निधनानंतर शोकप्रस्तावावर बोलतांना ‘गदिमा’ म्हणाले होते, “लोकशाहीत अनेक राजकारणी येतील व जातील. मुख्यमंत्री देखील दुसरे मिळतील. परंतु, असा हा उदार, दाता सापडणे मात्र कठीण आहे. सत्ता सोडून देण्याच्या बुद्धीने सत्ता हाती घेणारा माणूस विरळा. असा हा लोकविलक्षण नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. मला खात्री आहे गोव्यातील लक्षावधी गोरगरीब लोकांच्या घरात आज सकाळी उठून जेव्हा त्यांनी पेज रांधली असेल तेव्हा भाऊसाहेबांच्या निधनाची बातमी ऐकून रांधलेल्या पेजेत मिठाची चिमकली घालण्याऐवजी बायाबापड्यांच्या डोळ्यातील पडलेल्या अश्रुबिंदूमुळेच ती पेज खारट झाली असेल.”

 

उभा देश आहे तुझा पाठीराखा...

 

मुख्यमंत्री असताना यशवंतरावांना संरक्षणमंत्री पदासाठी दिल्लीचे बोलावणे आले. त्यावेळी महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी त्यांना प्रेमादराचा निरोप दिला. विशेष म्हणजे, हे ठराव सत्ताधारी पक्षाकडून नव्हे तर विरोधी पक्ष नेत्यांकडून त्या-त्या सभागृहात मांडले गेले. महाराष्ट्रातील संसदीय सभ्यता आणि परंपरेतील हे उदाहरण फार महत्त्वाचे आहे. विधान परिषदेत याप्रसंगी बोलताना ‘गदिमा’ म्हणाले, “असाहा थोर रसिक आज सेनानायक होऊन जात आहे. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने महान भाग्याची गोष्ट आहे. त्यांचे भाग्य ते साऱ्या महाराष्ट्राचे भाग्य आहे. त्यांच्या नव्या जबाबदारीची वार्ता पहिल्या दिवशी मी जेव्हा ऐकली तेव्हा मला सुचेना की, तार काय करावी. चार माणसे अभिनंदनाची तार करतात तशी करावीशी वाटेना. इंग्रजीत तार करून माझ्या भावना कशा व्यक्त होणार? त्यासाठी ज्ञानेश्वरांची मराठीच पाहिजे. मराठी श्लोकाच्या ओळी माझ्या अंत:करणामधून आल्या आणि मी लिहिले –

 

उभा देश आहे तुझा पाठीराखा ।

तुझी कीर्त वाढो जशी चंद्ररेखा ।।

 

चीन आक्रमणामुळे परिस्थिती बिकट होती. वातावरणात स्फूर्ती आणि चैतन्य पुन्हा निर्माण होणे आवश्यक होते. ‘गदिमां’चे शब्दच त्यासाठी धावून आले.

 

माणुसकीच्या शत्रूसंगे युद्धआमचे सुरू,

जिंकू किंवा मरू

 

वीररस प्रगट करणारी अण्णांची लेखणी ‘जोगिया’ साकारताना मात्र तितकीच मुलायम होते. विड्याच्या पानाच्या शिरा नखांनी हळूवार काढल्या जातात, ते सांगतांना ‘गदिमा’ म्हणतात –

 

हळूवार नखलीशी पुन: मुलायम पान

निरखीसी कुसर वर कलती करूनी मान

गुणगुणसी काय ते ?-

गौर नितळ तव कंठी -

स्वरवेल थरथरे, फूल उमलले ओठी

 

यशवंतराव-आचार्य अत्रेंच्या काळाचे जवळचे साक्षीदार राहिलेले, सहा दशकांपासून मंत्रालय आणि विधीमंडळाचे वार्तांकन करीत असलेले,

 

संदर्भसमृध्द ज्येष्ठ पत्रकार वसंतराव तथा दादा देशपांडे यांच्याकडे उभयतांमधील स्नेहबंधाचे अनेक प्रसंग आहेत, ज्यातून तेव्हाचा काळ डोळ्यासमोर उभा राहू शकतो. नागपूर हिवाळी अधिवेशनाची परंपरा सुरू झाली त्यावेळी प्रारंभी आमदार निवास बांधण्यात आले नव्हते. सध्या सुयोग पत्रकार वसाहत आहे तेथे आणि अन्यत्र आमदारांची निवास व्यवस्था केली जायची. त्याच्या आसपास पत्रकारांचाही निवास असायचा. अण्णांमुळे आमदार आणि पत्रकारांची सायंकालीन गप्पांची मैफल रंगत जायची. एकदा साग्रसंगीत भोजनासाठी माशांचा बेत केला गेला. मुंबईतील हा मेनू नागपुरातही मिळाल्याने मत्स्यप्रेमी खुश होते. खानसामाने, जेवणाला काय आहे, या प्रश्नाला आज मासे केले आहेत असे सांगताच अण्णा त्यावर उद्गारले, “व्वा! आज साक्षात् विष्णूचा प्रथमावतार आपल्या भेटीसाठी तयार आहे!”

 

स्वा. सावरकर आणि गीतरामायण...

 

वसंतराव तथा दादा देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर फडके तथा बाबूजी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना गीतरामायण ऐकविले होते. स्वा.सावरकरांनी ते आवडीने ऐकले, परंतु ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ या पंक्तींना मात्र त्यांनी नापसंती दर्शविली. प्रखर बुद्धिवादी आणि आयुष्यभर नियतीशी दोन हात करणाऱ्या स्वा. सावरकरांना जीवनातील अपरिहार्य अगतिकतेचा हा भावार्थ रुचला नसावा. दादा देशपांडे यशवंतरावांच्याच गावचे म्हणजे कराडचे. वर्तमानपत्रातील नोकरी मात्र आचार्य अत्रेंच्या ‘मराठा’त!

 

१९५७ च्या विधानसभा निवडणुकीची ही गोष्ट. कराडमधून काँग्रेसतर्फे द्विभाषिकाचे मुख्यमंत्रिपद भुषविणारे यशवंतराव आणि संयुक्त महाराष्ट्र समिती (शेकाप) तर्फे केशवराव पवार अशी तुल्यबळ लढत होती. यशवंतरावांना कराडमध्येच रोखण्यासाठी समितीचे सारे नेते जंग जंग पछाडत होते. संपूर्ण राज्यातही समितीने झंझावत निर्माण केला होता. कराडच्या लढतीकडे साऱ्यांचे लक्ष होते. मुंबईतील समिती आंदोलकांवरील गोळीबार आणि मोरारजी देसाई विरोधातील नाराजीची पार्श्वभूमी या निवडणुकीला होती. अखेर मतदानाचा दिवस उजाडला. कराडच्या सोमवार पेठेतील मतदार मतदानप्रसंगी काय भूमिका घेणार याविषयी औत्सुक्य होते. दुपारपर्यंत फारसे कोणी मतदानासाठी बाहेर पडले नव्हते. शेवटी पेठेतील बुजुर्ग मंडळी गोळा झाली. समितीच्या उमेदवाराला मतदान करून काहीच उपयोग नाही, त्यामुळे फार तर समितीचा एक आमदार वाढेल. त्याऐवजी यशवंतरावांना आपण साथ दिली तर भविष्यात तेच पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील सर्वांनी यशवंतरावांना मतदान करावे, असा निर्वाळा पेठेतील समाजधुरिणांनी दिला. त्याप्रमाणे दुपारनंतर सोमवारपेठवासियांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी लांब रांग लावली. मतमोजणीप्रसंगी प्रारंभिक फेऱ्यांमध्ये समिती (शेकाप) चे उमेदवार केशवराव पवार यांनी बाजी मारली होती. दादरला ‘चित्रा’ टॉकीजसमोर आचार्य अत्रेंच्या कार्यालयाबाहेर कराडचा निकाल जाणून घेण्यासाठी गर्दी जमली होती. समितीचा उमेदवार विजयी झाल्याचे कोणीतरी घोषित करून पेढेही मागविले, पण सोमवार पेठेची मतपेटी मतमोजणीसाठी आली आणि यशवंतराव १६२६ मतांनी विजयी झाले.

 

अण्णांच्या लिखाणात गांधी हत्येनंतर ब्राह्मणांच्या घरादाराच्या झालेल्या राखरांगोळीचाही उल्लेख आहे. यशवंतरावांनी तेव्हा संपूर्ण समाजाला दोषी धरणे चुकीचे आहे, अशी स्पष्ट भूमिका घेत नुकसानीची धग सोसावी लागलेल्या कुटुंबांना मदतही मिळवून दिली होती. कराडमध्ये त्यावेळी जाळपोळीची एकही घटना घडली नव्हती. घरदार उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना त्यावेळी कर्जाऊ रक्कम उपलब्ध करून दिली गेली. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्र निर्मितीनंतर यातील अनेक कर्जे माफ करण्याचा निर्णयही यशवंतरावांनी घेतला.

 

डांग्या खोकला नको गं बाई

 

ही गदिमांची प्रचारकाळातील काँग्रेससाठीची कॅचलाइन तेव्हा चांगलीच लोकप्रिय झाली होती. ‘महाराष्ट्र कवी’ हा सुरू केलेला किताब, साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना यासारखे साहित्यापोषक उपक्रम यशवंतरावांनी सुरू केले. यासंदर्भात गदिमांशी वेळोवेळी चर्चा झाली होती, त्याचेच हे फलित होय, असे यशवंतरावांनीच लिहून ठेवले आहे.

 

श्रोत्यांमध्ये बसले यशवंतराव...

 

‘गदिमा’ काँग्रेसनिष्ठ आणि सुधीर फडके संघनिष्ठ. पण, म्हणून त्यांच्या कलाकेंद्री मैत्रभावात कधी बाधा आली नाही. अर्थात, अण्णांना दोन टर्म विधान परिषद मिळाली, तेव्हा, अहो ते संघनिष्ठ बाबूजींचे आणि पु. भा. भावेंचे मित्र आहेत... फार कशाला ‘पुलं’चे तर अण्णा जिगरी दोस्त आहेत. सायंकालीन गप्पाष्टकांमध्ये हे सारे एकत्र असतात, अशा कागाळ्या यशवंतरावांच्या कानाशी लागून कोणी केल्या नसतीलच असे नव्हे! क्षुद्र मनोवृत्तीची माणसे सार्वकालिन आणि सार्वत्रिक असतात. मला खात्री आहे, अशांना यशवंतरावांनी तेथल्या तेथे फटकारले असेल. पु. ल. देशपांडे अध्यक्ष असलेल्या सुवर्णमहोत्सवी इचलकरंजी साहित्य संमेलनात (१९७४) पुलंनी मंत्री व्यासपीठावर नकोत अशी अट घातली. ही अट कळल्यावर तेव्हा केंद्रीय मंत्री असलेले यशवंतराव म्हणाले, “ठीक आहे, ही अट मला मान्य आहे. पण, मराठी साहित्याचा एक रसिक म्हणून मी व्यासपीठासमोर श्रोत्यांमध्ये तर बसू शकतो ना! आणि ते तसे बसलेही!! इचलकरंजी अगोदर यवतमाळला झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान ‘गदिमां’ नी भुषविले.

 

वंद्य वंदे मातरम्

 

माझ्या पिढीतील जवळपास सर्वांनाच ‘गदिमां’ना प्रत्यक्ष बघता अथवा ऐकता आले नाही. पण, सुधीर फडके तथा बाबूजींमुळे गीतरामायण आणि ‘गदिमा’ घराघरातील आबालवृद्धांपर्यंत पोहोचले. तसे ते आमच्यापर्यंतही पोहोचले.’गदिमा’ समजावून घेण्यासाठी नव्या पिढीला पुलं वाचावे लागतील आणि सुधीर फडके ऐकावे लागतील. शृंगारिक काव्य लिहिणाऱ्या गदिमांनी ‘गीतरामायण’ तर लिहिलेच, पण त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ओव्या आणि अभंगांच्या तोडीच्या संतकाव्यासारख्या रचनाही कागदावर प्रगटल्या. ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’ हे त्यांच्याच ‘वंदे मातरम्’ चित्रपटातील बाबूजींनी अजरामर केलेले गीत ऐकताना देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या बांधवांच्या इतिहासातील वीरगाथा आपल्या डोळ्यासमोर तरळत कंठ दाटून आल्याशिवाय आणि डोळ्यांच्या कडा पाणावल्याशिवाय रहात नाही.

 

रूंग्ठा हायस्कुलमध्ये बाबूजींचे गीतरामायण...

 

या महाराष्ट्र वाल्मिकीने आपल्या पुण्यातील बंगलीला ‘पंचवटी’ हे नाव दिले होते. नाशिकमध्ये १९८३ साली नाशिक शिक्षण प्रसारक मंडळातर्फे जु. स. रुंग्ठा हायस्कुलच्या प्रांगणात सुधीर फडके तथा बाबूजींचा गीतरामायणाचा कार्यक्रम झाला होता. रात्रौ ९ वा. सुरू झालेला हा कार्यक्रम उत्तररात्रीपर्यंत चालला. खरीखुरी पंचवटी असलेल्या नाशिकनगरीत सादर झालेला तो कार्यक्रम बालपणी ऐकण्याचे सद्भाग्य मला आई-वडील आणि आप्त कै. दिवाकर कुलकर्णी यांच्यामुळे मिळाले. प्रभू रामचंद्र वनवासात असताना पंचवटीत म्हणजे नाशिक नगरीत वास्तव्याला होते. कैकेयीमुळे हे सारे उद्भवलेले. बाबूजींनी त्यावेळी ‘माता न तू वैरिणी’ हे गीत अशा विलक्षण पद्धतीने सादर केले की जणू त्यांच्या रोमारोमातून भरताचा संताप बाहेर फुटून येत होता. गीताच्या शेवटी त्यांनी पेटी दोन्ही हातांनी दाबत आवेशाने वर उचलून खाली ठेवली खरं तर आपटली तेव्हा स्तब्ध झालेले श्रोते क्षणभराने भानावर आले आणि त्यानंतर टाळ्यांचा प्रचंड पाऊस पडला. मला खात्री आहे त्या उत्तररात्री रुंग्ठा हायस्कुल जवळून वाहणाऱ्या गोदेपलीकडील तीरावरील काळाराम आणि गोराराम बाबूजींच्या स्वरप्रतिभेने आणि गदिमांच्या शब्दप्रतिभेने नक्कीच सद्गतीत झाले असतील. नाशिकला रामनवमीनंतर कामदा एकादशीला पुरातन काळाराम मंदिरापासून रामरथ मिरवणुकीची परंपरा आहे. रामरथमार्गावरील चौकाचौकात रामरथ येताच वाडे, इमारतींमधून पुष्पवृष्टी केली जाते. प्रत्येक ठिकाणी गीतरामायणांतील स्वर कानी पडत असतात. लहानपणी हौशी दीपककाकामुळे पंचवटीतील घरी आलेला करणा आणि श्वानचिन्हांकित ‘एचएमव्ही’चा गीतरामायणाच्या तबकड्यांचा संच आणि ग्रामोफोन ‘गदिमां’मुळेच आजही डोळ्यासमोर येतो.

 

आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे

स्वयंवर झाले सीतेचे

स्वयंवर झाले सीतेचे...

 

हे गीत ऐकताना शब्द आणि स्वर सामर्थ्यामुळे आनंदसोहळ्याचे आपणही भाग बनतो. आता क्षणार्धात गंधर्व, यक्षांचा आकाशातून पुष्पअक्षतांचा वर्षाव सुरू होतो की काय, असं वाटत राहतं. नाशिकमधील गायक मोहनराव करंजीकर (तेली गल्ली, रविवार कारंजा) हे गीतरामायणाचे कार्यक्रम तेव्हा अतिशय उत्तमप्रकारे सादर करीत असत. १९७९ मध्ये वडील विद्युत नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष असताना मंडळातर्फे त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे स्मरते.

 

‘पुलं’ नी एकदा ‘गदिमां’ ना म्हटलं, ‘नाच गं घुमा’ सारखं काहीतरी लिहा. लगेच ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ हे गाणं एकटाकी लिहिलं गेलं. ‘देवबाप्पा’ चित्रपटाची जवळजवळ सहा गाणी त्यांनी पहाटे तीन वाजेपर्यंत लिहिली. ‘पुलं’ आणि ‘गदिमा’ एकदा पहाटे फिरायला निघाले, तेव्हा नगरपालिकेचे दिवे होते ते एकदम विझले. ‘गदिमा’ लगेच म्हणाले-

 

विझले रत्नदीप नगरात

आता जागे व्हा युदनाथ ।।

 

विणकरांच्या मागाचा जो ठेका असतो, त्या चालीवर गाणं पाहिजे हा ‘पुलं’चा आग्रह होता. चितळ्यांच्या मिठाईच्या दुकानापासून आश्रम बंगल्याच्या वाटेपर्यंत गदिमांचे गीत रचून तयार होते कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम...’

 

अद्भुत प्रतिभासामर्थ्याला सलाम...

 

अद्भुत प्रतिभासामर्थ्य लाभलेला कवी आणि शंभरहून अधिक चित्रपटांच्या पटकथालेखकाचे जन्मशताब्दी निमित्त हे मनोज्ञ स्मरण आणि त्याअनुषंगाने, त्यांना दाद देणाऱ्या साहित्यरसिक नेत्याचीही ही कृतज्ञ आठवण. महाराष्ट्राचे हे पूर्वसंचित जपले जावे आणि वाढलेही जावे ही सदिच्छा. कारण –

 

अंधेर है वहाँ, जहाँ आदित्य नही है,

मुर्दाड है वह देश, जहाँ साहित्य नही है ।

 

हा दुसरे अण्णा म्हणजे विद्याधर गोखले यांचा आवडीचा शेर हे होय. इति लेखनसीमा. 

 
- निलेश मदाने 
(लेखक महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी आहेत.)
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@