गलबताचे हिंदोळेगलबताचे हिंदोळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2018
Total Views |
 


संघाची भलाई करून पवार पुरते पेचात अडकले आहेत. ज्यांचा अपप्रचार करून पवारांच्या बगलबच्च्यांनी सत्तेची ताटे मिळविली, आता पवारच त्यांचे कौतुक करायला लागल्यावर पेच तर पडणारच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उदय निरगुडकरांना मुलाखत दिल्यानंतर सुरू झालेले झंझावात अद्याप संपलेले नाहीत

 

निरगुडकरांनी मुलाखत उत्तम रंगविली आणि पटकन संघाविषयी प्रश्न विचारून मोकळे झाले. पवारांनीही फारसा विचार न करता जे काही खरे ते सांगून टाकले. पवारांचा स्वत:चा म्हणून काही वकूब आहे. तो तसा नसता तर पंतप्रधानांनाही त्यांचे बोट पकडून राजकारणात गेल्याची ग्वाही जाहीरपणे द्यावी लागली नसती. मात्र, राजकारणात नेहमी पोटात एक ठेवायचे असते आणि ओठात दुसरे. पवार सातत्याने हेच करीत आले आहेत. आपल्या देशात तर गेली कित्येक वर्षे अनेकांनी हाच कित्ता गिरविला आहे. पवार, मुलायम, ममता, जयललिता ही मुळातच हुशार माणसे; पण कल कुठे आहे ते पाहून कलंंडण्याची प्रादेक्षिक पक्षांची अपरिहार्यता असते, ती पवारांनाही लागू होती. पवारांसारख्या चाणाक्ष राजकारण्याला संघ करीत असलेल्या सेवाकार्यांची आजतागायत माहिती नव्हती, हे म्हणणे दुधखुळेपणाचे ठरेल. काँग्रेस हा या देशाचा नैसर्गिक राजकीय पक्ष असल्यापासून पवार आणि त्यांच्यासोबत उभी राहिलेली मंडळी सत्तेची ताटे उपभोगत आली आहेत. यांच्यासमोर स्वत:च्याच पक्षातले सोडले तर असे कोणी विरोधकच नव्हते. रामजन्मभूमी आंदोलनापासून या देशात सक्षम राजकीय पर्याय म्हणून संघविचारांची मंडळी मूळ धरू लागली. मग या सगळ्या मंडळींनी संघाच्या कुटाळक्या करायला सुरुवात केली. आता खुद्द सरसंघचालकच समोर येऊन लोकांशी संवाद साधायला लागल्याने संघाबाबत केला जाणारा अपप्रचार पूर्णपणे थांबला आहे. ज्या संघाला त्यांनी तहहयात ‘जातीयवादी, धर्माचे राजकारण करणारे’ म्हणून हिणविले त्यांच्याविषयी पवारांनी काढलेले उद्गार ऐकून महाराष्ट्रातील जनता चक्रावूनच गेली होती. मात्र, काही फटाके आकाशात दूर जाऊन फुटताना आधी दिसतात आणि नंतर त्यातून आवाज येतो, तसा पवारांच्या मुलाखतीचा आवाज मागाहून यायला लागला. काँग्रेस सोडून पवारांसोबत राष्ट्रवादी काढणार्‍या तारिक अन्वर यांनीच पवारांच्या या भूमिकेवर चिडून राजीनामा देऊन टाकला. राफेल विमान खरेदी प्रकरणात जो काही आता धुरळा उडतोय, त्यात पवारांनी मोदींना चक्क क्लीन चिट देऊन टाकली. जितेंद्र आव्हाडांसारख्या एकगठ्ठा मुस्लीम मतांवर निवडून येणार्या आमदाराने तर पवारांच्या मताच्या परस्परविरोधी मताचे ट्विट केले. अर्थात, मुक्तमाध्यमांनी त्यांची भरघोस खिल्ली उडविली, पण मूळ मुद्दा चर्चेसाठी राहतोच, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तुमचा कसा शत्रू आहे, हे मुसलमानांना सांगूनच या मंडळींनी आपली दुकाने थाटली आहेत. आता यांचेच नेते अशी संघाची तारीफ करू लागले तर आपण निवडून कसे यायचे? हाच या मंडळींसमोरचा प्रश्न आहे.

 

आपण लोकसभेची निवडणूक लढविणार नाही,” अशी घोषणा पवारांनी केली आणि कन्येच्या हातात बारामतीचा कल्पवृक्ष देऊन पवार राज्यसभेवर गेले. आता पवार पुणे लोकसभा लढविण्याच्या गोष्टी करू लागले आहेत. याची कारणे दोन आहेत. एक तर राज्यसभेतल्या जागा हळूहळू भाजपकडे येत आहेत आणि ज्या मोदींना निरनिराळ्या प्रकारची प्रमाणपत्रे पवारांनी गेल्या तीन-चार वर्षात दिली आहेत, त्यामुळे पवारांचा कोअर मतदार त्यांच्यावर पूर्णपणे नाराज आहे. मुस्लीम, अनुसूचित जाती-जमाती, वनवासी यासारख्या समाजघटकांना स्वत:बरोबर ठेवण्याची पवारांची एक पद्धत होती. त्या त्या जातीतला माणूस हुडकून त्याच्यामागे आपली सारी ताकद उभी करायची. मात्र, आता या सगळ्याच समाजघटकांमध्ये स्वत:चे असे नेतृत्व उभे राहिले आहे. मुस्लिमांमध्ये ओवेसीसारखे नेते पुढे येत आहेत, तर अन्य जाती-जमाती भाजपच्या मार्गावर गेल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांचा गेल्या तीन-चार वर्षांचा धडाका पाहाता, महाराष्ट्रातले पवार-ठाकरे या दोन बिंदूंभोवती फिरत राहणारे राजकारण आता ‘वर्षा’ बंगल्याभोवती फिरू लागले आहे, ही बदलती परिस्थिती पचविणे सोपे नाही. पवारांचा स्वत:चा वकूब सोडला तर पक्ष म्हणून त्यांनी जे काही चालविले त्याला कधीच काहीही अर्थ नव्हता. छगन भुजबळ, सुनील तटकरे, पद्मसिंह पाटील यांच्यासारख्या स्थानिक मनसबदारांची मोट पवारांनी उत्तम बांधली आणि त्यांच्या आधारावर राज्य केले. या सगळ्यांनी आपले मतदारसंघ व त्यातील स्वत:ची ताकद राखून पवारांना रसद पोहोचविण्याचे काम केले. २०१४ पासून केंद्रात मोदींनी व महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारचे वातावरण उभे केले आहे, त्यातून या सगळ्याचे बालेकिल्ले एक एक करून ढासळतच चालले आहेत. छगन भुजबळांना हाताशी धरून पवारांनी ओबीसीचे राजकारणही उत्तम केले. मात्र, भुजबळ तुरुंगात गेल्याबरोबर धनंजय मुंडेंना पर्याय म्हणून उभे करण्याचे प्रयोग पवारांनी चांगले चालविले. आता भुजबळ पुन्हा बाहेर आल्यानंतर धनंजय मुंडेंना विंगेत पाठविण्यात आले आहे. त्यामुळे मागील विधानसभा सत्रामध्ये अत्यंत आक्रमक असलेले धनंजय मुंडे सध्या अत्यंत शांत झाले आहेत. पवारांनाही न सुटलेले भुजबळांचे कोडे हे आता असे आहे. पवारांच्या पक्षाची स्थिती ही सध्या अत्यंत विचित्र झाली आहे. अजितदादा त्यांच्या प्रतिभेमुळे व सुप्रिया सुळे त्यांच्या अवाजवी आक्रमकतेमुळे पवारांची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे एकेकाळी लोकप्रिय असलेला हा नेता शोकांतिकेकडे वाटचाल करू लागला आहे. राजकीय आवाका व समज याबाबत पवारांचा हात कुणीही धरू शकत नसले तरी राजकारणाला लागणारे अधिष्ठान नसल्याने हेलकावे खाणार्या भल्यामोठ्या गलबतासारखी पवारांची अवस्था झाली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@