काँग्रेसचा सत्ता‘संघर्ष’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 

राष्ट्रवादीच्या प्रभावक्षेत्रात काँग्रेसने ‘जनसंघर्ष यात्रा’ काढल्यामुळे कितीही म्हटले तरी येत्या काळात निवडणुकांपूर्वी जागावाटप तितके सोपे नसेल, हे स्पष्ट झाले. कोल्हापुरात राष्ट्रवादीचा खासदार असताना या मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला होता, तर पुण्यातील इंदापूरची जागाही काँग्रेसला हर्षवर्धन पाटलांसाठी हवी आहे. मात्र, अजित पवार हेदेखील ही जागा सहजासहजी सोडतील ही शक्यता तशी धूसरच.

 

असं म्हणतात की, काँग्रेसमध्ये कोणतीही गोष्ट गरज असताना होत नाही. काम करण्याची गरज असताना काँग्रेसचे कधी युवराज कैलास यात्रेला जातात, तर कधी राज्यातली मंडळी एसी बसमधून ‘जनसंघर्ष यात्रे’ला बाहेर निघते. भाजप सरकार विरोधातील या काँग्रेसच्या ‘जनसंघर्ष यात्रे’चा पहिला टप्पा सप्टेंबर महिन्यात संपला, तर दुसरा टप्पा गुरुवारपासून पुन्हा सुरू झाला. यांचा उद्देश एकच, भाजपच्या विरोधात जनमत तयार करणे. मात्र, दुदैवाने या यात्रेदरम्यान काँग्रेसचाच बाजार उठण्याची वेळ आली आहे. कारण, जनता सोडाच, तर खुद्द कार्यकर्त्यांनीच या यात्रेकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. पंढरपूरमधील जाहीर सभादेखील रद्द करण्याची नामुष्की काँग्रेस नेत्यांवर ओढवली होती. जनतेत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी निघालेल्या काँग्रेसमध्येच असा हा सगळाच आनंदीआनंद असल्याचे या निमित्ताने दिसून आले. काँग्रेसचा घसरणारा आलेख हा काही नवा नाही. १९९० साली राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसला खर्‍या अर्थाने उतरती कळा लागली.

 

एकेकाळी तिहेरी आकडा गाठणार्या काँग्रेसला राज्याच्या विधानसभेत केवळ ४२ जागांवर समाधान मानावे लागले. विरोधी बाकांवर बसून केवळ बाक ठोकणार्या काँग्रेसला आपली विरोधी पक्षाची भूमिकाही योग्यरित्या बजावता आली नाही. सत्तेत राहून आपल्याच मित्रपक्षावर तुटून पडण्याची भूमिका ज्या शिवसेनेने घेतली, ती विरोधी पक्ष म्हणूनही काँग्रेसला घेता आलेली नाही. राष्ट्रवादीचीही कामगिरी विरोधी गटातील नेते म्हणून समाधानकारकही नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधी पक्ष म्हणून सपशेल अपयशी ठरल्याचेच चित्र गेल्या चार वर्षांपासून पाहायला मिळाले. पण, आता निवडणुका तोंडावर आल्या असताना हे दोन्ही पक्ष मात्र सत्ताधारी भाजपविरोधात मांड ठोकून संघर्षाच्या आवेगात जनहितासाठी रस्त्यावर आल्याचा आव आणताना दिसतात. राजकीयदृष्ट्या प्रभावी अशा पश्चिम महाराष्ट्रातूनच काँग्रेसने आपल्या ‘जनसंघर्षा’चे बिगूल वाजवले. पश्चिम महाराष्ट्र तसा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पश्चिम महाराष्ट्रातली काँग्रेसची ताकदही कालांतराने कमी कमी होत गेली. काँग्रेसच्या काही पारंपरिक नेत्यांनी या ठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले. मात्र, नेतृत्वाअभावी आजतागायत तेही शक्य झालेले नाही.

 

गेल्या वर्षी उन्हाळ्यात एसी बसमधून निघालेलीसंघर्ष यात्रा’ यावेळी पावसाळ्यात निघाली, हेच याचे काहीसे वेगळेपण. पण, या यात्रेकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही पाठ फिरवल्यामुळे त्याचा पुरता फज्जाच उडालेला दिसला. त्यातच काँग्रेसमधील अनेकांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षाला सोडचिठ्ठी दिली, तर काहींनी यापासून अलिप्त राहून केवळ बघ्याची भूमिका घेतली. गावागावात जाऊन पंगतीत बसून या ‘जनसंघर्ष यात्रे’ला अगदी चित्रपटाचा लूक आला असला तरी नियोजनपूर्वक घडवलेल्या या यात्रेत चार वर्षे घरात बसून जे दुःख सोसावे लागले त्याचीच नेतेमंडळींनी खंत बोलून दाखवली. मात्र, गेल्या चाळीस वर्षांत जनतेच्या वाट्याला काय आले आणि जनतेने आपल्याला का झिडकारले, याचे चिंतन करताना काँग्रेसी काही दिसले नाहीत. म्हणा, केंद्रात सत्ता हाती गेल्यानंतरही काँग्रेसने याचा विचार केला नाही, तर एखाद्या राज्यातील पराभवाला कितपत गांभीर्याने घ्यायचे, त्याचे आत्मपरीक्षण करायचे, याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.

 
 

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीची घोषणा केली असली तरी कालांतराने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात ‘संघर्ष यात्रे’चा पहिला टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेत काँग्रेसने यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केलाच. महाराष्ट्र विधानसभेच्या ५८ जागा या पश्चिम महाराष्ट्राच्याच आहेत. त्यामुळे काँग्रेसने कदाचित पश्चिम महाराष्ट्राची या यात्रेसाठी निवड केली असावी. इतर ठिकाणी जोरदार मुसंडी मारणार्‍या भाजपला पश्चिम महाराष्ट्रातून शह देण्याची काँग्रेसची ही योजना असावी. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीची जरी ही ‘जनसंघर्ष यात्राअसली तरी काँग्रेस अंतर्गत संघर्ष कमी करण्याचा नेतेमंडळींनी प्रयत्न यानिमित्ताने केलेला दिसला. विलासकाका पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी एकत्र येण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले होते. मात्र, हे मनोमिलन कितपत यशस्वी होईल, ते येत्या निवडणुकांच्या निकालानंतरच स्पष्ट होईलच. ‘जनसंघर्ष यात्रे’त नेते, पदाधिकार्‍यांच्या गाड्यांच्या ताफ्यांनी रस्ते गजबजले. मात्र, काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि इतर नेत्यांनी केलेल्या भाषणात स्थानिक प्रश्नांचा उल्लेख फारसा आढळला नाही. अशोक चव्हाण यांनीदेखील महेश मांजरेकर यांच्या काँग्रेसप्रवेशाच्या चर्चांना महत्त्व देत स्थानिकांच्या प्रश्नांना मात्र फाटा दिला.

 
 

पश्चिम महाराष्ट्र साखर कारखाने, कृषिसंपन्नता, दुधदुभते यामुळे तसा मराठवाड्यापेक्षा सधन भाग. मात्र, अशा परिस्थितीतही गेल्या २० वर्षांच्या काळात या ठिकाणी कोणताही मोठा उद्योग उभारण्यासाठी आघाडी सरकार उदासीन असल्याचेच दिसले. या ठिकाणच्या सूत गिरण्या, छोटे कारखाने यांच्याच गलिच्छ राजकारणाला बळी पडून ते बंद झाले, तर काही कर्जबाजारी झाल्यामुळे लिलावात विकले गेले. या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असो, बेरोजगारी असो हे प्रश्न प्रलंबितच होते. राष्ट्रवादीच्या प्रभावक्षेत्रात काँग्रेसने ‘जनसंघर्ष यात्राकाढल्यामुळे कितीही म्हटले तरी येत्या काळात निवडणुकांपूर्वी जागावाटप तितके सोपे नसेल, हे स्पष्ट झाले. कोल्हापुरात राष्ट्रवादीचा खासदार असताना या मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला होता, तर पुण्यातील इंदापूरची जागाही काँग्रेसला हर्षवर्धन पाटलांसाठी हवी आहे. मात्र, अजित पवार हेदेखील ही जागा सहजासहजी सोडतील ही शक्यता तशी धूसरच. काँग्रेस-राष्ट्रवादीमधला संघर्ष हा आजचा नाही. एकत्र सत्तेचा उपभोग घेऊनही एकमेकांवर कुरघोडी करण्यात धन्यता मानणारे हे दोन्ही काँग्रेस आणि त्यांचे नेतेमंडळी. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेससाठी खड्डा खणायला गेले आणि त्याच खड्ड्यात काँग्रेससोबतच पडले. त्याचाच परिणाम राष्ट्रवादीपेक्षा एखाद् दोन जागा जास्त मिळण्यात झाला. मोदीलाटेत सर्वांचे पानिपत झाले आणि त्यातून मार खाल्लेल्यांच्या जखमा भरायला अजून वेळ लागेलच. प्रदेश नेतृत्वाच्या संघटनात्मक पातळीवरच्या उदासिनतेचा फटका स्थानिक निवडणुकांमध्येही बसला आणि परिणामी ही यात्रा काढण्याची वेळ आली. नारायण राणे हेदेखील काँग्रेसमध्ये असताना कोकणाकडे दुर्लक्ष झाले आणि अनेक जिल्ह्यांचे पदाधिकारी नेमण्यातही उदासिनता दिसून आली. त्यामुळे नेतामंडळींच्या पातळीवर असो वा कार्यकर्ता स्तरावर काँग्रेसमध्ये पक्षाच्या मजबुतीसाठी कोणतेही ठोस प्रयत्न झालेले दिसत नाही. सांगली महानगरपालिकेतील नगण्य स्थान असलेल्या भाजपने आपले सर्वस्वपणाला लावले आणि सत्ता खेचून आणली. जळगावात पहिल्यापासून आपल्या पारड्यात यश पडणार नाही, हे गृहीत धरलेल्या काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे या ठिकाणीही मातीच खाल्ली. त्यामुळे सध्या भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वातल्या फरकाचा अभ्यास केला, तर काँग्रेसला इतक्या ठिकाणी संघर्ष करूनही तोंडघशी पडण्याची वेळ का येते, याचे उत्तर मिळून जाईल. त्यातच कोल्हापुरातल्या राष्ट्रवादीच्या जागेची काँग्रेसने मागणी केली. यामुळे भाजप राहिला बाजूला आणि संघर्ष सुरू झाला तो काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येच. 

 
अंतर्गत वादाचा काँग्रेसला बसलेला फटका पश्चिम महाराष्ट्रातही दिसला आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बहुतांश जागा भाजप आणि शिवसेनेने खेचून घेतल्या. पश्चिम महाराष्ट्रात चंद्रकांतदादा पाटील यांनी नियोजनबद्ध रितीने भाजपच्या विस्ताराचे काम केले, तर दुसरीकडे काँग्रेस पुन्हा पक्षविस्ताराबाबत उदासीनच दिसतो. इंधन दरवाढ, रस्त्यांवरील खड्डे असे अनेक विषय समोर असतानाही त्याचा फायदा घेत ‘संघर्ष’ करण्यापेक्षा दोन्ही पक्षांमधल्या आपापसातल्या संघर्षाचीच चर्चा अधिक होत आहे. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादीचे एक-दोन नेते सोडले तर सोशल मीडियावरही या पक्षातल्या नेत्यांचा आक्रमकपणा फारसा दिसून येत नाही. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत, तशी भाजपविरोधात वातावरणनिर्मिती करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. आता ‘संघर्ष यात्रे’चा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. काँग्रेसचे नेतेच काँग्रेसचा पराभव करतात, असे म्हटले जाते. दुसर्‍या ‘संघर्ष यात्रे’च्या निमित्ताने इतरांचा दूर, परंतु पक्षांतर्गत संघर्ष जरी कमी झाला तर धन्यता मानावी लागेल.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@