९ वा केशवसृष्टी पुरस्कार नाशिकच्या प्रमोद गायकवाड यांना प्रदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2018
Total Views |
 
 

मुंबई : आपण ज्याला ‘सामाजिक कार्य’ म्हणतो, ते सामाजिक कार्य वगैरे काहीही नसून ही तर मानवातील ईश्वराची पूजा करण्याची परमेश्वराने आपल्याला दिलेली संधी आहे, असे प्रतिपादन स्वामी कंठानंद यांनी केले. ‘केशवसृष्टी’चा नववा केशवसृष्टी पुरस्कार नाशिकचे सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड यांना स्वामी कंठानंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते म्हणाले.

 

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, दादर येथे झालेल्या कार्यक्रमाला व्यासपीठावर केशवसृष्टी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता, केशवसृष्टी पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्ष व उद्योजिका हेमा भाटवडेकर, केशवसृष्टी कार्यकारिणी सदस्य रश्मी भातखळकर आदी मान्यवर उपस्थित होते. १ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व मानपत्र असे स्वरूप असलेला केशवसृष्टी पुरस्कार यावेळी प्रमोद गायकवाड यांना स्वामी कंठानंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कंठानंद म्हणाले की, विद्यमान काळात आव्हाने कमी आणि गुंतागुंत जास्त आहे. वैदिक धर्म म्हणजे मानवी स्वभावाचा सखोल अभ्यास आहे. परंतु, आजकाल आपल्याच गोष्टी आपल्याला स्वीकारता येत नाहीत. त्या पाश्चात्यांकडून आपल्याला समजतात. आज मंदिरांची संख्या वाढते आहे, परंतु, भक्तीची नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपण कोणतेही फार मोठे सामाजिक कार्य करतो आहोत, असे मानणे उचित नसून वास्तविक ती तर मानवी ईश्वराची पूजा करण्याची परमेश्वराने दिलेली संधी असल्याचे ते म्हणाले.

 

स्वामी कंठानंद पुढे म्हणाले की, जे काम आपण आपल्या हृदयापासून करतो, त्याची अनुभूती वेगळीच असते. आज आपल्या ज्या काही समस्या आहेत, त्या आपल्या बौद्धिक दारिद्र्यामुळे आहेत. आपण प्रश्न उपस्थित करत नाहीत, म्हणून या समस्या आहेत. यावेळी कंठानंद यांनी प्रश्न उपस्थित करणाऱ्या गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद, मीराबाई यांची उदाहरणे दिली. ते म्हणाले की, सहजतेतून सेवेचा जन्म होतो. हे तत्व सांगणाऱ्या भूमीत आपला जन्म झाला हे तर आपले भाग्य आहे. त्यामुळे आपली जबाबदारीही त्यामुळे वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. आपण जी काही सेवाकार्य करतो आहोत, ती पूजा आहे. तो एक आनंदोत्सव आहे. हे तत्व आणि त्यामागील ईश्वरी कार्य समजून घ्या, सेवा आपोआप होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच, याच भावनेतून केशवाची सृष्टी अर्थात, केशवसृष्टी निर्माण होते. मग ती अहंकाराची सृष्टी राहत नाही, अशा शब्दांत कंठानंद यांनी केशवसृष्टीची प्रशंसा केली. केशवसृष्टीचे अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता यावेळी मानले की, केशवसृष्टीचे आज जे काही स्वरूप दिसते आहे, त्यासाठी मोठा प्रवास झाला आहे. असंख्यांनी यामध्ये कष्ट उपसले आहेत आणि योगदान दिले आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या प्रमोद गायकवाड व अशा अनेक नररत्नांना शोधणे व त्यांचा सन्मान करणे ही मोठी गोष्ट आहे. केशवसृष्टी पुरस्कार निवड समिती हे काम उत्तमरित्या करत असून पुढेही हे काम ही समिती असेच करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, प्रमोद गायकवाड यांना पुरस्कार देताना आम्हाला आनंद होत असल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली. पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्ष व उद्योजिका हेमा भाटवडेकर यांनी या निवड समितीची कार्यपद्धती, पुरस्काराची निवडप्रक्रिया इत्यादींची माहिती दिली. केशवसृष्टी कार्यकारिणी सदस्य रश्मी भातखळकर आपल्या मनोगतात म्हणाल्या की, केशवसृष्टी आज एक दीपस्तंभ म्हणून आपल्यासमोर उभा आहे. जसे नंदनवन असते तसे केशवसृष्टी एक संस्थावन झाली आहे. यावेळी त्यांनी केशवसृष्टीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच, तन-मन-धन देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी आज केशवसृष्टीकडे असल्याचेही प्रतिपादन रश्मी भातखळकर यांनी यावेळी केले. केशवसृष्टी पुरस्कारासह यावेळी ‘केशवसृष्टी उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार’ संस्थेतील वनौषधी संस्था प्रकल्प प्रमुख डॉ. श्रुती वारंग यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अखेरीस माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित ‘गीत नया गाता हुं’ हा कार्यक्रम प्रख्यात गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी सादर केला.

 

 
 

माझा पुरस्कार गावकऱ्यांना समर्पित : प्रमोद गायकवाड

सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड यावेळी म्हणाले की, हा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल आम्ही केशवसृष्टीचे ऋणी आहोत. आदिवासी पाड्यांवर आमचे काम बघायला क्वचितच कोणी येतात. त्यामुळे केशवसृष्टी पुरस्कार निवड समिती सदस्यांचा आम्हाला जेव्हा फोन आला की आम्हाला तुमचे काम बघायला यायचे आहे, तेव्हा मला खूपच आनंद झाला. हा पुरस्कार मी आज माझ्यासोबत आलेल्या गावकऱ्यांना समर्पित करतो, असे भावूक उद्गार गायकवाड यांनी काढले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@