शरद पवार नव्या वळणावर?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2018
Total Views |



सोनियाजींच्या विदेशातील जन्माचा मुद्दा बनवून राष्ट्रवादीची शरद पवारांनी स्थापना केली. पण, त्या पक्षाची स्थितीही वाईट झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर नव्या वळणावर उभे राहण्याची पाळी आली असेल, तर त्यासाठी तेच जबाबदार आहेत असे म्हणावे लागेल.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रीय राजकारणातील हालचाली व स्थिती पाहता ते पुन्हा एकदा नव्या वळणावर येऊन उभे आहेत, असे म्हणावेसे वाटते. त्यांचा पक्ष तसा महाराष्ट्राच्या बाहेर फोफावणे तर दूरच राहिले, मूळही धरू शकला नाही. महाराष्ट्रातही एकहाती सत्ता मिळविण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. महाराष्ट्राव्यतिरिक्त बिहारमधून अन्वर तारिक यांच्या रुपाने मिळालेला एक खासदारही आता पक्ष सोडून गेला आहे. ‘अमर, अकबर, अॅन्थोनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्रिकुटापैकी पी. ए. संगमा यांनी पूर्वीच त्यांची साथ सोडली. आता राष्ट्रवादीच्या संस्थापकांपैकी फक्त अमर म्हणजे शरद पवार हे एकटेच त्या पक्षात उरले आहेत. सोनिया गांधींच्या विदेशी जन्माच्या मुद्यावर काँग्रेस सोडून ते बाहेर पडले असले तरी, त्याच सोनिया गांधींचे नेतृत्व स्वीकारून त्यांनी दहा वर्षे संपुआमध्ये सत्ता उपभोगली. त्यामुळे तो मुद्दाही निकालात निघाला आहे. २०१४ नंतर त्यांनी अल्पकाळ मोदींशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. पण मोदींचे व त्यांचे आकडे जुळले नाहीत म्हणून की काय, त्यांनी मोदीविरोधकांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधींच्या अपरिपक्व नेतृत्वामुळे आपल्याला काँग्रेससहीत मोदीविरोधकांचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल, या अपेक्षेने त्यांनी पुन्हा एकदा कंबर कसली होती. पण एक तर सगळे मोदीविरोधक राष्ट्रीय पातळीवरून एकत्र येण्याची शक्यता जवळपास संपली आहे. राहुल गांधीही चार पावले पुढे सरकले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे वेगळे राहण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्न जर त्यांच्यासमोर उभा राहिला असेल, तर तो स्वाभाविकच आहे. त्यांची अशीच स्थिती १९८६ मध्ये राजीव गांधींच्या काळातही झाली होती. त्यावेळी त्यांनी सन्मानपूर्वक काँग्रेसप्रवेशही केला होता. पण, ते त्या पक्षात टिकले नाहीत. म्हणून त्यांनी सोनियाजींच्या विदेशातील जन्माचा मुद्दा बनवून राष्ट्रवादीची स्थापना केली. पण, त्या पक्षाची स्थितीही वाईट झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर नव्या वळणावर उभे राहण्याची पाळी आली असेल, तर त्यासाठी तेच जबाबदार आहेत असे म्हणावे लागेल. वस्तुत: शरद पवार हे अतिशय मुरब्बी राजकारणी म्हणून देशात ओळखले जातात. सर्व पक्षांमध्ये त्यांचे मित्र आहेत असे म्हटले जाते व ते खरेही आहे. साधनसामुग्री गोळा करण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दलही प्रश्न नाही. अशा नेत्यावर अशी पाळी यावी, ही त्यांची शोकांतिकाच म्हणावी लागेल. एखाद्या मुरब्बी नेत्याचा एक निर्णय चुकला व तरीही त्याने तीच चूक पुन्हा केली तर त्याची कशी स्थिती होते, हे सांगण्यासाठी आता शरद पवारांचेच नाव घ्यावे लागेल. १९६९ पर्यंत ते काँग्रेस पक्षात घट्ट पाय रोवून उभे होते. महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी त्यांच्याएवढा समर्थ नेता कुणीही नव्हता. पण, यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व त्यांनी स्वीकारल्यामुळे १९६९च्या काँग्रेसफुटीच्या वेळी त्यांना त्यांच्याबरोबरच राहावे लागले. पुढे इंदिराजींनी यशवंतरावांच्या केलेल्या अवहेलनेचे चटके त्यांनाही बसले, अन्यथा वसंतराव नाईकांनंतर तेच शंकररावांऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते. पुढे आणीबाणीनंतर त्यांनी ‘अर्स काँग्रेस’, ‘रेड्डी काँग्रेस’ असा प्रवास करीत १९७८ मध्ये महाराष्ट्रात ‘पुलोद’ची स्थापना करून मुख्यमंत्रिपद मिळविले. पण, त्या पक्षांबरोबरही ते टिकले नाहीत. १९८६ नंतरचा प्रवास वर दिलाच आहे. आता त्यांची स्थिती १९८६ पेक्षाही वाईट झाली आहे. त्यामुळे आता ते कोणते वळण घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

शरद पवारांचे राजकारण हे कात्रजच्या घाटाचे राजकारण आहे, असे म्हटले जाते. त्यांच्या मनात काय चालले आहे ते कुणालाही कळू शकत नाही. फक्त अंदाज तेवढा बांधता येतो. पण, तो बरोबरच ठरेल याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही. गेल्या आठवड्यात हल्ली गाजत असलेल्या राफेल विवादावर त्यांनी एक वक्तव्य दिले. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी मोदी सरकारला अनुकूल असे वाटू शकेल असे ते वक्तव्य होते. त्यामुळे त्यावर भरपूर चर्चा झाली. मी ती मुलाखत पाहिली. खरे तर मोदी सरकारची भलावण करणारे त्यात काहीही नव्हते. पण, राहुल गांधी ज्या त्वेषाने मोदींवर तुटून पडण्याचा आव आणतात, तसेही काही त्यात नव्हते. उलट बोटचेपी भूमिकाच सूचित होत होती. देशाच्या संरक्षणाबाबत व विशेषत: शस्त्रास्त्र खरेदीच्या बाबतीत आपल्या प्रतिस्पर्धी देशाला फायदेशीर होईल अशी चर्चा व्हायला नको, असे ते स्पष्टपणे म्हणाले. राफेल प्रकरणी काही काळेबेरे आहे, असे म्हणण्याचा मोह त्यांनी आवरला व तुमचे सगळे बरोबर आहे तर जेपीसी का नाकारता, असा प्रश्न त्यांनी विचारला. जेपीसीची स्पष्ट मागणी करणे मात्र त्यांनी टाळले. ही मोदींना त्यांची क्लीनचिट आहे असे कुणाला वाटले असेल, तर त्याला खूप दोष देता येणार नाही. शरद पवार एवढ्यावरच थांबले असते, तर फार बिघडले नसते. पण पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलही बोलले. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, “मी सध्या गोळवलकर गुरुजी यांचे ‘विचारधन’ हे पुस्तक वाचत आहे. ते पुस्तक वाचता यावे म्हणून त्याच्या चार प्रती बारामती, पुणे, मुंबई व दिल्ली येथील निवासस्थानी ठेवल्या असून जेथे जेथे मुक्काम असतो तेथे तेथे मी ते वाचत असतो,” असा तपशीलही जोडला. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संघ स्वयंसेवक लोकांच्या मदतीला तत्परतेने धावून जातात, या अनुभवाची जोडही त्याला दिली. हे सगळे त्यांनी निर्हेतुकपणे केले असेलही. पण, ‘कात्रजच्या घाटा’चे त्यांचे राजकारण इथे त्यांना नडले आणि म्हणूनच खुलासाही करावा लागला. अर्थात, त्यांनी तोही अर्धाच केला. संघाबद्दल खुलाशात एक शब्दही बोलले नाहीत. आता त्यांना आपली विश्वसनीयता प्रस्थापित करायला काही काळ लागेलही. पण, त्यामुळे राष्ट्रवादीची स्थिती सुधारेल याची मात्र शक्यता नाही. त्यांची प्रतिमा जरी राष्ट्रीय नेत्यासारखी दिसत असली तरी, आज ‘फॉर ऑल प्रॅक्टिकल परपजेस’ ते महाराष्ट्रापुरते प्रादेशिक विरोधी नेते बनले आहेत. त्यामुळे असेच राहायचे की, राहुल सोनिया यांचे नेतृत्व स्वीकारून पुन्हा आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा का? या प्रश्नाचा त्यांना विचार करावा लागणार आहे.

 

खरे तर पंतप्रधानपदावर दावा सांगण्यासाठी त्यांना यावेळी चांगली संधी मिळाली होती. नितीशकुमार भाजपसोबत गेल्यानंतर आणि राहुलने स्वत:ची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस हा भाजप वगळून बनू शकणाऱ्या तिसऱ्या आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार त्यांच्याशिवाय कुणीही नव्हते. प्रादेशिक पक्षांच्या ‘फेडरल फ्रंट’च्या प्रयत्नांना त्यांनी बळ दिले असते, तर तिसरी आघाडी मोठ्या संख्येने लोकसभेत पोहोचू शकली असती व कदाचित काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्याच्या आधारे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्नही करू शकली असती. पण, बहुधा वय, प्रकृतीच्या मर्यादा आणि अनिश्चितता यामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकले नसतील. पण आता त्याबद्दल पश्चाताप करण्याशिवाय त्यांच्याजवळ काहीही उरलेले दिसत नाही. खा. तारिक अन्वर यांच्या लक्षात ही स्थिती आली असेल व त्यामुळेच त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असू शकतो. शरदरावांचे ते वक्तव्य हे त्यांच्या राजीनाम्याचे कारण असूच शकत नाही. ‘पळत्या’ने त्याचा आधार घेतला एवढेच! आज त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणात काय स्थिती आहे? काँग्रेस पक्ष त्यांचे नेतृत्व मान्य करायला तयार नाही. शिवसेना आपल्या सोबत असावी, असे त्यांना जरूर वाटले असेल. त्यादृष्टीने मध्यंतरी त्यांनी प्रयत्नही केले. पण, उद्धव ठाकरे यांनी आदरपूर्वक नकार दिलेला दिसतो. त्यानंतर मनसे नेते राज ठाकरे यांना जाहीर मुलाखत देऊन स्वत:बरोबरच राजचेही रिलाँचिंग करण्याचा प्रयत्न त्यांनी करून पाहिला. पण ती तीन पायांची शर्यत तेवढी ठरली. एक तर राजसारख्या पार्टटाईम नेत्याबरोबर जाण्याचा प्रयत्नच त्यांनी केला कसा? हा प्रश्न आहे. कारण त्यांनी स्वत:च ‘राजकारणात काम करायचे म्हणजे सकाळी लवकर उठावे लागते,’ असा अनाहूत सल्ला राजला दिला होता. आजही ते आघाडीसाठी मनसेला सोबत घेण्याचा आग्रह करीत आहेत व काँग्रेस तो निर्दयी होऊन फेटाळत आहे. प्रकाश आंबेडकर एमआयएमशी युती करून मोकळे झाले आहेत. शेकापही त्यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत आहे. डाव्यांना तर तिकडे जाण्याशिवाय पर्यायच नाही. यावरून सद्यस्थितीत शरदरावांची महाराष्ट्राच्या राजकारणात काय स्थिती झाली हे स्पष्ट व्हावे. अशा वेळी ते नव्या वळणावर उभे आहेत असे नाही, तर काय म्हणावे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम ठेवून काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर बनायचे की, स्वत:हून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सन्मानपूर्ण मार्ग निवडायचा, हे दोनच पर्याय त्यांच्याकडे आहेत. त्यातील ते कोणता पर्याय निवडतात, हे भविष्यकाळच सांगू शकेल.

 
-ल. त्र्यं. जोशी 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@