पुन्हा एकदा नटसम्राट!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2018
Total Views |

काही कलाकृती या कालातीत असतात. त्यातली गंमत, काळ कुठलाही असो, अगदी सारखीच असते. काल, आज आणि उद्या या कलाकृतींना सारखेच असतात. त्या कलाकृती मानदंड ठरलेल्या असतात. त्यामागे बरीच कारणे असतात. पहिले म्हणजे असले मानदंड ही समकालीन समाजाची गरज असते. समाजाला सेलिब्रेटी आवश्यकच असतात. त्या त्या भौगोलिक परिसरात त्यांना हवे तसे सेलिब्रेटी समाजच घडवून घेत असतो. कधी घडलेले स्वीकारतो. त्यात मग काही कमी-अधिक असेल तर ते स्वीकारले जाते. तसेच या कलाकृतींच्या बाबतही असते. मानदंड हवेच असतात... हे कारण असतेच, शिवाय मग सांस्कृतिक अस्मिता, धार्मिक भावनादेखील असे मानदंड निर्माण होण्यामागे असतातच. आणखी एक बाब असतेच. समाजाचा आळस आणि समकालीनांना चटकन् स्वीकारण्यामागची नकारात्मक मानसिकता.
 
 
‘लिव्हिंग लिजंड’ व्हायला एखाद्या व्यक्तीला खूपच कष्ट घ्यावे लागतात. अत्यंत अस्मानी अशी गुणवत्ता लागते. कलाकृतीदेखील खूपच उंचीची असावी लागते. म्हणजे कोसळण्याची आणि ढासळण्याची जी गुरुत्वाकर्षण शक्ती असते त्याच्याही वर निघून गेलेली ती व्यक्ती किंवा कलाकृती असावी लागते. अगदी वरच्या वातावरणात गेली आणि गुरुत्वाकर्षण शक्तीच्या परिघाबाहेर गेली की मग ती कलाकृती, कलावंत, साहित्यिक अंतराळातच विहार करत राहते. नव घडवायचे आणि त्याला दर्जात्मक पातळीवर मानदंड म्हणून स्वीकार करायचा, ही आपली मानसिकता नाही. सृजनात्मक आळस आणि संकुचित भाव त्यामागे असतोच. हे सगळे पार करून लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन अशी माणसे त्यांच्या हयातीतच मानदंड होऊन जातात. सचिन तेंडुलकरच्या वाट्याला ते भाग्य अगदी वयाच्या चाळीशीतच आले. तो अगदी भारतरत्नच होऊन गेला! आता त्याने काय करावे, असा प्रश्न आहे. त्याला फारच सावध आणि शुचितापूर्णच वागावे लागते. करण्याची ऊर्जा आहे, वयही आहे, तरीही तो आजकालच्या वातावरणानुसार व्यवसायी म्हणजे धंदेवाईक काही होऊ शकत नाही अन् शांतही बसू शकत नाही. त्याची तशी शोचनीय अशीच स्थिती झाली आहे.
 
 
रवींद्रनाथ टागोर यांची कविता आहे- देव शोधणार्या माणसाची. तो देव शोधत असतो. त्याला मग कुणीसे सांगते की, गावाबाहेरच्या पडक्या वाड्यात देव आहे. तो तिथे जातो. दाराची कडी उचलून आता ती तो वाजविणार, तर त्याच्या मनात येतं, आताच ईश्वर भेटला तर मग उरलेल्या आयुष्यात मी काय करायचे? मग तो पावलांचा आवाजही होऊ न देता पायर्या उतरतो आणि निघून जातो. नंतरही तो ईश्वराचा शोध घेत राहतो... तेंडुलकर स्वत:च ईश्वर झाला आहे. बरं, आयुष्य आणखी खूप शिल्लक आहे. ऊर्जाही. मग आता त्याने काय करायचे?
 
 
 
विषय तो नाही. मराठी नाट्यसृष्टीचा मानदंड असलेले नाटक ‘नटसम्राट’ आता पुन्हा रंगमंचावर येते आहे. यावेळी आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका अभिनेते मोहन जोशी साकारताहेत. कावेरीची भूमिका रोहिणी हट्टंगडी करताहेत. हे नाटक 23 डिसेंबर 1970 रोजी पहिल्यांदा सादर करण्यात आले. पहिले नटसम्राट गणपतराव ऊर्फ आप्पासाहेब बेलवलकर डॉ. श्रीराम लागू होते. त्यानंतर ही भूमिका करणे ही नटाच्या आयुष्यातली परमावधी मानली जाऊ लागली. आताही त्यात बदल झालेला नाही. श्रीराम लागूंनंतर सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी, गिरीश देशपांडे यांनी नटसम्राट केले. नाना पाटेकरांना घेऊन ‘नटसम्राट’ हा चित्रपटच मध्यंतरी आला. त्यानंतर आता कुणी रंगमंचावर नटसम्राट करेल असे वाटले नव्हते, मात्र पुन्हा नटसम्राटची तयारी सुरू आहेच...
 
 
कुठले नाटक, कुणी आणि कितीवेळा करावे, यावर वाद किंवा चर्चा करण्यासारखे काहीच नाही. मात्र, ‘पुन्हा एकदा नटसम्राट’वरून ‘आपलाचि वाद आपणाशी’ सुरू झाला. मधल्या काळात अनेक जुनी नाटके पुन्हा रंगमंचावर आली. अत्रेंची होती, अनिल बर्वे, पु. ल. देशपांडे यांची होती. त्यांना बरा- चांगला प्रतिसादही मिळाला. प्रश्न हा आहे की, नवे असे डोक्यावर घ्यावे, दंडवत घालावा, असे काही ताजे लिहिलेच जात नाही का? की तसा शोधच घेतला जात नाही? आताचे दिग्दर्शक नवे लेखक, त्यांचे लेखन यांचा शोध घेत नाही का? नव्या प्रयोगांना स्वीकारण्याची आमची क्षमता संपलेली आहे का? जब्बार पटेलांनी तेंडुलकरांची नाटके केली त्या वेळी त्याला खूप विरोध झाला. त्यावर वादळी चर्चा झाली. व्यवसायी पातळीवर जे विकते, चालते तेच सुरक्षित असते. व्यवसायाला सामाज आणि प्रबोधन असे काही नको असते.
 
 
व्यवसाय साध्य करताकरताच फायद्याच्या समुद्रातील ओंजळ सीएसआर म्हणून टाकली जाते. त्याचा गवागवा जास्त केला जातो. मदतीच्या मापापेक्षा गवगव्याची वाफच जास्त मोठी असते. त्यामुळे व्यवसायात प्रयोगाला स्थान नसते. हमखास यश, नफा, ‘हातोहात खपले’ या सदरातले काही हवे असते. त्यातही सोपे, सुटसुटीत आणि लावलेला खर्च काढून देणार्या गोष्टींचा शोध व्यवसायात घेतला जातो. चिमूटभर जे असेल त्याचे पसाभर केले जाते. तसे दाखविले जाते. चिमूटभर साखरीचे ‘बुढ्ढी के बाल’ केले जातात. जाहिरातींच्या तंत्रावर ते विकले जाते. नव्याचा शोध घ्या अन् दर्जा बघा, इतका वेळ व्यवसायाकडे नसतो. तुम्ही चलनी नाणं निर्माण केलं की, मग तुमच्याकडे बाजार धावत असतो. नव्याचा शोध बाजार घेत नाही. सवाल हा आहे की, आता जी नाटकं पुन:पुन्हा रंगमंचावर आणली जात आहेत, त्यावर चित्रपटही केले जात आहेत. नवी कथानके नाहीतच का? आहेत आणि प्रयोग होतही आहेत, मात्र बाजाराला ती मान्य नाहीत. बाजार सुरक्षितता पाहतो. हमखास यश बाजाराला हवे असते. जमावाची मानसिकताही बाजारीकरणाचीच झालेली आहे. नव्या कल्पना, प्रयोग, नवे प्रवाह यांना डोक्यावर घेणे तर दूरच, त्याचा साधा स्वीकारही करण्याची आमची मानसिकता नाही.
 
 
वि. वा. शिरवाडकर हे मानदंडच आहेत. नटसम्राटमधली भाषा तालेवारच आहे. तरीही तेच ते आणि तसेच किती वेळ? हा प्रश्न उमर्ट आणि उदंड असा वाटण्याची शक्यता आहे. तरीही प्रश्न आहेच. नाटकाचा प्रेक्षक ठरलेला आहे. परीघडीचा आहे. त्यांना हेच हवे असते, असे समर्थन केले जाते. नाटकांकडे नवा प्रेक्षक- नवअभिजन का वळत नाही? तशा दमदार कलाकृतींचा आविष्कार आम्ही का करत नाही? गेल्या पन्नास वर्षांत दीर्घकाळ टिकावे असे कुणीच, काहीच लिहिले नाही का? की आमचे त्याकडे दुर्लक्ष झाले? (की सोयिस्कर रीत्या आम्ही ते केले?) नाटकाच्या ठेवणीतल्या प्रेक्षकांनाही नवे काही नको आहे का? असा ठाम तर्क आपण कसाकाय काढला? तसा प्रयोग करून पाहिला आहे का? वानगीदाखल बोटावर मोजता येण्यासारखी काही उदाहरणे दिली जातात. ते प्रयोग आम्ही केवळ प्रयोग करत असतो, हे दाखवायला कचखाऊ मानसिकतेनेच केलेले असतात. ते फसलेले नसतात, फसविलेले असतात.
 
 
नटसम्राटचे कथानक समकालीन समाजाच्या भावनांना हात घालणारे, समस्यांना हात घालणारे आहे, असे वाटत नाही. आताच्या आप्पासाहेब बेलवलकरांसमोर वेगळे प्रश्न आहेत. त्यांची मुले परदेशात गेली आहेत आणि आप्पासाहेब इकडे भारतातच राहतात. परदेशात जायचेच असेल, तर त्यांना नातवांचे केअरटेकर म्हणून जावे लागते. हे वृक्ष एकदम भलत्याच मातीत रुजणारे नाहीत. झाड पेलवत नाही अन् जमीन सोडवत नाही, अशी या मुळांची अवस्था झालेली आहे; तरीही त्याच त्या विषयावर अमिताभ बच्चनपासून राजेश खन्नांपर्यंतचे चित्रपट येऊन गेले आहेत. पुन्हा नटसम्राटच गल्ला जमवून गेला आहे. दळवींचे ‘बॅरिस्टर’ अगदी वेगळेच नाटक होते. तेही गाजले. त्यात मांडला गेलेला अवकाश आजही रसिकांचे जीवन व्यापून उरलेला आहे. तेही एक आव्हानच आहे. राज्य नाट्य स्पर्धांमध्ये दरवर्षी किमान पन्नास तरी संहिता नव्या असतात. त्यांच्याकडे बाजाराचे लक्ष जात नाही. अनिल बर्व्यांच्या मुलाने ‘तुंबाड’ चित्रपट केला. कथा, पटकथा, मांडणी, तंत्र, दिग्दर्शन या सार्याच पातळ्यांवर खूपच सरस चित्रपट आहे. मराठीच नव्हे, तर भारतीय सिनेमा एका वेगळ्या पातळीला नेणारा हा चित्रपट आहे... आम्ही नव्याचा शोध आणि स्वीकार करण्याइतके सुसंस्कृत कधी होणार...?
@@AUTHORINFO_V1@@