गुंतवणूकदारांच्या विश्वासाचा ‘नवा चेहरा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2018
Total Views |
 
 
 

चंदा कोचर यांच्या राजीनाम्यानंतर आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा संदीप बक्षी यांनी स्वीकारली. तेव्हा एक यशस्वी बँकरबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या इतर पैलूंची ओळख करुन देणारा हा लेख...

 

देशातील प्रमुख बँकांपैकी एक आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संदीप बक्षी यांची निवड झाली आहे. चंदा कोचर यांनी वादग्रस्त कर्ज वाटप केल्याच्या प्रकरणानंतर दिलेला राजीनामा आणि बक्षींची नियुक्तीनंतर शेअर बाजाराचा निर्देशांक आठशे अंकांनी घसरला असतानाही आयसीआयसी बँकेचे शेअर्स मात्र १२ अंकांनी वधारले. त्यामुळे आयसीआयसीआय बँकेने संदीप बक्षी यांची योग्य वेळी केलेली नियुक्ती गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवणारी ठरली आहे. व्हिडियोकॉन समुहाला आणि दीपक कोचर यांच्या मालकीच्या ‘न्यू-पॉवर’ या कंपनीला कर्ज दिल्याप्रकरणी जून २०१८ मध्ये चंदा कोचर यांची चौकशी सुरू झाल्यावर ‘क्रायसिस मॅनेजर’ या पदावर ५७ वर्षीय बक्षी नियुक्ती करण्यात आली होती. या काळात कोचर यांना चौकशी सुरू असल्याकारणाने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. राजीनामा दिल्यानंतर कोचर यांचा बँकेच्या कोणत्याही कंपनीशी संबंध नसला तरीही त्यांची चौकशी ही सुरूच राहणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बक्षी पुढील पाच वर्षे बँकेचा कार्यभार पाहणार आहेत. बक्षी यांनी पंजाब इंजिनिअरींग कॉलेज, चंदीगढ येथून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी जमशेदपूर येथील झेव्हियर लेबर रिलेशन इन्स्टिट्यूटमध्ये एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. १९८३ मध्ये त्यांनी कॉम्युटर मार्केटिंग विभागात ओआरजी सिस्टममध्ये त्यांनी पहिली नोकरी केली होती. या लहानशा नोकरीपासून ते एका मोठ्या बँकेतील सर्वोच्च पदापर्यंतचा बक्षी यांचा प्रवास थक्क करणारा आहे. १९८६ साली ते आयसीआयसीआय बँकेत उत्तरेकडील भागात ‘ऑपरेशन ऑफिसर’ म्हणून रूजू झाले. या काळात त्यांच्याकडे व्यवसाय वृद्धीपासून ते कंपनीतील विविध पुनर्रचनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग शाखांच्या विस्ताराचे काम त्यांनी या काळात पाहिले. त्यांच्या काळात बँकेच्या विविध भागांत शाखांचा विस्तार झाला. यानंतर २००२ मध्ये ते आयसीआयसीआय लॉम्बार्डमध्ये उत्तर-पूर्व भागातील शाखांचा कार्यभार सांभाळू लागले. एप्रिल २००६ पासून ते भूषण स्टिल लिमिटेड कंपनीत संचालक होते. २००९ मध्ये ते पुन्हा आयसीआयसीआय बँकेवर कार्यकारी संचालक म्हणून रूजू झाले. त्यांच्या कार्यकाळात आयसीआयसीआय बँकेच्या इतर कंपन्याच्या व्यवसाय विस्ताराला दिशा मिळत गेली. बक्षी यांचे प्राणिप्रेम हा ही उद्योगजगतात तसाचर्चेचा विषय. बक्षी वर्षातून किमान पाच ते सहा अभयारण्यांना भेटी देतात. रोजच्या धावपळीतून निसर्गाच्या सान्निध्यात मन रमवणे, ते जास्त पसंत करतात. प्राण्यांना तासन्तास न्याहाळत बसणे हा त्यांचा आवडता छंद. याशिवाय बॉलिवूडचेही त्यांना खास आकर्षण. विरंगुळा म्हणून जुनी हिंदी गाणी ऐकण्यात त्यांना जास्त रस आहे. त्यातही एसडी बर्मन, ओपी नय्यर, मदन मोहन हे त्यांचे आवडते संगीतकार. ते नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीची (एनडीए) परीक्षा उत्तीर्ण झाले. मात्र, त्यांनी एनडीएत सेवा बजावलेली नाही.
 

 
 
 
अतिशय हुशार व्यक्तिमत्त्व असलेल्या बक्षी यांच्यावर विश्वास दाखवत गुंतवणूकदारांनी गुरुवारी आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सची दमदार खरेदी केली. बँकेचा शेअर तीन ते पाच टक्क्यांनी उसळला. व्हिडियोकॉन समुहाला कर्ज देण्याच्या नियमांमध्ये गुंतवणूकदारांच्या प्रश्नांना सुरुवातीपासूनच वाटाण्याच्या अक्षता लावणार्या कोचर यांचा राजीनामा बँक संचालक मंडळाने केवळ पंधरा मिनिटांत स्वीकारणे आणि त्यानंतर लगेचच संदीप बक्षी यांच्या नियुक्तीची घोषणा करणे, हे गुंतवणूकदार आणि बँकेच्या ग्राहकांना सुखावणारे होते. परंतु, अद्यापही बँक, गुंतवणूकदार आणि स्वतः बक्षी यांच्यासमोर मोठी आव्हाने आहेतच. चंदा कोचर यांच्या चौकशीचा फेरा अजूनही सुरूच राहणार आहे. उरला प्रश्न बुडीत कर्जांचे दिव्यही पार करण्याचा आणि बँकेचा नावलौकिक परत मिळवण्याचा, तर ते आव्हान बक्षी यांना पेलावे लागेल. सध्या देशात बँकिंग सेवेचे मोडत चाललेले कंबरडे, त्यातही पहिल्यांदाच गेल्या तिमाहीत तोट्यात गेलेली आयसीआयसीआय बँक, त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांच्या अपेक्षा बक्षी यांच्या नियुक्तीमुळे वाढल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, बक्षी हे भारतीय क्रिकेटपटू कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनीप्रमाणे अगदी थंड डोक्याने काम पाहतात. ‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणून व्यवसायसृष्टीत त्यांचा नावलौकिक आहे. त्यामुळेच संचालक मंडळाने त्यांना ही जबाबदारी दिल्याचे म्हटले जात आहे. बक्षी थेट संचालक मंडळाला उत्तरदायी असणार आहेत. निर्देशक मंडळाने त्यांच्या नियुक्तीसाठी जून २०१८मध्ये शिफारस केली होती. शेअर बाजारातील अनिश्चित वातावरणादरम्यान झालेली बक्षी यांची नियुक्ती आणि त्यातही बँकेचा वधारलेला शेअर, ही गोष्ट सरळ गुंतवणूकदारांचा त्यांच्यावर असलेला विश्वास दर्शवतो. बँकेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी असलेले तारणहार म्हणून सध्या त्यांच्याकडे पाहिले जात असताना ते त्या विश्वासावर खरेही उतरतील, हे त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास सांगतो. येत्या काळात त्यांच्या कार्यकारिणीचा प्रभाव संपूर्ण बँकेवर दिसू लागेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
 
 
-  तेजस परब  
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@