मृत्यू : एक चिंतन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2018
Total Views |


 
 

मृत्यू म्हणजे आपल्याबद्दल चिंतन म्हणजे विनोबा आठवतात. भगवद्गीतेचा पाठ डोळ्यांसमोर येतो. मृत्यू म्हणजे मोठी झोप. एरवी नेहमीची आठ तासांची ही निद्रा.

 
 

जातस्य हि ध्रुवो मृत्यूध्रुव जन्म मृतस्य च

तस्माद परिहार्येऽर्थे त्वं शोचितुमर्हसि ॥२७॥

(भ.गी. अध्याय २)

 

अर्थात, हे मृत्यो, तू आधी का, कसा कुठे केव्हा येणार? सॉरी! त्यातील का, हा प्रश्न नको विचारायला. तू यायलाच पाहिजे. निसर्ग नियम तो.

 

उपजे ते नाशे नायले पुनरपि दिसे।

हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे गा ॥

(ज्ञानेरश्वरी दुसरा अध्याय)

 

जन्म व मृत्यू हे आयुष्याचे दोन किनारे धरले, तर गेलेलेआयुष्य हे खडक, रेताळ पाणी, संथ प्रवाह, खडकाळ प्रदेश, भोवरे यात अडकत सावकाश प्रवाहित केले तरी, मृत्यू हा किनारा लागणारच. जन्म-मृत्यू ठरलेले आहेत. त्याला पर्याय नाही. यातून गरीब-श्रीमंत, बुद्धिमान-अडाणी, सुंदर-कुरूप, लहान-थोर कुणीच सुटलेले नाहीत. समर्थांनी दासबोधात ३०-३५ ओव्याचा एक समासच फक्त मृत्यूवर लिहिला आहे.

 

माती सांगे कुंभाराला, पायी मज तुडविसी।

तुझाच आहे शेवट वेड्या, माझ्या पायाशी॥

 

खरं आहे, पण माझ्या बाकीच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. कधी म्हणजे दिवसा-रात्री, पहाटे-दुपारी घरी कुणी नसताना, घर भरलेले असताना कुणाच्या कार्यात नको बरं. उगीच कुणी म्हणेल घरच्यांना, “यांना आत्ताच बरा मरायला वेळ मिळाला!” तसं होऊदे नको. रविवारी सकाळी चालेल म्हणजे शनिवारी रात्री उद्याचेकार्यक्रम ठरवून दूध पिऊन मस्त झोप आणि सकाळी पाहतात तर महानिद्राधीन! किती छान! विनासायास मृत्यू! झाडाचे वाळलेले पान गळून पडावे अगदी सहज, या खोलीतून त्या खोलीत गेल्यासारखे सुलभ. यातना विरहित मृत्यू यावा, असे मी म्हणते. पण प्रत्यक्षात कुठे? अपघातात, पाण्यात पडून की घरात काहीतरी अंगावर पडून की विजेचा शॉक लागून? की घरात हळूहळू श्वासोच्छ्वास मंद होत... एक शेवटचा श्वास घेत... शेवटची चिरनिद्रा...
 

शरीर खूप विकलांग झाल्यावर नको रे बाबा मृत्यू देऊ. आयुष्य बदलणारच, थकणारचं, परस्वाधीन थोडफार होणारचं, पण हालचाल स्वयंचलित असू दे. अर्थात, ही मागणी भगवंताजवळ बरं! यमराज, तुम्हाला घाबरण्याचं वय नाही माझं. जाणत झालं आहे. जो आला तो जाणार हे निश्चित आहे. या मोठ्या प्रवासाची दोन गाठोडी तयार आहेत.एक मोठं गाठोड व एक लहान. पुण्य असलेलं मोठं असेल गाठोड, असं मला वाटतं. अर्थात, ते ठरविण्याचा अधिकार आपला आहे भगवंत. आमचे आगाशे काका सांगत होते, एकदा असेच दुपारीयमराज दाराशी आले आणि म्हणाले, “येऊ का?” म्हटंल, “या बसा... पाणी घ्या. चहा सांगतो ठेवायला.” “मला वेळ नाही. आमची काळवेळ ठरलेली असते. मी यायला आलो आहे,“ यमराज म्हणाले. “मग, मी तयार आहे गाठोडे बांधून. चहा घ्या. मग निघू.” खरंच कल्पनेनेही चित्र किती छान वाटतं. प्रत्यक्ष यमाशी असं बोलता येईल का? सती सावित्री, नचिकेत यांची पुण्याई निराळी.

 

मृत्यू म्हणजे आपल्याबद्दल चिंतन म्हणजे विनोबा आठवतात. भगवद्गीतेचा पाठ डोळ्यांसमोर येतो. मृत्यू म्हणजे मोठी झोप. एरवी नेहमीची आठ तासांची ही निद्रा. आमच्या काकांनी कॅलेंडरवर १३ तारखेवर खूण केली होती व लिहिले होते, ‘मी नसेन तरी, सर्वजण मजेत राहा.’ त्यांना कळलं होतं दीर्घ झोपेचं तत्त्व. घरात मृत्यूबद्दल सहसा उगीच कुणी बोलत नाही. उलट निरवानिरवीचा विषय कुणी काढला, तर विषय बदल असं म्हणतात. ‘खरं तरं मरणाचे स्मरण असावे,’ हे वाक्य मला फार आवडते. बाबा आमटे म्हणतात, “असं जगावं, बोलावं. खूप आयुष्य आहे समजून बेत करावे मरून.” पण असंही जगावं जणू काही उद्याच मृत्यू येणार आहे म्हणून झोकून देऊन जिद्दीने हिंमतीने पूर्ण शक्ती लावून काम करावे, जसे उद्याचा दिवस आपल्यासाठी उगवणारंच नाही. संत नाथांनी एक गृहस्थाला “तुम्ही सात दिवसांनी मरणार आहात असे सांगितले.” तर त्या कंजुष रागीट माणसाचं वागणं बदललं. सौम्य, कुणाला दुखणार नाही अशी भाषा वापरू लागला. त्याचा स्वभाव बदलला. ‘नाथांनी मरणाचे स्मरण ठेव’ असाच उपदेश केला. खिल्लारीचा भूकंप उत्तराखंडाचा महापूर केवढे रौद्ररूप. भीती वाटते त्या प्रसंगाची. होत्याचे नव्हते झाले तेव्हा. पितृपंधरवडा आला की कोणतेही शुभ कार्य करत नाहीत.

 
पितरांना पाणी, दूध, नैवेद्य द्यायचा. त्यांचे आशीवार्द घ्यायचे ही आपली परंपरा आहे. खरंच भगवंता, हे मृत्यूदेवा, तुमचं घर, महाल, मृत्युलोक नव्हे स्वर्ग असतो तरी कसा? आमची मीना असेल २४-३० वर्षांची. परवा बोलताना म्हणाली, “बाबा जाऊन झाले दोन महिने पण, खूप आठवण येते. रडू येते. परवा तर स्वप्नात आले होते बाबा.” ते म्हणाले,“ रडू नको. मी मजेत आहे. चल, तुला स्वर्ग दाखवतो. माझे ठिकाण दाखवतो.” मला उंच पर्वतावर नेलं आणि म्हणाले,” ती दरी हिरवीगार दिसते ना आणि चमचमणारे दिवे, लकलकणारे उजेडाचे दिवे, तेच माझं घर.” खरचं स्वप्न स्पष्ट आठवतं! मी जागी झाले पण, समाधान वाटते ते बाबा भेटल्याचे. खरंच असाच स्वर्ग असेल, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे खरं; पण कल्पना नक्कीच चांगली आहे. मृत्यू म्हणजे देहाची खोळ बदलणे व मोठी विश्रांती. परिवर्तन हवेच! कर्म सिद्धांताप्रमाणे, नवीन देहात जायचे. आठ तासांची झोप नेहमीची. ही नऊ महिन्यांची झोप व पुन्हा कुठेतरी टॅह्याऽऽ टॅह्याऽऽ.... मग मृत्यू. हा एक आनंद सोहळा का नको? यमराज आपण नियमाप्रमाणे वागणारे...
 

कालः कलयतामहम। किंवा मृत्युः सर्व हरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम्।

 

असं भगवंतानी सांगितलं आहे. खरं आहे. सॉरी खूप बोलले. नम्रपणे आदरपूर्वक शरणागत होऊन नतमस्तक होते. प्रत्यक्ष नाही करता येणार म्हणून!

-मंगला नातू 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@