आम्हाला काय त्याचे?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2018
Total Views |

 


 
 
भारतीय माध्यमांतील बहुसंख्य मंडळी डाव्या विचारांवर पोसलेली आहेत आणि जे कोणी व्यवस्थेला आव्हान देत देशाच्या मुळावर उठतात, ते ते या लोकांना क्रांतिकारक वाटतात. म्हणूनच या लोकांना नक्षलवाद्यांसहित देशविघातक शक्तींमागे टाळ्या पिटत फिरावेसे वाटते. मग तो प्रा. साईबाबा असो की याकूब वा अफजल वा जेएनयुतील ‘भारत तेरे टुकडे होंगे’चा नारा देणारी टोळी असो!
 

छत्तीसगढच्या दंतेवाडातील जंगलात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अच्युतानंद साहू या दूरदर्शनच्या कॅमेरामनचा बळी गेला. नक्षलवाद्यांचा हा हल्ला एकूणच भारतीय पत्रकारिता, माध्यमविश्व आणि लोकशाही व्यवस्थेविरोधातल्या क्रौर्याचा भेसूर आविष्कारच, पण एरवी उठसूट फुटकळ गोष्टींवरून माध्यमस्वातंत्र्य धोक्यात आल्याच्या नावाने बोंबाबोंब करणार्यांनी या हल्ल्याचा साधा निषेध करण्याचेही सौजन्य दाखवले नाही. असे का? काय कारण असावे, राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील माध्यमांत उच्च पदावर बसलेल्यांनी नक्षलवाद्यांविरोधात एक अवाक्षरही न काढण्याचे? नक्कीच नक्षलवाद्यांशी असलेले अर्थपूर्ण आणि परस्पर सहकार्याचे संबंध जपण्यापायी या लोकांची दातखीळ बसली असावी. नाहीतरी ज्या ज्या वेळी नक्षलवाद्यांनी देशातल्या सुरक्षा बलांवर, पोलिसांवर हल्ले केले, त्या त्या वेळी ही वंचितांच्या मनातली पीडा, वेदना असल्याचे म्हणत त्या कृत्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम याआधी इथल्या माध्यमांनी केलेच आहे व आजही तेच केले जाते. गेल्या दोन-तीन महिन्यांतल्या घटनांचा जरी अभ्यास केला तरी आपल्याला या गोष्टी सहज पटू शकतील. अगदी कालपरवा वरवरा राव, वर्नन गोन्साल्विस, अरुण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा या शहरी नक्षलवाद्यांना नजरकैदेत ठेवण्याची गोष्ट असो की, त्यांच्या अटकेची, मुख्य प्रवाहातील माध्यमांनी व त्यातल्या म्होरक्यांनी व्यवस्थेविरोधात आकांडतांडव करण्याचेच धोरण अवलंबले. बेड्या ठोकलेले नक्षलवादी जसे काही कोणी संत असल्याच्या आविर्भावात त्यांच्यावतीने बाजू मांडत पोलिसांची कारवाई कशी चुकीची होती, हे सांगण्यासाठी कित्येकांनी लेखणी खरडली तर अनेकांनी तोंडापुढे माईक धरत बडबड चालवली. नक्षलवाद्यांचा विचार कसा शोषितांच्या, वंचितांच्या, कष्टकर्‍यांच्या मागे ठामपणे उभा राहणारा आहे, हे सांगण्यासाठी विशेष चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात आले. पण, आजपर्यंत नक्षलवाद्यांच्या रक्तरंजित क्रांतीच्या स्वप्नापायी ज्यांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली, त्या सर्वसामान्य नागरिकांचा, सुरक्षा बलातील जवानांचा, पोलिसांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा टाहो का कधी माध्यमांतल्या संवेदनशील, कनवाळू लोकांच्या कानापर्यंत गेला नाही? दूरदर्शनच्या ज्या कॅमेरामनचा जीव गेला त्याचा अन् त्याच्या आई-वडिलांच्या दुःखावेगाच्या किंकाळ्या का कधी माध्यमांतल्या हुशार, बुद्धिमान, सर्वज्ञानी लोकांना ऐकू गेला नाही? त्यामुळेच उद्या जर कोणी ‘हाच तो मुख्य प्रवाहातील माध्यमांचा हिडीस चेहरा,’ असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

 

देशाला पाकपुरस्कृत दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांचा जेवढा धोका आहे, त्यापेक्षाही अधिक धोका नक्षलवाद्यांचा असल्याचे आपल्याला माहिती असेलच. कारण, दहशतवादी आणि फुटीरतावादी निदान आपल्याला डोळ्यासमोर विरोधी कारवाया करताना दिसतात तरी. पण जंगलातले नक्षलवादी वगळता निरनिराळ्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, प्रयोगशाळांत बसलेल्या शहरी आणि विचारवंती आव आणणाऱ्या नक्षलवाद्यांना ओळखणे नेहमीच कठीण असते. शिवाय ही मंडळी देशाच्या छातीवर पाय रोवून, चेहऱ्यावर विविधरंगी मुखवटे लावून फिरताना दिसतात. सोबतच आपल्या हिंसक विचारांना सैद्धांतिक बैठक देऊन आपण जणू काही समस्त मानवजातीच्या कल्याणाचे उदात्त तत्त्वज्ञान सांगत असल्याचा त्यांचा दावा असतो. भरजरी शब्दांचे कोंदण देऊन मांडणी केलेल्या या घातक विचारांना महाविद्यालयीन तरुण-तरुणी आणि सर्वसामान्य नागरिक तत्काळ बळी पडतात. अशावेळी माध्यमांचे खरे कार्य या देशविरोधी प्रवृत्तींपासून देशातल्या बहुसंख्य जनतेला परावृत्त करण्याचे, वाचवण्याचे असावयास हवे. पण, ही माध्यमे आणि त्यातली बहुसंख्य मंडळी असे काही करण्याऐवजी नक्षल्यांना अन् त्यांच्या क्रूरतेला महानतेचा, थोरपणाचा मुलामा देण्यातच धन्यता मानताना दिसतात. हे काय गौडबंगाल आहे? भारतीय माध्यमांतील बहुसंख्य मंडळी डाव्या विचारांवर पोसलेली आहेत आणि जे कोणी व्यवस्थेला आव्हान देत देशाच्या मुळावर उठतात, ते ते या लोकांना क्रांतिकारक वा मसिहा वाटतात. म्हणूनच या लोकांना नक्षलवाद्यांसहित देशविघातक शक्तींच्या मागे टाळ्या पिटत फिरावेसे वाटते. मग तो प्रा. साईबाबा असो की याकूब मेमन वा अफजल गुरू वा जेएनयुतील ‘भारत तेरे टुकडे होंगे’ चा नारा देणारी टोळी असो!

 

आपल्याला माहितीच आहे की, देशात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून इथल्या कितीतरी पत्रकार-बुद्धिमंतांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि त्या जोडीलाच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या स्वातंत्र्यावर गदा आल्याचे उच्चरवाने सांगण्यास सुरुवात केली, पण आजही जवळपास सर्वच पत्रकार व माध्यमे मोदींसह केंद्र सरकारविरोधात उघडपणे बोलताना दिसतात. म्हणजेच कोणाच्याही कोणत्याही स्वातंत्र्यावर कसलीही बंधने आलेली नाहीत. तरीही केवळ आपल्या वैयक्तिक कारणांमुळे, मुद्द्यांमुळे ज्यांना मुख्य प्रवाहातील माध्यमांतून बाहेर पडावे लागले, ते मोदी सरकारवरच त्याचे खापर फोडून मोकळे होतात. पण हेच लोक इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीचे समर्थन अगदी न थकता करत असतात. हा दुटप्पी, दांभिकपणा कशापायी? तर फक्त नरेंद्र मोदी, भाजप, रा. स्व. संघ आणि हिंदूविरोधासाठीच ना? म्हणूनच या लोकांना २०१२ साली आझाद मैदानात माध्यमप्रतिनिधींवर केलेल्या हल्ल्यानंतरही रझा अकादमीविरोधात आणि आता दूरदर्शनच्या पत्रकार चमूवर केलेल्या हल्ल्यानंतरही नक्षलवाद्यांविरोधात बोलण्यासाठी शब्द फुटत नाही. बरोबरच आहे, ज्यांच्या पायाशी या लोकांचे हितसंबंध गुंतलेले असतात, त्या लोकांविरोधात बोलणार तरी कुठल्या तोंडाने? एवढेच नव्हे तर मागच्या दोन-तीन आठवड्यांपासून देशात ‘मी टू’ प्रकरण बरेच गाजताना दिसले. उच्चभू्रू वर्तुळातील स्त्रियांचे शोषण करण्याचा कोणी कसा प्रयत्न केला, त्याला वाचा फोडण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री आणि पत्रकार एम. जे. अकबर यांच्याविरोधातही असे आरोप झाले. तेव्हा मात्र तमाम माध्यमप्रतिनिधींनी अकबर यांच्यविरोधात आघाडी उघडली, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली व त्यांनी तो दिलाही. पण, या लोकांना कधी ‘तहलका’ मासिकाचा संपादक असलेल्या तरुण तेजपालविरोधात ब्र काढण्याचे तरी धाडस झाले का? तरुण तेजपालविरोधात तर आपल्याच सहकारी महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप असून ज्या लिफ्टमध्ये हा प्रकार घडल्याचा दावा संबंधित महिलेने केला त्या लिफ्टच्या आत संबंधित महिला कर्मचारी व तरुण तेजपाल जातानाचे व नंतर बाहेर पडतानाचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध आहे. यादरम्यान लिफ्टमध्ये तरुण तेजपालने आपला विनयभंग केल्याचे संबंधित महिला कर्मचाऱ्याने म्हटले. तरुण तेजपालवर त्याच्या महिला कर्मचाऱ्यानेच असा थेट आरोप करुनही का कोण्या स्त्रीमुक्तीवादी पत्रकार वा माध्यमाने त्याविरोधात एखादी ‘मीडिया ट्रायल’ चालवली नाही? तो मुख्य प्रवाहातील माध्यमांत काम करणाऱ्या प्रतिष्ठितांच्या वर्तुळात वावरणारा होता म्हणूनच ना? हा ‘आपला तो बाब्या अन् दुसऱ्याचं ते कार्ट’ छाप प्रकारच! दुसरीकडे मराठीतल्या एका आक्रस्ताळ्या अन् हातवारे करत अंगावर धावून जाणाऱ्या पत्रकाराची कथाही अशीच! ज्याच्या नावावर निरनिराळ्या वृत्तपत्रापासून ते अनेकानेक वृत्तवाहिन्यांमधून हाकलून दिल्याचा विक्रम आहे, जो मोदीविरोधाचे डिंडिम वाजवताना कितीतरी व्यासपीठांवर दिसतो, ज्याची त्याच्याच सहकारी महिला कर्मचाऱ्याने मागून येऊन मिठी मारली म्हणून थोबाडीत मारून शोभा केली आणि जो वर तोंड करूनतिने फक्त मला ढकलले,” असे म्हणतो, त्या व्यक्तीबाबतही इथल्या माध्यमांनी कुठली ठोस भूमिका घेतली? लोकांना शहाणपणाचे धडे देत फिरणाऱ्या या इसमाविरोधात कोणी काही बोलले तरी का? म्हणजेच जो आपल्या कळपातला, त्याचे प्रत्येक कृत्य माफीलायक आणि जो आपल्या कळपातला नाही, त्याची क्षुल्लकशी गोष्टही थेट गजाआड टाकण्याएवढी! याला माध्यमांचा दांभिकपणा नव्हे तर काय म्हणावे? मुद्दा नक्षलवाद्यांनी दूरदर्शनच्या पत्रकार चमूवर केलेल्या हल्ल्याचा आहे आणि ती सरकारी वाहिनी असल्याने तिच्या कॅमेरामनच्या जीवनाची माती झाली काय किंवा राख झाली काय, आम्हाला काही फरक पडत नाही, अशीच भूमिका मुख्य प्रवाहातील माध्यमांनी घेतल्याचे कालपासून दिसले. पण, यामुळे या माध्यमांच्या अन् त्यातल्या कर्त्याधर्त्यांच्याच विश्वासाला तडा गेला. अर्थात, हा तडा अधिकाधिक मोठा करण्यात या माध्यमांचाच नेहमीप्रमाणे हात आहे, हेही खरेच!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@