'आयसीआयसीआय'च्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2018
Total Views |
 

मुंबई : चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा गुरुवारी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी संदीप बक्षी हे पदभार सांभाळणार आहेत. २००९ पासून पदभार स्वीकारणाऱ्या कोचर यांचा कार्यकाळ मार्च २०१९ रोजी पूर्ण होणार होता. मात्र, तत्पूर्वी त्या पदावरुन पायउतार झाल्या आहेत. कोचर यांनी राजीनामा दिल्यानंतर संचालक मंडळाने तातडीने तो स्वीकारला. दरम्यान या घोषणेनंतर बॅंकेचा शेअर ४.०५ टक्क्यांनी वधारला. दिवसअखेर तो १२.३० अंकांनी वाढून ३१६ वर बंद झाला. 

 
 

बॅंकेने जाहिर केलेल्या माहितीनुसार, कोचर यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच निवृत्त होण्याची इच्छा दर्शवली होती, त्यानुसार संचालक मंडळाने गुरुवारी त्यांचा राजीनामा स्वीकारला. त्यासह बॅंकेच्या अन्य सर्व सहयोगी कंपन्यांतून कोचर यांना मुक्त केल्याची माहिती बॅंकेने दिली. जून २०१८पासून कोचर या अनिश्चित काळासाठी रजेवर होत्या. त्यांच्यावर विडीयोकॉन समुहाला आणि दीपक कोचर यांच्या नू-पावर या कंपनीला ३ हजार २५० कोटींचे कर्ज वाटल्याचा आरोप आहे. सुरुवातीला कोचर आणि बॅंकेने हा आरोप अमान्य केला होता. मात्र, गुंतवणूकदारांच्या दबावामुळे चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. कोचर या पदापासून मुक्त झाल्या असल्या तरीही चौकशी कायम सुरू राहणार असल्याचे बॅंकेने सांगितले. बॅंकेच्या संचालक मंडळाने संदीप बक्षी यांची कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केली आहे. ते या पदावर ३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत कायम राहणार आहेत.

 
 

   माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@