मार्कुस वुल्फ आणि हनी ट्रॅप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 


 
 
 
पूर्व जर्मनीची ‘स्तासी’ ही गुप्तहेर संघटना. या ‘स्तासी’चा संस्थापक होता मार्कुस वुल्फ. तो आपल्या आत्मचरित्रात लिहितो, “गुप्त माहिती काढण्यासाठी स्त्रियांचा उपयोग जेवढा मी केला, तेवढा कदाचित कोणत्याच देशाच्या हेरप्रमुखाने केला नसेल.” वुल्फ २००६ साली मरण पावला.
 

अँजेला मर्केल या सध्या जर्मनीच्या चॅन्सलर आहेत. चॅन्सलर हे पंतप्रधानपदाच्या समकक्ष असे पद आहे. मर्केल मूळच्या पूर्व जर्मन आहेत. १९८९ साली जर्मनीची फाळणी रद्द होऊन तो एकसंध देश झाला. अँजेला ‘फ्री जर्मन यूथ’ नावाच्या एका युवक संघटनेच्या सभासद होत्या. ही संघटना कम्युनिस्ट पूर्व जर्मनीच्या समाजवादी पक्षाची अधिकृत युवक संघटना होती. म्हणजेच एकेकाळची डावी कार्यकर्ती आज एकत्रित जर्मनीच्या प्रमुखपदी विराजमान झालेली आहे. इतकंच नव्हे, तर अँजेलानी एका जाहीर मुलाखतीत उघडपणे सांगितलं की, ‘‘पूर्व जर्मनीच्या स्तासी या गुप्तेहर संघटनेत भरती होतेस का?” असं आपल्याला विचारण्यात आलं होतं, परंतु आपण तो प्रस्ताव नाकारला. याबाबत अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, ‘‘ती १९७० च्या दशकाची अखेर होती. इलमेनाड विद्यापीठात भौतिकशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाची जागा भरायची आहे, असं कळलं म्हणून मी अर्ज केला. मला मुलाखतीला बोलावण्यात आलं. मुलाखतीला गेले तर केबिनमध्ये स्तासीचा एक अधिकारी बसलेला. त्याने मला विचारलं, “तुला आमच्या संघटनेत काम करायला आवडेल का?” मी म्हटलं, “माझ्या तोंडात कोणतीच गोष्ट राहात नाही. मी फार बडबडी आहे.” झालं, मुलाखत संपली. मला अर्थातच ती नोकरी मिळाली नाही.” पूर्व जर्मनीतल्या जीवनाबद्दल आणखी बोलताना त्या म्हणाल्या, “१९८६ साली मला पश्चिम जर्मनीत पळून येण्याची संधी मिळाली होती. पण मी तसं केलं असतं तर माझे आईवडील, नातेवाईक, मित्र हे सगळे संकटात सापडले असते. त्यामुळे मी ती संधी सोडली. माझ्या दृष्टीने त्या सगळ्यांचं जीवन जास्त महत्त्वाचं होतं आणि म्हणूनच १९८९ साली जेव्हा बर्लिन भिंत कोसळली, तेव्हा मी माझ्या आईला म्हटलं की, एक ना एक दिवस हे घडणारच होतं.”

 

पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या एकत्रीकरणाला वर्ष होत असताना अँजेला मर्केल यांनी पूर्व जर्मन साम्यवादी राजवट व गुप्तहेर संघटना ‘स्तासी’ यांच्या आठवणी काढण्याला विशेष महत्त्व आहे. कारण सोव्हिएत रशियाचं हस्तकं असलेलं पूर्व जर्मन सरकार आणि ‘स्तासी’ यांनी फार माणसं मारली. जर्मनी हा युरोप खंडाच्या साधारण मध्यभागी असलेला देश आहे. १९१४ साली जर्मनीविरुद्ध फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका यांच्यात भीषण युद्ध झालं. त्याला नंतर ‘पहिलं महायुद्ध’ असं नाव मिळालं. या युद्धात जर्मनीचा पराभव झाला. विजेत्या राष्ट्रांनी म्हणजे मुख्यत: फ्रान्स व ब्रिटन यांनी पराभूत जर्मनीवर, भयंकर अपमानकारक तहाच्या अटी लादून त्याचा असह्य अपमान केला. तिथेच दुसऱ्या महायुद्धाचं बीज पडलं. १९३३ साली जर्मनीत अॅडॉल्फ हिटलरच्या नेतृत्वाखालचा नाझी पक्ष सत्तारूढ झाला. हिटलर जर्मनीचा चॅन्सलर बनला. त्याने जर्मनीला बलवान बनवून अपमानाचा सूड घेण्याचा निश्चय केला. १ सप्टेंबर १९३९ या दिवशी हिटलरने युरोपवर आक्रमण केलं आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. प्रथम यात फ्रान्स आणि ब्रिटनच फक्त सामील होते. पण १९४१ साली हिटलरने सोव्हिएत रशियावर अचानक आक्रमण केल्यामुळे रशियाही युद्धात आला तर १९४२ साली जपानने अमेरिकेवर आक्रमण केल्यामुळे अमेरिकाही युद्धात आली. म्हणजे आता एका बाजूला फ्रान्स-ब्रिटन-रशिया-अमेरिका तर विरुद्ध बाजूला जर्मनी-इटली-जपान असा सामना सुरू झाला. अगोदर सर्वत्र जर्मनीची सरशी होत होती, पण १९४३ सालापासून चित्र बदलू लागले. १९४५ साली तर पश्चिमेकडून अँग्लो-अमेरिकन-फ्रेंच सेना व पूर्वेकडून सोव्हिएत सेना, युरोपातले एक-एक देश मुक्त करीत खुद्द जर्मन प्रदेशातच घुसू लागल्या.

 

अखेर जर्मनीने पांढरा बावटा फडकावला. सहा वर्षे चाललेलं अतिभीषण महायुद्ध संपलं, पण लगेचच सोव्हिएत नेता जोसेफ स्टॅलिन याने आपली नखं बाहेर काढली. सोव्हिएत सेनेने व्यापलेले पूर्व युरोपातील देश, खुद्द जर्मनीचा पूर्वेकडील प्रदेश; इतकेच नव्हे, तर जर्मन राजधानी बर्लिनचा पूर्वेकडील भाग यावरील ताबा सोडण्यास त्याने साफ नकार दिला. आता अँग्लो-अमेरिकन-फ्रेंचविरुद्ध सोव्हिएत रशिया यांच्यात तिसरं महायुद्ध पेटतं की काय, या भीतीने लोक हवालदिल झाले. अखेर कसंबसं युद्ध टळलं. पण, जर्मनीची फाळणी झाली. सोव्हिएत पंजाखालील जर्मनी आणि अँग्लो-अमेरिकेच्या ताब्यातील जर्मनी हे दोन स्वतंत्र देश बनले. त्यांना अनुक्रमे पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी किंवा अधिकृत भाषेत जर्मन डेमोक्रेटिक रिपब्लिक (जीडीआर) व फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी (एफ.आर.जी.) असे म्हणण्यात येऊ लागले. पूर्व जर्मनीने हट्टाने आपली राजधानी आपल्या ताब्यातल्या अर्ध्या बर्लिन शहरातच ठेवली, तर पश्चिम जर्मनीने आपली राजधानी बॉन या शहरात नेली. अँग्लो-अमेरिकेने पश्चिम जर्मनीत लोकशाही सरकार स्थापन केलं. त्याला सर्वप्रकारे मदत केली. त्यामुळे पश्चिम जर्मनीत जनतेचे राजकीय आणि सामाजिक जीवन सुरळीतपणे सुरू झालं, सुरू राहिलं. त्यामुळे अवघ्या २० वर्षांत जर्मनीने कात टाकली. पश्चिम जर्मनी समृद्ध झाला. याउलट पूर्व जर्मनीची स्थिती होती. सोव्हिएत रशियाचा मांडलिक म्हणून राज्य करणाऱ्या एरिक होनेकर या पोलादी हुकूमशहाच्या वरवंट्याखाली पूर्व जर्मन नागरिकांचं सगळं जीवनच खुरटलं. परिणामी पूर्व जर्मनी सालोसाल अधिकाधिक कंगाल, दरिद्री बनत गेला. या दारिद्य्रातून सुटण्यासाठी पूर्व जर्मन नागरिक खूप धडपड करीत. पूर्व आणि पश्चिम बर्लिन शहर विभागण्यासाठी उभारण्यात आलेल्या प्रचंड भिंतीवरून उड्या मारून पश्चिम जर्मनीत प्रवेश करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत. पूर्व जर्मन पोलीस त्यांना गोळ्या घालून ठार मारत. चुकून एखादा निसटलाच तर त्यांचे नातेवाईक, मित्र यांचे हालहाल करण्यासाठी ‘स्तासी’ ही गुप्तहेर संघटना सज्ज होतीच. या ‘स्तासी’चा संस्थापक होता मार्कुस वुल्फ.

 

मार्कुस वुल्फचा जन्म १९२३ सालचा. त्याचा बाप फ्रेडरिक हा भरपूर धंदा असलेला डॉक्टर होता. तो नाटककारही होता. जगभरच्या बुद्धिवादी लोकांवर त्या काळात मार्क्सवादाची मोहिनी पडलेली होती. त्यानुसार फ्रेडरिक वुल्फ हादेखील जर्मन कम्युनिस्ट पक्षाचा एक चळवळ्या कार्यकर्ता होता. १९३३ साली सत्तेवर आल्याबरोबर हिटलरने कम्युनिस्ट आणि ज्यू लोकांविरुद्ध हालचाली सुरू केल्या. त्यामुळे फ्रेडरिक वुल्फला जर्मनी सोडावा लागला. कारण, तो कम्युनिस्टही होता नि ज्यू ही होता. आता जाणार कुठे? जोसेफ स्टॅलिन फार दूरदर्शी होता. नंतरच्या काळात साम्यवादी क्रांतीची निर्यात करण्यासाठी आपल्याला हे देशोदेशीचे वेडपट बुद्धिवादी उपयोगी पडणार, हे त्याने अगोदरच हेरलेलं होतं. त्यामुळे फ्रेडरिक वुल्फला सोव्हिएत रशियात आश्रय मिळाला. मार्कुस वुल्फचं सगळं शिक्षण मॉस्कोच्या सोव्हिएत कॉमिन्टर्न स्कूलमध्ये झालं. इथे त्याला पुस्तकी शिक्षणाबरोबरच विविध प्रकारची हत्यारं हाताळणे आणि प्रभावी प्रचारयंत्रणा उभी करणं, याचंही खास प्रशिक्षण मिळालं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तो मॉस्को आकाशवाणीवरचा जर्मन विभाग सांभाळत होता. १९४५ साली त्याला सोव्हिएतव्याप्त पूर्व जर्मनीत पाठविण्यात आलं. तिथे काही काळ तो बर्लिन नभोवाणीचा मुख्य संपादक होता. मग पूर्व जर्मनीच्या मॉस्कोतील वकिलातीचा मुख्य अधिकारी म्हणूनही त्याने काम केलं आणि मग १९५२ साली त्याला त्याचं जीवितकार्य मिळालं. बर्लिनमध्ये ‘इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक सायंटिफिक रिसर्च’ ही संस्था स्थापन झाली नि तिचा प्रमुख म्हणून मार्कुस वुल्फची नेमणूक झाली. इकॉनॉमिक सायंटिफिक रिसर्च! किती साळसूद नाव आहे! पण खरं म्हणजे ते अगदी समर्पक नाव आहे. शत्रूच्या विज्ञान-तंत्रज्ञान व आर्थिक क्षेत्रातल्या कार्याचा अभ्यास करणे म्हणजेच बातम्या काढणे, हेच या इन्स्टिट्यूटचे कार्य होतं आणि या कार्यात मार्कुसच्या हस्तकांनी कमालीचं यश मिळवलं. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटन-अमेरिका-फ्रान्स इत्यादी लोकशाहीवादी राष्ट्रांनी त्यांचा एक गट बनवला. त्याचं नाव ‘नाटो.’ ‘नाटो’च्या सदस्य राष्ट्रांना ‘नाटो राष्ट्रे’ असंच म्हणत असत. पश्चिम जर्मनी हाही ‘नाटो’चा सदस्य होता. त्यामुळे पश्चिम जर्मनीतल्या हस्तकांकरवी वुल्फला सर्व ‘नाटो’ राष्ट्रांच्या गुप्त बातम्या मिळत. त्या तो अर्थातच मॉस्कोला पोहोचवित असे.

 

आपले हस्तक पेरण्यासाठी मार्कुस अगदी साध्या युक्त्या वापरीत असे. मार्कुसचा एक पित्त्या गुथर गुईलॉम याची बायको क्रिस्तेल हिचं माहेर पश्चिम जर्मनीतल्या फ्रँकफर्ट शहरात होतं. तिथे तिची आई एक छोटंसं तंबाखू, बिडीकाडीचं दुकान चालवायची. बस्! एवढी माहिती मिळताच मार्कुसने गुंथर आणि क्रिस्तेलला फ्रँकफर्टला पाठवलं. त्यांनी क्रिस्तेलच्या आईच्या दुकानाशेजारीच एक झेरॉक्सचं दुकान टाकलं. आता यात कसली आलीय हेरगिरी? थांबा, पुढे वाचा. लवकरच त्या दोघांची स्थानिक लोकांची मैत्री जोडली. मग एक दिवस गुंथर स्थानिक सोशल डेमोक्रेटिक पक्षाचा सदस्य झाला. गोड गाणी, चोख व शिस्तबद्ध काम यामुळे हळूहळू तो पक्षाचा महत्त्वाचा कार्यकर्ता बनला. त्याच्याकडे मोठ्या जबाबदाऱ्या येत गेल्या. मग एक दिवस त्याच्यावर चॅन्सलरी म्हणजे पंतप्रधान कार्यालयातील कनिष्ठ अधिकाऱ्याची जबाबदारी सोपवण्यात आली आणि अखेर एक दिवस तो चॅन्सलर विली ब्रांट यांच्या ताफ्यातील एक वरिष्ठ कार्यकर्ता बनला. अनेक महत्त्वाच्या व गुप्त बातम्या आता त्याला सहज उपलब्ध होऊ लागल्या. त्या बातम्या मार्कुसपर्यंत पोहोचविण्यासाठी कुठल्याही ट्रान्समीटर वगैरे फिल्मी मार्गाचा अवलंब केला नाही. तो आवश्यक ती कागदपत्रं घरी आणे. रात्री स्वत:च्याच दुकानातल्या झेरॉक्सवर त्याच्या कॉप्या काढून त्या सिगारेटच्या रिकाम्या पाकिटात भरून ठेवी. सकाळी सासूच्या दुकानावर मार्कुसचे निरोप्ये हस्तक सिगारेटी घेण्याच्या बहाण्याने येत. त्यांच्या हवाली कॉप्या करायच्या आणि कार्यालयात जाताना मूळ कागद घेऊन जाऊन, जागच्या जागी ठेवायचे. एकदम साधं, सोपं, बिनबोभाट काम!

 

मार्कुस वुल्फने गुंथर आणि क्रिस्तेलसारख्या अनेक जोड्या पश्चिम जर्मनीच्या अनेक शहरांमध्ये पेरून ठेवल्या होत्या. त्यांच्यामार्फत प्रचंड माहिती त्याला मिळत असे. शिवाय त्याने पेरलेले ‘रोमियो’ हस्तक हा तर एका मोठ्या, दांडग्या लेखाचा विषय आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी आर्य चाणक्याने सक्त इशारा देऊन ठेवला आहे की, “मोठमोठ्या अधिकारपदाच्या जागेवर असणाऱ्या लोकांनी स्त्री आणि मद्य यापासून कटाक्षाने दूर राहावे.” पण आधुनिक काळात जगभर सर्वत्र राजकारणी लोक कमालीचे स्त्रीलंपट आणि मद्याधीन असल्याचेच आढळून येत आहे. किंबहुना, अनेक लोक त्यासाठीच राजकारणात जात असतात. मार्कस वुल्फ आपल्या आत्मचरित्रात लिहितो, ‘‘गुप्त माहिती काढण्यासाठी स्त्रियांचा उपयोग जेवढा मी केला, तेवढा कदाचित कोणत्याच देशाच्या हेरप्रमुखाने केला नसेल.” वुल्फ २००६ साली मरण पावलाखाजगी जीवन स्वच्छ असणं सगळ्यांच्याच दृष्टीने महत्त्वाचं आहे, पण मोठमोठ्या अधिकारपदावर असणाऱ्यांसाठी तर ते अतोनात महत्त्वाचं आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@