माझी कन्या भाग्यश्री योजना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2018
Total Views |
 
 
शासनातर्फे मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणण्यासाठी व मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी विविध स्तरावर योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही योजना केंद्र शासनाने २०१४ पासून अशाच काहीशा उद्दिष्टांसाठी सुरू केली. त्याचप्रमाणे मुलींच्या शैक्षणिक, आर्थिक व आरोग्याचा विकास होण्यासाठी फेब्रुवारी २०१४ मध्ये ‘सुकन्या’ योजना सुरू करण्यात आली. या योजनेनुसार राज्यातील दारिद्य्ररेषेखालील जन्मणार्‍या प्रत्येक मुलीच्या नावे रुपये २१,२००/- मुलीच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून सदर मुलीस वयाचे १८ वर्ष पूर्ण झाल्यावर एकूण रुपये १ लाख एवढी रक्कम प्रदान करण्यात येईल, अशी तरतूद करण्यात आली होती. परंतु, मुलींच्या जन्मदराबाबत समाजात सकारात्मक विचार रुजवणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतिबंध करण्यासाठी सुरू केलेली सुकन्या योजना विलीन करून व त्याबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करून ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही नवीन योजना राबवण्याचे ठरले. त्यानुसार राज्यात सर्व गटातील दारिद्य्ररेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणार्‍या तसेच दारिद्य्ररेषेवरील (­APL) पांढरे रेशन कार्डधारक कुटुंबात जन्मणार्‍या प्रत्येक मुलीसाठी सुकन्या योजनेचे लाभ कायम ठेऊन त्याव्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी १८ वर्षे होईपर्यंत अधिकचे लाभ देण्यासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेस फेब्रुवारी २०१६ पासून लागू केले आहे.
 
योजनेचा उद्देश:
* मुलींना चांगले शिक्षण मिळणे
* मुलींच्या आरोग्यात सुधारणा करणे
* मुलींच्या उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे
* बालिका भ्रूणहत्या रोखणे
* मुलांइतका मुलींचा जन्मदर वाढविणे
* मुलींचा सर्वांगीण विकास होणे
* बालविवाहास प्रतिबंध करणे
* मुलींच्या जीवनमानाबद्दल खात्री देणे
* मुलीच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे
* बालिकेच्या समान दर्जा व शैक्षणिक प्रोत्साहनकरिता समाजात कायमस्वरुपी सामुदायिक चळवळ निर्माण करणे.
* जिल्हा, तालुका व निम्नस्तरावर विविध संस्था व सेवा देणारे विभाग यांचा समन्वय घडवून आणणे.
 
स्वरुप :
माझी कन्या भाग्यश्री या योजनेमध्ये पुढीलप्रमाणे २ प्रकारचे लाभ लाभार्थ्यांना अनुज्ञेय राहतील.
 
 
प्रकार-१ चे लाभार्थी
एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंबनियोजन केले आहे.
 
 
प्रकार-२ चे लाभार्थी
एक मुलगी आहे आणि मातेने दुसर्‍या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना प्रकार-२ चे लाभ देय राहतील. मात्र एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत.
 
 
१) मुलीच्या जन्माच्या वेळी प्रकार १ अनुसार रुपये ५०००/- तर प्रकार २ अनुसार रुपये २५००/- प्रत्येकी दिले जातात. प्रधानमंत्री जन-धन योजनेत मुलगी व तिच्या आईच्या नावे संयुक्त खाते उघडण्यात येऊन १ लाख रुपयापर्यंतचा अपघात विमा व रुपये ५ हजारपर्यंत ओव्हर ड्राफ्टचा लाभही मिळतो. केंद्र शासनाच्या आम आदमी योजनेनुसार मुलीच्या पालकांचा विमा उतरविला जाईल, अशी तरतूद आहे. शिवाय सुकन्या योजनेचे लाभही अंतर्भूत आहेत.
 
 
२) मुलगी पाच वर्षाची होईपर्यंत तिच्या दर्जेदार पोषणासाठी (प्रकार १) प्रत्येक वर्षाच्या शेवटी रुपये २०००/- प्रमाणे पाच वर्षासाठी १० हजार रुपये व दोन मुली असल्यास (प्रकार २) प्रत्येकी १ हजार रुपयाप्रमाणे पाच वर्षासाठी दोन्ही मुलींना ५ हजार रुपये प्रत्येकी देण्यात येईल.
 
 
३) मुलीचा प्राथमिक शाळेत प्रवेश झाल्यावर तिच्या गुणवत्तापूर्ण पोषणासाठी व आहारासाठी पाचवीच्या वर्गापर्यंत (प्रकार १) प्रतिवर्षी रु. २५००/- प्रमाणे १२,५०० रुपये पाच वर्षाकरिता दिले जातील व दोन मुली असल्यास (प्रकार २) प्रत्येकी दीड हजार रुपये प्रतिवर्षाप्रमाणे ५ वर्षासाठी १५,००० रुपये देण्यात येईल.
 
 
४) मुलगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेईल (इ. ६ वी ते १२ वी) तेव्हा (प्रकार १) तिच्या पोषण व आहारासाठी व इतर संकिर्ण खर्चाकरिता रुपये ३ हजार दरवर्षीप्रमाणे एकूण २१ हजार रुपये सात वर्षाकरिता देण्यात येईल व दोन मुली असल्यास (प्रकार २) प्रत्येकी रु. २०००/- प्रतिवर्षाप्रमाणे सात वर्षांकरिता देण्यात येईल.
 
 
५) वयाच्या १८व्या वर्षी उच्च शिक्षण व रोजगार मिळवण्यासाठी विम्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर १ लाख रुपये देण्यात येतील.
 
 
६) मुलीच्या जन्मानंतर आजी-आजोबांना प्रोत्साहनपर सोन्याचे नाणे भेट म्हणून दिले जाईल, अशीही तरतूद आहे.
 
 
- कल्पेश गजानन जोशी
 
 
@@AUTHORINFO_V1@@