‘ते’ शिक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2018
Total Views |


 

लैंगिकतेविषयीचे योग्य शिक्षण हे मानवी विकासातील फार महत्त्वाचे शिक्षण आहे. वास्तविक पाहता, या शिक्षणाची प्रक्रिया जन्मापासून प्रौढत्वापर्यंत आणि नंतरही निरंतरपणे चालत राहणारी आहे.

 

आपल्या नववीतील मुलाने त्याच्या वहीच्या मागच्या पानावर लैंगिक क्रिया दर्शवणारी चित्रे काढली व त्याबद्दलचा एक संवादही सविस्तरपणे लिहिला, हा धक्का माझ्याकडे आलेल्या एका मध्यमवर्गीय दाम्पत्यासाठी फारच मोठा होता. “आमच्या घरात असं काही वातावरण नाहिये हो. मी आणि त्याची आई त्याच्यासमोर एकमेकांचा हात धरणेदेखील टाळतो. याला हे असलं सगळं घाणेरडं कुठून माहीत झालं कुणास ठाऊक? त्याची संगतच वाईट असणार हे नक्की,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया देणाऱ्या त्याच्या बाबांशी आणि चित्र पाहिल्या क्षणापासून डोळ्याला पदर लावून बसलेल्या त्याच्या आईशी मला खूप सविस्तरपणे या विषयावर बोलावे लागले. सर्वच पालकांची प्रतिक्रिया इतकी टोकाची येत नसली तरी, लैंगिकतेच्या शिक्षणाबाबत अनास्था, दुर्लक्ष, विषय लांबणीवर टाकणे, भावनिक उद्रेक अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आजही पालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर समोर येताना दिसतात. पौगंडावस्थेतील मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल तुलनेने ठळक असल्याने त्याविषयी अपुरी का होईना पण, काही माहिती त्यांना घरातील स्त्रियांकडून मिळालेली असते. शाळांमध्येही आता मोठ्या प्रमाणावर ही माहिती देणारी सत्रे मुलींसाठी घेतली जातात. परंतु, मुलगे मात्र शास्त्रीय माहितीपासून आजही मोठ्या प्रमाणावर वंचित राहताना दिसतात. मग उत्सुकतेच्या तीव्रतेपोटी, सध्या सहजपणे उपलब्ध असणाऱ्या इंटरनेटवरील माहितीच्या आधारे आणि ‘जाणकार’ मित्रमंडळींकडून अनेक चुकीचे ग्रह त्यांच्या मनावर कोरले जातात. त्याचा त्यांच्या भविष्यातील नातेसंबंधांवर तर परिणाम होऊ शकतोच. पण, त्यांच्या स्वत:च्या भावनिक वाढीवरदेखील चुकीचे परिणाम होतात.
 

लैंगिकतेविषयीचे योग्य शिक्षण हे मानवी विकासातील फार महत्त्वाचे शिक्षण आहे. वास्तविक पाहता, या शिक्षणाची प्रक्रिया जन्मापासून प्रौढत्वापर्यंत आणि नंतरही निरंतरपणे चालत राहणारी आहे. या शिक्षणाची प्रक्रिया एक-दोन पुस्तके वाचायला देणे, काही व्हिडिओज दाखवणे आणि एखाद्या सत्राद्वारे केलेली चर्चा यापेक्षा खूप दीर्घकाळ चालणारी असायला हवी. लहान मुलाला स्वत:ची आंघोळ स्वत: करायला शिकवताना शरीराचे सर्व अवयव स्वच्छ करायला सांगणे यातही लैंगिकतेचे शिक्षण समाविष्ट नाही का? माझे शरीर सुदृढ ठेवण्याची जबाबदारी आणि माझ्या शरीराचा योग्य वापर करण्याचा हक्क या दोन्ही गोष्टी माझ्यावरच अवलंबून आहेत, ही जाणीव मुलांना लहानपणापासूनच हळूहळू देत राहायला हवी. या शिक्षणाच्या प्रक्रियेत गरज पडेल तिथे तज्ज्ञांची मदत घेणेही अत्यंत आवश्यक आहे.

 

मुलांशी लैंगिकतेच्या विषयावर नक्की कधी बोलायला सुरुवात करावी?’ असा प्रश्न उत्सुक आणि सज्ञान पालक विचारतात. गरजेपेक्षा जास्त माहिती कमी वयात देणे पालकांना प्रशस्त वाटत नाही. अर्थात, त्यांनी विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर म्हणून एक विशिष्ट वय सांगता येणार नाही. कारण, प्रत्येक मुलाची आकलनशक्ती, समज, प्रगल्भता, सारासारविवेकबुद्धी वेगवेगळ्या पातळीवर व वेगवेगळ्या वेगाने विकसित होत असते. परंतु, आपण घरात मुलांना, जे मनात येतील ते प्रश्न विचारण्यासाठी पोषक असे वातावरण निर्माण केलेले असेल, तर बहुतांश वेळा मुलांचे प्रश्नच त्यांची त्या प्रश्नांविषयीची माहिती ग्रहण करण्याची तयारी दर्शवणारे असतात. त्यामुळे असे प्रश्न पालक म्हणून आपण कसे हाताळतो हे फार महत्त्वाचे आहे. हे प्रश्न अनेकदा कात्रीत पकडणारे असले तरी, ते टाळून चालणार नाहीत. त्याचबरोबर प्रश्नाच्या फार पुढे जाऊन त्याक्षणी मुलांना ग्रहण करता येणार नाही, अशी माहिती पुरवण्याचीही आवश्यकता नाही. ‘मनमोकळा संवाद’ व ‘शास्त्रशुद्ध ज्ञान’ हे लैंगिकतेच्या शिक्षणाचे मूलभूत आधारस्तंभ आहेततेरा-चौदा वर्षानंतर मुला-मुलींना भिन्नलिंगी आकर्षण वाटणे ही अत्यंत नैसर्गिक बाब आहे, हे पालकांनी प्रथमतः मनापासून स्वीकारायला हवे. त्यानंतरच मग आपल्या भावनांवर, वर्तनावर नियंत्रण कसे ठेवायचे हे मुलांना शिकवणे शक्य होईल. या वयात भावनांच्या आहारी जाण्याची शक्यता मुलांच्या बाबतीत तशीही बरीच वाढलेली असते. त्यामुळे अशा संवेदनशील विषयांवर पालकांच्या जर तीव्र प्रतिक्रिया उमटत गेल्या, तर मात्र त्याचा दुष्परिणाम होण्याचीच शक्यता जास्त असते. इथे प्रामुख्याने पालकांच्या विचार, भावना व वर्तनातील संतुलन फार महत्त्वाचे आहे.

 

- गुंजन कुलकर्णी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@